गांधी हत्येनंतर सरसंघचालक गोळवलकरांनी लिहलेली ती दोन पत्र.

३० जानेवारी १९४८ रोजी दिल्ली येथील एका प्रार्थना सभेत नथुराम गोडसे नावाच्या एका माथेफिरूने राष्ट्रपिता महात्मा गांधीजीवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या गांधीजींचा आपल्याच देशातील व्यक्तीने खून करावा यावरून जनतेत आक्रोश निर्माण झाला.

नथुराम गोडसेचे हिंदू महासभा, आरएसएस या संघटनाशी संबंध होते अशी चर्चा सुरु झाली. गांधी हत्येनंतर या संघटनानी पेढे वाटले अशी अफवा फिरत होती. संघ, हिंदू महासभा यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या घरावर हल्ले झाले. विशेषतः महाराष्ट्रात दंगल पसरली.

आजही संघावर अधूनमधून हे आरोप होत असतात. गांधी हत्येनंतर संघाची नेमकी भूमिका काय होती याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजीनी लिहिलेली दोन पत्रे देत आहोत.

हे पहिले पत्र तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना गांधीजींच्या हत्येच्या अगदी दुसऱ्याच दिवशी पाठवण्यात आले होते.

नागपूर, ३१ जानेवारी १९४८

सन्मानीय प्रिय जवाहरलाल नेहरू

काल मद्रासला (आजचे चेन्नई) एक धक्कादायक बातमी ऐकली की, कुणीतरी अविचारी, विकृत व्यक्तीने पूज्य महात्माजींवर गोळी झाडून एक घृणास्पद कृत्य केले आणि त्यांची आकस्मिक आणि निर्घृण हत्या केली. संपूर्ण जगाच्या दृष्टीने हे निंद्य कृत्य म्हणजे आपल्या समाजावर कलंक आहे.

एखाद्या शत्रूदेशातील व्यक्तीच्या हातून हे कृत्य घडले असते, तरी ते अक्षम्यच ठरले असते. कारण, महात्माजींचे जीवन सीमांच्या सर्व मर्यादा ओलांडून, सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी समर्पित होते. आपल्याच देशबांधवांपैकी एकाने अत्यंत अकल्पित आणि निंद्य कृत्य केल्यामुळे आपल्या देशबांधवांपैकी प्रत्येक व्यक्तीला वेदनाग्रस्त केले, यात नवल नाही.

ही बातमी ऐकल्यापासून माझे अंतःकरण शून्यवत होऊन गेले. त्या महान समन्वयवाद्याच्या अभावामुळे नजीकच्या भविष्यकाळात कोणते भयंकर परिणाम संभावतील, याविषयीच्या चिंतेने माझे हृदय ओतप्रोत भरून गेले आहे. अशा प्रकारच्या कुशल कर्णधारावर, ज्याने विभिन्न प्रवृत्तींच्या व्यक्तींना एका सूत्रात गुंफून सन्मार्गागामी बनविले, त्यांच्यावरील हा हल्ला म्हणजे केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नव्हे, तर संपूर्ण देशाचा द्रोह आहे.

या विश्वासघातकी व्यक्तीचा आपण म्हणजे आपल्या सरकारातील अधिकारीवर्ग योग्य बंदोबस्त करील याविषयी शंका नाही. त्याच्याशी कितीही कठोरतेने व्यवहार केला तरी देखील झालेल्या हानीचा विचार करता, तो सौम्यच वाटेल. त्यासंबंधी काही सूचना करणे हा माझा विषय नाही.

तथापि, आपण सर्वांकरिताच ही कसोटीची वेळ आहे. सध्याच्या कठीण प्रसंगी आपली विवेकशक्ती विचलित होऊ न देता, वाणीमध्ये मधुरता ठेवून आणि राष्ट्रप्रति एकनिष्ठा बागळुन राष्ट्रनौका पुढे नेण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आली आहे. याच वृत्तीने चालणाऱ्या आमच्या संघटनेच्या वतीने, या भीषण आपत्ती प्रसंगी, संपूर्ण राष्ट्राच्या तीव्र वेदनेचा अनुभव घेत, त्या दिवंगत पुण्यातम्याचे स्मरण करून त्या परम दयाळू परमात्म्याचे चरणी मी प्रार्थना करतो की, त्याने आम्हाला आवश्यक ती शक्ती आणि शहाणपण प्रदान करावे, जेणेकरून आपल्या जनतेमध्ये खऱ्या, चिरस्थायी एकतेची भावना कायम राहील.

मातृभूमीच्या सेवेतील

आपला सहयोगी

मा. स. गोळवलकर

 

यानंतर असंख्य पत्रव्यवहार झाले. सरदार वल्लभभाई पटेलांच्या गृहखात्याने संघावर बंदी आणली. गोळवलकर गुरुजींना सुद्धा अटक झाली. काही महिन्यांनी त्यांची सुटका करण्यात आली.

