या घटनेचा राजकीय फायदा उठवता आला असता पण मुंडे म्हणाले, “ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.”

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. स्व.गोपीनाथ मुंडे तेव्हा राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. विधिमंडळाच्या सभागृहात आणि सभागृहाबाहेर त्यांची तोफ नेहमी धडधडत असायची. खरतरं गोपीनाथ मुंडेकडे योगायोगानेच विरोधी पक्ष नेतेपद आलं होतं.

१९९० च्या निवडणूकांमध्ये युतीमध्ये ५२ आमदारांसह शिवसेना मोठा भाऊ ठरला होता. तर ४२ आमदारांसह भाजपा छोटा भाऊ होता. त्यामुळे सुरुवातीला सेनेचे मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते. मात्र, छगन भुजबळांनी पक्ष फोडल्यानं शिवसेनेच संख्याबळ घटलं आणि विधानसभेत भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.

त्यानंतर पक्षानं गोपीनाथ मुंडे यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद दिलं होतं.

मुंडे सभागृहात सत्ताधारी काँग्रेसवर अक्षरशः तुटून पडायचे. संसदीय आयुध वापरुन त्यांनी रान उठवलं होते. त्या आठवणी आजही भाजपचे जुने नेते आणि कार्यकर्ते काढतात. आरक्षण, मंडल आयोग, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा प्रश्नांकडे गांभीर्यानं बघतं मुद्याचं राजकारण करण्यावर भर दिला.

हे सगळं सुरु असताना अशातचं दुसरीकडे १९९२ साली बाबरी मस्जिद पाडल्यानंतर मुंबईत दंगली उसळल्या होत्या. त्यावेळी अशांत मुंबईला शांत करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी सुधाकरराव नाईक यांच्या जागी शरद पवारांना मुख्यमंत्री म्हणून पाठवलं.

अशा वेळी राज्यात जर सत्ता मिळवायची असेल तर मुख्य आव्हान हे शरद पवारांचे होतं आणि त्याची गोपीनाथ मुंडेंना पूर्ण जाणीव होती. लढवय्या नेता अशी ओळख असलेल्या गोपीनाथ मुंडेंनी हे आव्हान स्वीकारलं.

त्यावेळी शरद पवार यांच्या विरोधात ३ लोकांनी मोर्चा काढला होता. एक अण्णा हजारे, दोन गोविंद खैरनार आणि तीन गोपीनाथ मुंडे.

अण्णा हजारे आणि खैरनार यांनी सरकार किती आणि कसा भ्रष्टाचार करत आहे हे सांगायला सुरुवात केली. तर तिकडे मुंडेंनी भारतीय राजकारणाला एक नवीन शब्द दिला राजकारणाच गुन्हेगारीकरण. याबाबतीत त्यांनी पवारांना जेरीस आणलं.

जे.जे. हत्याकांडातले आरोपी पवारांबरोबर विमानात होते, हे सिद्ध झालं असल्याचं सांगण्यात आलं. जळगाव सेक्स स्कॅण्डलमध्ये केवळ मुंडे यांच्या आरोपानंतर केस झाली. पप्पू कलानीने जमवलेल्या पैशाचा मुद्दा ऐरणीवर आला. गुन्हेगार आणि राजकारण्यांच्या भेटीमुळे अभद्र युती म्हणतं मुंडेंनी तोफ चालवली.

आणि सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा काढायचं अंतिम झालं.

राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा मुद्दा लोकांसमोर आणायचा असेल तर लोकांच्यात मिसळायला हवं. त्यामुळे कॉंग्रेस सरकार विरोधात १९९४ मध्ये संघर्ष यात्रा काढायची असा निर्णय मुंडेंनी घेतला. त्यासाठी शिवनेरी ते शीवतीर्थ असा मार्ग ठरला.

या संघर्ष यात्रेची मूळ कल्पना गोपीनाथराव मुंडे आणि प्रमोद महाजन या दोघांची होती. या दोघांचे जुने मित्र माजी प्रदेशाध्यक्ष जयसिंगराव गायकवाड हे या यात्रेचे सारथी होते.

४५ दिवस चाललेल्या या संघर्ष यात्रे दरम्यान मुंडेनी जवळपास १५० च्यावर सभा घेऊन राज्यातील वातावरण ढवळून टाकलं. दाऊद इब्राहिमच्या मुसक्या बांधून आणू, एन्रॉन समुद्रात बुडवू, अशा एकाहून एक सनसनाटी घोषणा ही संघर्ष यात्रा राज्यभर प्रचंड गाजली.

नागपुरात झालेलं गोवारी प्रकरण असो की, जळगावचे कुप्रसिद्ध सेक्स स्कॅन्डल, शेतकर्‍यांचे प्रश्न असोत की बेरोजगारी किंवा कुपोषणाचा प्रश्न या विरोधात अवघ्या चाळीशीतील हा ग्रामीण नेता प्रभावी ठरत होता. शेतकरी, शेतमजूर तरुण यांच्यावर त्यांनी ठसा उमटवला.

रांगडा स्वभाव, कार्यकर्त्यांमध्ये मिसळणे हे त्यांचे विशेष गुण.  त्याकाळी भाजपची इमेज शेठजी आणि भटजींचा पक्ष अशी होती. पण मुंडेंनी तळागाळातल्या बहुजन समाजापर्यंत पक्षाला पोहचवलं. त्यांच्या या विक्रमी संघर्ष यात्रेचा हा परिणाम होता.

या यात्रेत एक दुर्दैवी घटना घडली. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे त्यांच्या संघर्ष यात्रेवर हल्ला झाला. गोळीबार झाल्याची चर्चा झाली. भाजपचे कार्यकर्ते पेटून उठले. हा हल्ला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या आदेशानुसार झाला असल्याचं बोललं गेलं. गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर घणाघात करत होते म्हणून हा भ्याड हल्ला झाला असल्याची टीका काही भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

पण गोपीनाथ मुंडे शांत होते. त्यांनी पत्रकार परिषद बोलावली. त्यांना पत्रकारांनी थेट प्रश्न विचारला,

हा हल्ला शरद पवार यांनी घडवून आणला असेल काय?’

प्रचाराची रणधुमाळी सुरु होती. जर गोपीनाथ मुंडे यांनी या प्रश्नाला होकारार्थी उत्तर दिले असते तर त्यांना जनतेहसि प्रचंड सहानुभूती मिळाली असती. शरद पवारांच्या विरुद्ध त्यांनी धडाका लावला होताच , त्यात या प्रश्नाला फक्त एका शब्दाने होकार दिला असता तर राजकीय वणवा पेटून प्रचंड राजकीय फायदा उठवता आला असता.

पण गोपीनाथ मुंडेंनी तस केलं नाही. उलट ते म्हणाले,

‘राजकीय विरोधकावर असले हिंसक हल्ले करण्याची महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. या हल्ल्यात पवारांचा किंवा काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही.’

प्रचारात राजकीय लाभ उठवण्याची संधी असतानाही गोपीनाथराव मुंडे यांनी प्रचंड प्रगल्भता दाखवली. शरद पवारांवर त्यांनी झाडून टीका केली, मतभेद होते मात्र ते आपल्यावर हल्ला करणार नाहीत याचा प्रांजळ निर्वाळा मुंडेंनी दिला. हीच राजकीय सौहार्दता त्या काळच्या राजकारणाची ओळख होती.

याच सच्चेपणाच्या जोरावर मुंडेनी ती निवडणूक लढवली आणि जिंकली. शरद पवारांना सत्ता गमवावी लागली आणि गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री बनले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.