गुगल, फेसबुक, अ‍ॅप्पल ; भल्या भल्या कंपन्यांचे मालक भारतातल्या या बाबांचे आशिर्वाद घेतात..

भारताला साधूसंतांची आणि बुवा-बाबांची भूमी म्हंटलं जातं. देशातील प्रत्येक बाबाची काही ना काही स्पेशालिटी आहे. उदाहरणार्थ रामदेव बाबा त्यांच्या योगासाठी तर ओशो त्यांच्या अध्यात्मिक तत्वज्ञानासाठी ओळखले जातात.

भारतातले असेच एक बाबा ज्यांच्या पायाची धूळ जगभरातले इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी क्षेत्रातले बडेबडे दिग्गज आपल्या मस्तकी लावतात. या बाबाचे नाव ‘निम करोली बाबा’.

मागेही एकदा नीम करोली बाबा यांच्या दर्शनाला विराट कोहली गेला होता आणि मग चर्चेतही आला होता. आता पुन्हा तसंच झालंय. सध्या विराट आपल्या परिवारासोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसतोय. याच सुट्टीदरम्यान तो मथुरेत गेल्याचंही दिसलं.

मथुरेत विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मा आणि कन्या वामिका यांच्यासोबत सर्वात आधी हित प्रेमानंद गोविंद शरण महाराजांच्या मठात गेला त्यानंतर तो निम करोली बाबा यांच्या समाधीस्थळावर तो गेला आणि मग त्याने माँ आनंदमई यांच्या आश्रमातही तो गेला होता.

असा सगळा कार्यक्रम आटोपून मग तो त्याच्या प्रायव्हेट हेलिकॉप्टरने दिल्लीकडे पुन्हा रवाना झाला.

गुगल, फेसबुक, अ‍ॅप्पल ; भल्या भल्या कंपन्यांचे मालक भारतातल्या निम करोली बाबांचे आशिर्वाद घेतात.. त्यांची ही गोष्ट.

साधारणतः सत्तरचं दशक.

एका स्वप्नाळू अमेरिकी मुलाला आपल्या आयुष्याचा उद्देशच सापडत नव्हता. त्याने कॉलेज निम्म्यातून सोडलं होतं आणि नैराश्येच्या गर्तेत जाऊन तो ड्रग्जच्या धुंदीत मित्रांच्या रूमवर पडलेला असायचा.

कोकच्या रिकाम्या बाटल्या गोळ्या करून त्यातून काही पैसे जमवायचा. अनेकदा तर संध्याकाळच्या जेवणासाठी त्याला सात मैल पायपीट करत ‘हरे रामा’ मंदिराकडे जावं लागायचं.

अशाच परिस्थितीत तो भारतीय अध्यात्माकडे आकर्षित झाला.

१९७३ साली तो सॅन फ्रँन्सिस्कोला आला आणि मित्राच्या मदतीने एका चांगल्या कंपनीत मिळालेली नोकरी करायला लागला. मुळातच स्मार्ट असणाऱ्या या मुलाने नवीन ठिकाणी आपल्याला सोपविण्यात आलेलं काम लगेच आत्मसात केलं.

अल्पावधीतच त्याने कंपनीत चांगला जम बसवला. याच कंपनीत तो चांगली प्रगती करेल याची सगळ्यांना खात्री वाटायला लागली होती. त्याच्या गर्लफ्रेंडला देखील  वाटलं  की आता याची गाडी आता रुळावर आलीये.

या पोराच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच सुरु होतं.

त्याला काय करायचं होतं तर त्याला भारतात येऊन संन्यास घ्यायचा होता. भारतात जाण्यासाठी लागणारे पैसे जमवण्यासाठीच त्याने नोकरी धरली होती. काही महिन्यातच त्याने पुरेसे पैसे जमवले देखील आणि मग तो आपला कॉलेजचा मित्र डॉन कोट्केला घेऊन भारतात आला.

आता बहुतेक तुम्हाला त्या माणसाचा अंदाज आलेला असणारच ! हो अगदी बरोबर ओळखलंत. तो मुलगा म्हणजे जगप्रसिद्ध अॅप्पल कंपनीचा निर्माता स्टीव्ह जॉब्ज.

गुरूच्या शोधात स्टीव्ह जॉब्ज भारतात !

स्टीव्ह जॉब्जला जायचं होतं भारतातल्या कैंचीला. कारण तिथे त्याने ज्यांचा मनोमन आपले गुरु म्हणून स्वीकार केला होता ते ‘निम करोली बाबा’ राहत  होते.

neem karoli baba
निम करोली बाबा

नैराश्यात गेलेल्या स्टीव्ह जॉब्सने आपला मित्र रॉबर्ट फ्रीडलैंडकडून निम करोली बाबाविषयी बरंच काही ऐकलं होतं. त्यानंतर त्याने बाबांची माहिती मिळवली आणि त्यांची अनेक पुस्तके एका झटक्यासरशी वाचून काढली होती.

