नाराज झालेल्या गोपीनाथ मुंडेंनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला अन् दिल्ली हादरली…

२००८ सालचा एप्रिल महिना. उन्हाळा तापला होता पण महाराष्ट्र भाजपमध्ये वातावरण वेगळ्याच कारणाने पेटलं होतं. कारण ठरलं होतं माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेंनी आपल्या सर्व पदांचा दिलेला राजीनामा.

याची सुरवात झाली होती मुंबई भाजपच्या अध्यक्षावरून.

गेली अनेक वर्षे भाजपचे महाराष्ट्रातले राजकारण मुंडे महाजन या दोन नावाभोवती फिरत होतं. अगदी कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी बहुजन ओबीसी समाजाच्या तरुणांना भारतीय जनता पक्षात आणलं. काहीच अस्तित्व नसलेल्या भाजपला उभं केलं ते मुंडे आणि महाजनांनी. महाजन केंद्रात आणि मुंडे महाराष्ट्रात अशी त्यांच्यात वाटणी देखील झाली होती. वाजपेयींच्या पासून ते नगरसेवक पदावर असलेल्या छोट्या कार्यकर्त्यापर्यंत त्यांचा सहज संपर्क होता.

नागपूरमध्ये देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस या तरुण नेत्याला प्रोत्साहन देऊन मोठं केलं होतं.

देवेंद्र फडणवीस हे माजी विधानपरिषद आमदार गंगाधरपंत फडणवीस यांचे चिरंजीव. अनेक वर्षे त्यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघ जिंकला होता. गंगाधर फडणवीसांना मुंडे आणि महाजन खूप मानायचे. विशेषतः प्रमोद महाजन जेव्हा जेव्हा नागपुरात जायचे तेव्हा गंगाधरपंतांच्या घरीच उतरायचे. रात्री त्यांच्या होणाऱ्या घनघोर चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर पडूनच त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले.

प्रमोद महाजन हे जेव्हा कधी नागपूरमधल्या भाजप मिटिंगला जायचे तेव्हा देवेंद्र फडणवीसांना सोबत न्यायचे.

ते १७ वर्षांचे असताना गंगाधर फडणवीस यांचं निधन झालं. त्यांच्या जागी नितीन गडकरी यांना नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं तिकीट देण्यात आलं. त्यावेळी प्रमोद महाजन नागपुरात आले होते. ते नितीन गडकरी यांना थेट म्हणाले होते कि

जेव्हा देवेंद्र २१ वर्षांचा होईल तेव्हा हि जागा त्याच्यासाठी सोडावी लागेल.

देवेंद्र फडणवीस आणि महाजन-मुंडे यांचं नातं असं जवळकीचं होतं. त्यांच्यामुळेच फडणवीस यांना लहान वयातच नागपूरचा महापौर होण्याची संधी मिळाली. पुढे नागपूरमधून आमदारकीचं तिकीट मिळालं. नागपूरच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे मुंडे गटाचे मानले जायचे.

दुसरा गट होता नितीन गडकरी यांचा. गडकरी हे जेष्ठ नेते होते. युतीच्या शासनात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून चमकदार कामगिरी केली होती. त्यांनी केलेल्या मुंबई पुणे एक्प्रेसवेमुळे  अगदी देशपातळीवर देखील त्यांना ओळखलं जाऊ लागलं होत.

पुढे प्रमोद महाजनांचा मृत्यू झाला तेव्हा नितीन गडकरी यांना भावी नेतृत्व म्हणून केंद्रातून बळ देण्यात आलं. गडकरींनी मुंडे समर्थक नेत्यांच्या जागी आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यास सुरवात केली. यातूनच अंतर्गत खटके उडण्यास सुरवात झाली. मुद्दाम डावललं जात असल्यामुळे मुंडे नाराज होऊ लागले.

विनोद तावडे यांना विधानपरिषद सदस्य पद दिल्यामुळे देखील मुंडेंचे केंद्रीय नेतृत्वाशी वाद झाले होते.

२००८ साली मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून मधु चव्हाण यांची निवड झाली आणि वादाला भडका उडाला. 

मधु चव्हाण हे देखील एकेकाळचे मुंडे समर्थक. दोघांनी विद्यार्थी दशेपासूनच संघ परिवारात एकत्र कार्य केलं होतं. पण पुढे मुंडे वेगाने प्रगतीच्या पायऱ्या चढत गेले आणि त्या मानाने मधु चव्हाण भाजपमध्ये  मागे पडले. दोघांच्यात काही वाद देखील झाले. दोघांचे मार्ग वेगळे झाले.

मधु चव्हाण यांनी गडकरी गटात जाणे पसंत केले. पुढे जेव्हा त्यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष करण्यात आले तेव्हा मुंडें यांच्या संतापाचा कडेलोट झाला. त्यांनी

तडकाफडकी आपल्या भाजपमधल्या सगळ्या पदांचा राजीनामा देऊन टाकला. 

मुंडे यांचा राजीनामा म्हणजे भाजपसाठी मोठा भूकंप होता. ते लोकनेते होते. त्यांच्या पाठीशी तळागाळातल्या कार्यकर्त्यांची मोठी ताकद होती. मुंडेंची नाराजी पक्षाला परवडणारी नव्हती. 

त्यांच्या राजीनाम्याने क्रांती केली. कधी नव्हे ते राज्यातील भाजपच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी त्याला पाठिंबा द्यायला आपापल्या पदांचे राजीनामे दिले. ते देणाऱ्यांत सुधीर मुनगंटीवार होते, देवेंद्र फडणवीस होते आणि चंद्रपूरचे हंसराज अहिर या खासदारांपासून पुण्याच्या गिरीश बापट या आमदारांपर्यंतचे सारेच होते. तसे करणाऱ्यांत जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, नगराध्यक्ष आणि नगरसेवकही होते.

त्या एका घटनेने लोकनेता म्हणजे काय आणि त्याची ताकद केवढी, याची जाणीव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला प्रथमच झाली. त्याआधीच्या ज्या पुढाऱ्यांनी संघ-जनसंघाचे राजीनामे दिले, ते काही काळातच विस्मृतीच्या आड गेले व विझले होते. मुंडेंच्या राजीनाम्याने मात्र वणवा पेटवला होता.

मुनगुंटीवार फडणवीसांसारखे शेकडो नेते कार्यकर्ते राजीनामा देत आहेत म्हटल्यावर भाजपला एक पाऊल मागे घ्यावं लागलं आणि मधु चव्हाण यांची मुंबई अध्यक्ष पदावरून तीन दिवसात हटवलं व त्यांच्या जागी मुंडे समर्थक गोपाळ शेट्टी यांची निवड करण्यात आली.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.