दुसरे पत्र,

यात बंदीच्या विरोधात स्वयंसेवकांना पुन्हा आपले काम सुरु करण्यासाठी गोळवलकर गुरुजींनी एक आवाहन केले होते ते खालीलप्रमाणे.

२०, बाराखंबा रोड, नवी दिल्ली,

१३ नोव्हेंबर,१९४८

स्वयंसेवक बंधुंनो,

१) ज्या कारणास्तव आपण, आपल्या संघटनेचे काम स्थगित केले होते, ती कारणे आपणांस माहित आहेत. आपण सर्वांनी आजपावेतो त्या निर्णयाचे पालन केले, याचा मला आनंद आहे.

२) त्या वेळेला अशी आशा वाटत होती की, संघावरील असमर्थनीय बंदी उठवली जाईल, लावलेले आरोप निराधार व काल्पनिक असल्यामुळे ते परत घेतले जातील आणि हिंदूंमध्ये बंधुभाव निर्माण करण्याचे आपले निरामय सांस्कृतिक कार्य पुन्हा आपण लवकरात लवकर सूर करू शकू.

अशीही आशा होती की, सरकार चालविणाऱ्या व्यक्ती आपल्याच असल्यामुळे, त्या विशिष्ट प्रसंगच्या प्रभावाखाली आमच्यावर जो अन्याय केला, तो कालांतराने, त्यांचे मन शांत होऊन, ते तो दूर करतील. ही मंडळी अत्यंत जबाबदार पदांवर असल्यामुळे त्यांना आपली चूक कळून येईल आणि ते दूरदृष्टीचा स्वीकार करून, स्वार्थाच्या वर उठून, एका व्यापक देशभक्तीचा परिचय देतील आणि सर्व राष्ट्रीय हितसंबंधाचे ऐक्य साध्य करण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी झालेला अन्याय दूर करतील.

अशीही अपेक्षा होती की, निदान हे सरकार सभ्य राज्याच्या नीतीचे अनुसरण करून आमच्याविरुद्ध असलेला पुरावा सादर करील, आम्हाला तो तपासण्यासाठी आणि त्याचा प्रतिवाद करण्यासाठी संधी देईल आणि न्यायव्यवस्थेचे जे प्रतिष्ठित मापदंड आहेत, त्यांना अनुसरून निर्णय घेईल.

३) न्याय मिळण्याच्या ता आशेनेच आम्ही शांतपणे तुरुंगवास आणि वैयक्तिक बंधने स्वीकारली. नंतर आठ महिने उलटून गेल्यावर मला नागपूर सोडून जाण्याची मोकळीक मिळाली आणि न्याय प्राप्त करण्यासाठी मी राजधानीत आलो. सन्माननीय आणि न्यायपूर्ण तडजोड व्हावी, यासाठी मी केलेले सर्व प्रयत्न वाया गेले.

२ नोव्हेंबर १९४८ ला मी दोन निवेदने प्रकाशित करून, संघावर लादलेल्या नव्या, जुन्या सर्व आरोपांना जाहीर रित्या उत्तर दिले, त्याचबरोबर आपली ध्येये आणि उद्दिष्टे यांचा पुनरुच्चार करून, केंद्र सरकारमध्ये ज्या प्रकराचे वातावरण निर्माण झालेले आहे, त्यासंबंधी माझ्या प्रतिक्रियाही जाहीर केल्या.

दुसऱ्या निवेदनामध्ये, मी आपणासमोर दोनच रस्ते मोकळे आहेत, हे स्पष्ट केले. त्यामध्ये मी स्पष्ट स्वरूपात हेही सांगितले की, बंदीची पर्वा न करता, आपण आपले कार्य पुन्हा सुरु करण्याच्या वाटेने जावे, हा पर्याय मला मान्य आहे.

४) या निर्णयाला चिटकून राहता आले असते, तर मला आनंद झाला असता. परंतु, २ नोव्हेंबरच्या सायंकाळी दिल्लीच्या दंडाधिकार्याकडून माझ्या हालचाली आणि क्रियाकलाप यांच्यावर निर्बंध घालणारा आदेश माझ्यावर बजावण्यात आला. हा घोर अन्याय होता आणि तो असमर्थनीय होता.

काल सायंकाळी, म्हणजे १२ नोव्हेंबरला मला गृहमंत्रालयाकडून कळविण्यात आले की, बंदी न उठविण्याचा त्यांचा लहरी निर्णय कायम आहे. त्याच्या जोडीला मला नागपूरला जायला सांगण्यात आले. हेही कळविण्यात आले की, माननीय गृहमंत्री सरदार पटेल यांना भेटण्याच्या अटीवरच माझ्यावर लावलेले निर्बंध हटविण्यात आले होते. सरकारचे हे म्हणणे पूर्णतः असत्या आहे आणि ते अन्यायाने आणि जबरदस्तीने मला दिल्ली सोडायला लावीत आहेत. हे स्वतंत्र नागरिक या नात्याने माझ्या मौलिक अधिकाराचे हनन आहे.

