गोपीनाथ मुंडेंनी रागातच रिक्षा पकडली अन् खडसेंना कळालं गोपीनाथ मुंडेचा राग साधी गोष्ट नाही..
“गोपीनाथ मुंडे या महाराष्ट्रात असते, तर त्यांनी या महाराष्ट्रातील राजकीय स्थिती बदलली असती. त्यांनी या महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपद बदललं असतं. महाराष्ट्राच्या राजकारणात मागील ५-७ वर्षात जे अनुभवलं तो प्रकार झाला नसता.
गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात राज्याची आणखी भरभराट झाली असती. दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे आम्हाला अचानक सोडून गेले,”
एकनाथ खडसे…
जळगाव येथील एका कार्यक्रमात बोलत असताना फडणवीसांवरचा राग खडसेंनी गोपीनाथराव मुंडेची आठवण करून काढला. खडसे आत्ता राष्ट्रवादीत आहेत. पण राष्ट्रवादीत आले तरी ते ॲक्टिव्ह नसतातच. मात्र जेव्हा कधी त्यांना बोलण्याची संधी मिळते तेव्हा आपला सगळा राग ते फडणवीसांवर काढतात. जळगाव येथील सभेत देखील तेच झालं. फडणवीसांवरचा राग काढत असताना त्यांना गोपीनाथ मुंडे असते तर काय झालं असतं हे सांगितलं..
पण गोपीनाथराव मुंडे आणि खडसेंचे संबध कसे होते. तर एकाच पक्षात असल्याने तसे ते चांगलेच होते. खडसे गोपीनाथरावांना आपल्या गुरूच्या ठिकाणीच मानायचे. पण कधीकधी खडसेंकडून चुका व्हायच्या आणि गोपीनाथरावांचा राग बाहेर निघायचा..
असाच एक किस्सा २०१४ च्या निवडणूकांचा..
फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात भाजपची लाट आली होती. नरेंद्र मोदींच्या हाती नेतृत्व देऊन पक्षाने घेतलेला धाडसी निर्णय त्यांच्या बाजूने निर्णय देत आहे याची चिन्हे दिसू लागली होती. पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं. नरेंद्र मोदी जागोजागी प्रचाराचा धडाका उडवत होते. ते आपल्या मतदारसंघात देखील यावेत याची प्रत्येक नेत्याला इच्छा होती.
२० एप्रिल २०१४. राज्यातले भाजपचे सर्वात जेष्ठ नेते म्हणून गोपीनाथ मुंडे विमानाने जळगावला सभेला आले. नेहमीप्रमाणे त्यांची जोरदार सभा झाली. प्रचंड गर्दीमुळे यंदाचं वातावरण आपल्या बाजूने फिरतंय याचा गोपीनाथ मुंडेंना देखील अंदाज आला होता.
जळगाव-धुळे-रावेर या भागात भाजपचे खासदार हमखास निवडून येतील अशीच स्थिती होती. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यादेखील निवडणुकीला उभ्या होत्या.
नेहमी प्रमाणे सभा झाली, गोपीनाथ मुंडे हॉटेलमधून विमानतळाकडे परत जाण्यासाठी निघाले. हॉटेलच्या बाहेर आल्यावर त्यांना दिसलं की, त्यांना विमानतळावर सोडण्यासाठी भाजपाचा कुणीही कार्यकर्ता आलेला नाही. दुसऱ्याच दिवशी नरेंद्र मोदी यांची सभा होणार असल्यामुळे सगळे कार्यकर्ते त्यातच बिझी होते.
गोपीनाथ मुंडे काही बोलले नाहीत. त्यांनी थेट तिथली एक रिक्षा पकडली आणि ते विमानतळाकडे जाण्यासाठी निघाले.
मुंडे रिक्षाने रवाना झाल्याचे कळताच जळगावात प्रचंड खळबळ उडाली. मुंडे विमानतळाकडे जात असताना सर्व कार्यकर्ते एकनाथ खडसेंच्या बंगल्यावर त्यानंतरच्या रविवारी होत असलेल्या नरेंद्र मोदींच्या सभेची चर्चा, तयारीत गुंतले होते. मात्र, मुंडे रिक्षाने विमानतळाकडे रवाना झाल्याची बातमी खडसेंच्या बंगल्यावर धडकताच कार्यकर्तेच काय नेत्यांना देखील घाम फुटला.
खडसेंनी माजी आमदार गुरूमुख जगवानी यांना तातडीने पाठवलं. जगवाणी यांनी आपल्या कारने मुंडेंची रिक्षा गाठली व झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. तरी मुंडेंचा राग शांत झालेला नव्हता.
मध्यभागी रिक्षा आणि मागेपुढे पोलीस अशी ही संतप्त नेत्याची आस्त कदम मिरवणुक पुढे जातच राहिली. अखेर अजिंठा चौफुली जवळ परत जगवानींनी माफी मागत गोपीनाथ मुंडे यांना कारमध्ये बसण्याची विनंती केली. तो पर्यंत मुंडे शांत झालेले होते. यानंतर रिक्षातून उतरून ते कारने विमानतळाकडे रवाना झाले.
कोणी कितीही नेते येऊ देत महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे या नावाचा दरारा कायम आहे हेच या निमित्ताने सिद्ध झाले होते.
हे ही वाच भिडू:
- मुंडे म्हणायचे, मी ज्या ज्या वेळेला जॅकेट घालतो तेव्हा विलासरावांची आठवण येते
- पक्ष कोणताही असो उदयनराजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे गोपीनाथ मुंडेच होते.
- जोशी सर समोर जावून वाद घालत होते तेवढ्यात मुंडेंनी डाव साधला.
- मुंडेंनी वशिला लावला आणि हर्षवर्धन पाटील विलासरावांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले.