गोपीचंद पडळकर काढणार सांगलीत भव्य गाढव मोर्चा.

जगात वाघांची संख्या कमी होत आहे म्हणून टेन्शन आलंय तर महाराष्ट्रात गाढवांची संख्या कमी होत आहे म्हणून आंदोलन होतंय. गाढवावर बसून धिंड काढलेलं आपण पाहिलंय पण हा गाढव मोर्चा हे पहिल्यांदाच ऐकतोय!!

गाढव !! जगातला सर्वात उपेक्षित प्राणी. आधीच त्याच्यावर मूर्खपणाचा शिक्का मारला गेलाय त्यात पडलं गरीब. कधी कोणाला उलट बोलत नाही गप्प गुमान खाली मान घालून जगाची ओझी वाहात असत. पण रागाला आलं तर एका लाथेत भल्या भल्यांना शहाण करून सोडत. जत्रेवेळी गावात येणारं पन्नालाल गाढव तर भल्या भल्याची पोलखोल करत. गाढवाची किमत कोणाला कळत नाही.

गेल्या आठवड्यात महादेवराव जानकर यांच्या पशुसंवर्धन मंत्रालयाने चिंता व्यक्त केली होती की राज्यात गाढवाचे प्रमाण कमी होत चालले आहे. गाढवांच्या संवर्धनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांना देखील नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.     

सध्या अख्खा महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. पाऊसपाण्याचं नियोजन नेहमी प्रमाणे विस्कटलय. मायबाप शेतकरी हवालदिल झालाय. दुष्काळ आला की सर्वात प्रथम चर्चा सुरु होते चारा छावण्या कधी सुरु होणार? पोटच्या पोराप्रमाणे जपलेलं पशुधन डोळ्यासमोर पाण्याअभावी तडफडताना दिसलं की शेतकऱ्याचा जीव तुटतो.

यावर्षी उशिरा का होईना पण अखेर निवडणुकीच्या धामधुमीत चारा छावण्या सुरु झाल्या. पण प्रश्न काही मिटलेले नाहीत. पाण्याचं राजकारण पेटतचं चाललंय आणि छावणी मालकांना अजूनही अनुदान मिळालेल नाही आहे. स्वतःच्या खिशातून पैसा भरून या छावण्या चालवल्या जात आहेत. दुष्काळामुळे जनतेचा आक्रोश वाढत चालला आहे.

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काल सांगली जिल्ह्याचे बहुजन वंचित आघाडीचे नेते श्री. गोपीचंद पडळकर यांनी काल पत्रकार परिषद घेतली. दुष्काळाबद्दलचे बरेच प्रश्न त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मांडले. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी घोषणा केली,

“२१ मे रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य गाढव मोर्चा नेणार”

सांगली जिल्ह्यात अपुऱ्या चारा छावण्या आहेत. त्यातही गाढव, शेळ्या मेंढ्या,घोडा या जनावरांना स्थान नाही. गरीब वडर समाज, धनगर समाज हा जगण्यासाठी या प्राण्यांवर अवलंबून आहे. प्राणी त्यांच्यासाठी पशुधन आहेत. छावण्यामध्ये या प्राण्यांना प्रवेश नसल्यामुळे चारा पाणी अभावी त्यांनी जावे कुठे? जर हा प्रश्न त्यांनी तिथे उपस्थित केला.

आज गाढव, घोडा,शेळी मेंढीसारखे  प्राणी व त्यांच्यावर आपल घर चालवनाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात भरपूर आहे. जर हे प्राणी जगले नाहीत तर ग्रामीण गाव गाड्यावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. म्हणूनच वंचित बहुजन आघाडी तर्फे पडळकर यांनी मागणी केली आहे की या प्राण्यांनाही चारा छावणीमध्ये स्थान मिळाव, त्यांना दुष्काळात जगवण्यासाठी चारा पाण्यासाठी अनुदान देण्यात यावं. आणि प्रशासनाने या मागण्यांवर काही कार्यवाही केली नाही तर २१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा गाढव मोर्चा काढणार असल्याच त्यांनी जाहीर केलं.

‘मंत्र्यांनी बिनकामाचे दुष्काळी दौरे करू नयेत. मंत्र्यांना दुष्काळी भागात फिरू देणार नाही. फक्त फॉर्मेलिटी नको, दुष्काळाच्या नावाखाली फक्त सहली चालू देणार नाही. हे मंत्री जिल्ह्यात दिसले तर वंचित आघाडीकडून रोखू,’ असा इशाराही त्यांनी या ठिकाणी दिला.

फक्त प्रशासनचं नव्हे तर समाजातल्या दानशूर भूतदया असणाऱ्या व्यक्तींनी, कृष्णा खोऱ्यातल्या कारखानदारांनी, उद्योगपतींनी या प्राण्यांना जगवण्यासाठी पुढे यावे हे आवाहनही यानिम्मिताने करण्यात आलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.