आपल्या अनेक कार्यकर्त्यांच्या वाट्यालाही असे असमर्थनीय निर्बंध आलेले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. सरकार प्राचीन काळातील रानटी सत्ताधाऱ्यांनाही लाज वाटली असती, अशी दडपशाही करीत असून, अस्तित्वाचा व परस्परांशी संबंध राखण्याचा, नागरिकाचा जो प्राथमिक अधिकार आहे, तोही अधिकार सरकार हिरावून घेत आहे.

५) ही परिस्थती अपमानस्पद आहे. या क्रूर दडपशाहीच्या समोर झुकणे हे स्वतंत्र भारताच्या नागरिकाच्या सन्मानाला अपमानित करणारे आणि सभ्य राज्यव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारे आहे.

म्हणून देशभक्त नागरिक या नात्याने, या लहरी दडपशाहीसमोर न वाकणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे. म्हणून नागरिकत्वाच्या सन्मानासाठी आणि अधिकारासाठी उभे राहणे, हे आपले कर्तव्य आहे.

६) आपण सर्व एका नाजूक परिस्थितीतून जात आहोत, याची आपणांस कल्पना आहे. जनतेमध्ये अंतर्गत विघटन होऊ नये, यासाठी आपल्या स्वभावजन्य देशभक्तीपर प्रेराणांमुळे आपण अनेक अन्याय सहन केले. परंतु, परिस्थितीचे गांभीर्य जाणण्याची जबाबदारी सरकारचीही आहे.

शांततेने न्याय्य तोडगा निघावा यासाठी आपण सर्व प्रकारचे प्रयत्न केले. परंतु, सरकार मात्र अधिकाधिक अन्यायी आणि लहरी बनत गेले. स्वताच्या पक्षाच्या हितासाठी, आपला देशभक्तीच्या भावनांचा ते गैरफायदा घेत आहेत, असे दिसून येते. देशहिताच्या दृध्तीने आपण अंगिकारलेला संयम त्यांना आपली दुर्बलता वाटे आणि म्हणू आपली वैयक्तिक आणि सामुहिक कार्यक्षमता संपवून टाकण्याची ते योजना आखीत आहेत.

मात्र हे दृष्ट उद्देश यापुढे आपण चालू देणार नाही. कारण, त्यामुळे परिणामी आपल्या देशाचा सर्वनाश घडून येईल. तो गंभीर धोका टाळण्यासाठी आता हे अत्यंत आव्याशक झाले आहे की, आपण खंबीरपणे उभे राहावे आणि पाळ्या राज्याला विनाशापासून वाचविण्यासाठी थोडी चळवळ करावी.

७) म्हणून माझी आपणांस विनंती आहे की, महान उद्दिष्टासाठी आपण हिमतीने उभे राहावे. सत्य आणि न्याय आपल्या बाजूला आहेत आणि जेथे सत्य असते, तेथे ईश्वराच्या कृपेचा वर्षाव होतोच.

त्या परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवून आणि आपल्या पवित्र मातृभूमीशी एकनिष्ठ राहून, आपल्या कार्याच्या न्याय्य्तेचे रक्षण करण्यासाठी आपण शांतीपूर्ण अभियान सुरु करू. सरकारची संकुचित दृष्टी, स्वतःच्या पक्षाच्या कायम प्रभावाची हाव आणि आपल्याहून वेगळ्या विचारला आणि कृतीला अस्तित्व नाकारण्याची असहिष्णुता, यामुळे अनिच्छेने का होईना, हा उपलब्ध असलेला एकमेव मार्ग स्वीकारावा लागत आहे. ही दृदैवी परिस्थिती निर्माण करण्याची संपूर्ण जबाबदारी केवळ सरकारचीच आहे.

८) म्हणून ६ फेब्रुवारी १९४८ ला संघाचे कार्य स्थगित करण्याची जी सूचना मी केली होती, ती उरण विचारांती मागे घेत आहे आणि सामान्य पद्धतीने आपले कार्य पुन्हा सुरु करण्यासाठी आपणांस विनंती करीत आहे.

तथापि, शांतात राखण्यासाठी आणि आपसातील विसंवाद टाळण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.

९) आपले सरकार्यवाह श्री भय्याजी दानी यांनी हा निर्णय आणि ज्या दिवसापासून आपले कार्य पुन्हा सुरु करायचे, तो दिवस आणि दिनक आपणांस कळवावा, अशी मी सूचना केलेली आहे.

१०) आपण सत्याच्या बाजूने उभे आहोत. आपण न्यायच्या बाजूने उभे आहोत. आपण राष्ट्रीय अधिकारांच्या बाजूने उभे आहोत. सत्याचा पाठीराखा असलेल्या परमेश्वरावर अंतकरणपूरक श्रद्धा ठेवून, आपण पुढे चालावे आणि उद्दिष्ट प्राप्त होईपर्यंत थांबू नये.

परमात्म्याचा विजय असो. मातृभूमीचा विजय असो.

आपला

मा. स. गोळवलकर

 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.