मुंडेंनी एका कोऱ्या कागदाच्या जोरावर विधिमंडळाचं अधिवेशन गाजवलं होतं…

प्रचारसभा गाजवणे आणि विधिमंडळाचं सभागृह गाजवणे यात प्रचंड मोठा फरक असतो. भर वाघ असणारे भले भले नेते विधिमंडळात आल्यावर शेळी होऊन गेलेलं उदाहरण आपण पाहत असतो. मोठमोठी भाषणे ठोकणारी मंडळी अनेकदा संपूर्ण अधिवेशनात तोंड देखील उघडताना दिसत नाहीत.

जनतेची नस पकडणे आणि विरोधकांच्या प्रश्नांना अभ्यासू उत्तर देणे हे फक्त काही मोजक्याच नेत्यांनाच जमत असते. 

यातच प्रमुख नाव येते कै.गोपीनाथ मुंडे साहेबांचं.

नव्वदच्या दशकातला काळ. महाराष्ट्रात युतीचं सरकार होतं. शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री, तर भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदाच काँग्रेस विरोधी पक्षात गेली होती.  तेव्हाचे त्यांचे प्रमुख नेते शरद पवार राष्ट्रीय राजकारणात गेले होते. यामुळे विधिमंडळात किल्ला लढवण्याची जबाबदारी तरुण नेत्यांवर होती.

सगळ्यात आघाडीवर होते विधानपरिषदेचे नेते छगन भुजबळ. शिवसेनेशी त्यांचा उभा दावा होता.

एकेकाळी छगन भुजबळ हे शिवसेनेत होते. सेनेतून आमदार फोडून बाहेर पडल्यामुले त्यांच्यावर शिवसैनिक चिडून होते. त्याकाळात भुजबळांवर अनेक हल्ले देखील झाले होते. सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांना लखोबा लोखंडे म्हणायचे तर भुजबळांनी देखील त्यांच्यावर एकेरीवर जात टीका केली होती.

एकूणच छगन भुजबळ आणि शिवसेना यांचे संबंध विकोपाला गेले होते. युती सरकारवर टीका करायची एकही संधी ते सोडत नव्हते.

असाच एक प्रसंग. एकदा अधिवेशन काळात भुविदोधी पक्षाने अचानक गृह विभागाच्या कसल्या तरी प्रस्तावावर चर्चा सुरु केली. छगन भुजबळ पेटले होते. त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. एकेकाळचा शिवसैनिक हि ओळख सार्थ करत ते आक्रमकपणे आपले प्रश्न मांडत होते. त्यांनी धारेवर धरलेलं असताना सरकारकडे मात्र या प्रश्नांना उत्तरे नव्हती.

तेव्हाचे गृहमंत्री गोपीनाथराव मुंडे सभागृहात हजर नव्हते. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री मनोहर जोशींवर येऊन पडली होती. या विषयावर प्रश्न उभा राहील याची सरकारमध्ये कोणालाच कल्पना नव्हती. युतीच्या सगळ्या जेष्ठ मंत्र्यांना घाम फुटला होता. आता उत्तर दिल नाही तर उद्या मातोश्रीवर उत्तर द्यावे लागणार याचा अंदाज जोशी सरांना होता.

मुंडे साहेबांना शोधून आणा म्हणून कोणाला तरी पाठवण्यात आलं. निरोप मिळाल्यावर गोपीनाथराव लगबगीने सभागृहात आले.  

भुजबळांनी काय आरोप केलेत याची माहिती मुख्यमंत्र्यानी मुंडे यांना दिली. भुजबळ खाली बसताच मुंडे उभे राहिले. त्यांना देखील हा प्रश्न उपस्थित राहील याची कल्पना नव्हतीच त्यामुळे ते काय उत्तर देतात याकडे जोशी सरांचं सुद्धा लक्ष लागलं.

मुंडे साहेब बोलायला उभे राहिले. त्यांनी आपल्या एका फायलींतून एक कागद काढला व तो हातात धरून उत्तर देण्यास सुरवात केली. भुजबळांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं व वरतून हातातला कागद फडकवत माझ्या याची आकडेवारी आहे असं ठासून सांगितलं.

विरोधी पक्षाच्या प्रत्येक बाउन्सरला सिक्स मारून मुंडे साहेब खाली बसले. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजरात दणाणून गेला. मनोहर जोशींचा जीव भांड्यात पडला.

नारायण राणे तेव्हा महसूल मंत्री होते. त्यांनीदेखील मुंडेंचं कौतुक केलं. बोलता बोलता सहज नेमकी आकडेवारी काय आहे, हे पाहण्यासाठी मुंडेंच्या जवळचा तो कागद हातात घेतला तर पाहतात तर तो कागद कोरा होता. मुंडे साहेबांनी आपल्या समयसूचकतेच्या बळावर विरोधकांवर बाजी मारली होती.

नारायण राणे एकेठिकाणी हा किस्सा सांगताना म्हणतात, ज्या तडफदारपणे त्यांनी भाषण केले ते ऐकून कुणाच्या मनात शंका आली नाही. हे कौशल्य व हा अभ्यास फक्त मुंडेंकडे होता.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.