जेव्हा शाहू महाराजांच्या पैलवानाला कोल्हापूरकरांचा पैलवान भिडला..

पहिलवानाला राजश्रय पाहीजे, त्याचा खुराक दांगडा. पहिलवान तयार करायचा म्हणजे साधं काम थोडीच असतय. राजर्षी शाहूच्या काळात खऱ्या अर्थानं पहिलवानांना राजाश्रय मिळाला. राजर्षी शाहूंच्या राजाश्रयात पहिलवान तयार झाले नाहीत तर या पहिलवानांनी पंजाबच्या पहाडासारख्या पहिलवानांना अस्मान दाखवण्याच काम केलं.

पण या सर्व पहिलवानांहून एक पहिलवान मात्र वेगळा होता. गोपाळ परिट अस त्याचं नाव, हि गोष्ट त्याचं वेगळ्या पहिलवानाची.

गोपाळा लोकाश्रयावर वाढलेला पहिलवान होता. गंजी तालमीचा हा पहिलवान. लोकांनी वर्गणी काढून त्याला मोठा केला. त्याकाळात गोविंद  कसबेकर नावाचा शाहू महाराजांचा फेमस पहिलवान होता. अतिशय जिगरबाज आणि लढवय्या.

गोपाळ परिटची किर्ती दिवसेंदिवस वाढू लागली.

खुद्द राजर्षी शाहू महाराजांच्या कानावर देखील गोपाळ परिटची किर्ती गेली. हा गोपाळ परिट कोण ?

शाहू महाराजांनी ठरवलं गोपाळची आणि आपल्या गोविंदाची कुस्ती लावायची.

मैदान भरलं, हजारो लोक सामना बघायला आले. तासभर दोन्ही पहिलवान एकमेकाला चीत करायला घुमत होते. पण कोणच माग हटत नव्हत. दोघांच्या सुद्धा इज्जतीचा प्रश्न होता. शेवटी ही कुस्ती थांबवून बरोबरीचा निकाल जाहीर करण्यात आला.

गोपाळाला हा निर्णय पटला नाही. त्याने परत गोविंद कसबेकरला लढण्याचं आव्हान दिल. यावेळी त्याला सहज चीत केलं.

शाहू महाराजांना गोपाळ परीटच कौतुक वाटलं !

पण गोपाळा परीटची परीक्षा संपली नव्हती. उलट ती आता अवघड झाली. महाराजांना गोपाळाचा खरा कस जोखायचा होता. त्यांनी देशभर आपला डंका वाजवलेला पहिलवान “श्रीपती चव्हाण ” बरोबर गोपाळाची कुस्ती ठरवली.

श्रीपती म्हणजे उत्तरेतल्या पहिलवानांबरोबर कुस्ती खेळणारा अजस्त्र मल्ल. त्यांचे सगळे डावपेच पाठ असलेला.

आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर श्रीपती हा गोपाळाचा खूप खूप सिनियर पहिलवान. नेहमी कुस्ती बरोबरीच्या पहिलवानासोबत खेळली जाते. मात्र इथे गोपाळा पहिलवानची कुस्ती अनुभवाने आणि शरीराने त्याच्या पेक्षा मोठ्या असलेल्या श्रीपती बरोबर लावण्यात आली होती.

बेजोड ताकदीच्या या पहिलवानाची कुस्ती बघायला पंचक्रोशीतून माणसे गोळा झाली होती. दोन वेळा हि कुस्ती बरोबरीत सुटली. मात्र तिसऱ्यांदा कुस्ती निकालीच काढण्याचा आदेश आला.आत्ता इज्जतीचा सवाल होता तो श्रीपतीच्या.

संपुर्ण कोल्हापूर राजांच्या विरोधात खेळणाऱ्या पहिलवानाच्या मागं उभा होतं.

मैदानात जोर जढू लागला आणि बघता बघता गोपाळ पहिलवानानं श्रीपती चव्हाणला अस्मान दाखवलं.

संबध कोल्हापुरकरांचे फेटे गगनाला भिडू लागले, त्या जल्लोषात एका राजाचा आवाज देखील होता. तो म्हणजे शाहू महाराजांचा. शाहू महाराजांना आनंद होता तो गोपाळ जिंकल्याचा. लोकाश्रयावरचा पहिलवान जिंकल्याचा…

म्हणूनच महाराज लोकराजा होतं.

फक्त गदा देवून कौतुक होणार नव्हतं. महाराजांनी गोपाळ पहिलवानाची हत्तीवरुन मिरवणुक काढली. हत्तीवरुन मिरवणुक निघालेला गोपाळ पहिलवान हा पहिला पहिलवान ! तो मान मिळाला गोपाळ परिटला !!

हे हि वाच भिडू- 

Leave A Reply

Your email address will not be published.