बाबांच्या पुस्तकांचा जॉब्जवर इतका प्रभाव पडला की तो या बाबांचा भक्तच झाला.

अमेरिकेहून निघालेल्या जॉब्जने आधी दिल्ली आणि दिल्लीहून थेट नैनितालमार्गे  कैंची गाठलं. जॉब्स आणि त्याचा मित्र डॉन कोट्के निम करोली बाबाच्या आश्रमात पोहचले. मात्र तिथे गेल्यावर त्यांना धक्काच बसला. कारण ज्यांच्या ओढीने ते दोघे भारतात आले होते त्या निम करोली बाबांनी काही दिवसांपूर्वीच समाधी घेतली होती.

त्यानंतर भारतात आलेला जॉब्ज मात्र ७ महिने भारतात भटकत राहिला. त्याने हरिद्वार आणि उत्तराखंड पालथं घातलं. यादरम्यान तो अनेक साधू बाबांकडे राहिला. असं म्हणतात की याच काळात अॅप्पल कंपनीने त्याच्या डोक्यात आकार घेतला.

डॉन कोट्के भारतातच राहिला आणि स्टीव्ह अमेरिकेला परत गेला. तिथे जाऊन त्याने रॉबर्ट फ्रीडलैंड सोबत एक आश्रम बनवला आणि तेथूनच अध्यात्मिक  अनुभव घेत राहिला. त्यानंतर काही वर्षांनी मात्र त्याने काही मित्रांना सोबत घेऊन अॅप्पल कंपनीची स्थापना केली आणि इतिहास घडवला.

मार्क झुकरबर्ग बाबांच्या चरणी ! 

मध्यंतरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेतील  फेसबुकच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने आठवण सांगितली की फेसबुक सुरु केल्यानंतरचा सुरुवातीचा काही दिवसांचा काळ त्याच्यासाठी ‘बॅड पॅच’ होता. मार्क मानसिकरित्या अस्वस्थ  झाला होता. त्यावेळी सल्ला घेण्यासाठी तो अॅप्पलच्या स्टीव्ह जॉब्जना जाऊन भेटला.

जॉब्ज यांनी फेसबुकसाठी प्रोफेशनल सल्ला तर दिलाच पण त्याशिवाय त्यांनी झुकरबर्गला एकदा निम करोली बाबांच्या आश्रमाला भेट देऊन यायला सांगितलं.  जॉब्ज यांचा सल्ला शिरोधार्य मानून मार्क  झकरबर्ग सुद्धा भारतात येऊन गेला. काही दिवस निम करोली बाबांच्या कैची येथील आश्रमात राहून गेला.

गुगलचे माजी अधिकारी लॅरी ब्रीलीयंट हे देखील निम करोली बाबाचे मोठे भक्त बनले. त्यांनीच ‘गुगल’चे संस्थापक लॅरी पेज आणि ऑनलाईन शॉपिंगची  वेबसाईट ‘ई बे’चे मालक जेफ स्कोल यांना बाबांच्या पायाशी आणून घातलं.

हॉलीवूडची सुपरस्टार ज्युलिया रॉबर्टसला तर म्हणे फक्त निम करोली बाबांचा  फोटो पाहिल्यावरच अत्यंतिक समाधानाची आणि सुखाची अनुभूती आली. या बाबांच्या भक्तीतूनच पुढे तिने हिंदू धर्माचा स्वीकार केला.

कोण होते निम करोली बाबा..?

जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तगडे प्लेअर्स आणि मोठे लोक ज्यांचे पाय धरतात असे हे निम करोली बाबा म्हणजे पूर्वाश्रमीचे लक्ष्मीनारायन शर्मा. वयाच्या १९ व्या वर्षीच त्यांना दैवी ज्ञानाची प्राप्ती झाल्याचा दावा त्याच्याकडून करण्यात येत असे. दैवी ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी संन्यास घेतला. फक्त एक धोतर आणि एक गोधडी अशा वेशात ते राहत असत.

त्यांचे भक्त त्यांना हनुमानाचे अवतार मानतात. हेच भक्त त्यांच्या अनेक चमत्कारांची उदाहरणे छातीठोकपणे सांगतात. एवढंच काय तर स्टीव्ह जॉब्जपासून मार्क झकरबर्गपर्यंत व्हाया लॅरी पेज या सर्वांना मृत्यूपश्चात आपले भक्त बनवणे हा देखील निम करोली बाबांचा एक चमत्कारच आहे, असं म्हंटल्यास ते वावगं ठरणार नाही.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.