म्हणून लता दिदींचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करताना उपमुख्यमंत्री मुंडे उपस्थित नव्हते

१९९५ साली राज्यात युती सरकार सत्तेत आलं होतं. मुख्यमंत्री पदी होते सेनेचे मनोहर जोशी. सरकारला पाठिंबा जरी अपक्षांचा असला तरी सत्तेच्या सगळ्या नाड्या मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या हातात होत्या. बाळासाहेब म्हणजे मोठे कलासक्त व्यक्तीमत्व. स्वतः व्यंगचित्रकार. त्यामुळेच कलेल्या वाहिलेल्या लोकांचा सन्मान व्हायला पाहिजे असं त्यांचं मत होतं.

तेव्हा बाळासाहेबांनी ‘महाराष्ट्र भूषण’ ही संकल्पना मनोहर जोशी यांच्यासमोर ठेवली.

तत्कालीन सांस्कृतीक कार्यमंत्री अनिल देशमुख यांच्यावर यासंबंधीची सर्व जबाबदारी सोपवली आणि राज्यात १९९७ साली ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार चालू झाला. 

साहित्य, कला, खेळ, विज्ञान, समाज सेवा, पत्रकारिता, आरोग्य अशा क्षेत्रातील नामवंतांचा विचार झाला आणि पहिला पुरस्कार प्रख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. मात्र त्यावेळच्या पु.लं.च्या भाषणानं मोठं वादळ निर्माण केलं होतं, त्यावर झक मारली न तुम्हाला महाराष्ट्र भूषण दिला या बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या उत्तरावरून मोठा वाद उभा राहिला होता. 

त्यानंतर पुढच्याच वर्षीचा म्हणजे १९९८ सालचा पुरस्कार जाहीर झाला होता, जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांना. पण त्यांना जेव्हा हा पुरस्कार दिला जात होता तेव्हा मात्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे चांगलेच नाराज झाले होते, इतके की अगदी त्यांची माफी मागून राग घालवला लागला होता.

त्याच झालेलं असं की,

लता मंगेशकर यांना पुरस्कार घोषित झाला. मात्र त्यावर लगेचच मंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी हा पुरस्कार सोहळा नागपूरमध्ये आयोजित करण्याचा आग्रह मुख्यमंत्री मनोहर जोशींकडे धरला. ते मूळचे नागपूरचे. त्यातही तेव्हा देशमुख हे अपक्ष आमदार होते, आणि मनोहर जोशींच्या सरकारला अपक्षांचा टेकू होता.

मुख्यमंत्र्यांनी देखील शब्द खाली पडून न देता, देशमुखांची इच्छा लागलीच पूर्ण केली. सोहळा नागपूरला घेण्याचं अंतिम झालं. 

देशमुखांनी पण पुरस्कार सोहळ्याची अगदी जय्यत तयारी केली होती. दृष्ट लागावी असा झाला भव्य कार्यक्रम. शिवसेना, भाजप आणि अनिल देशमुखांच्या कार्यकर्त्यांची तोबा गर्दी. प्रमुख पाहुण्यांची रेलचेल, उत्कृष्ट अशी रोषणाई.

इकडे कार्यक्रम सुरु झाला, पण आयत्या वेळी माशी शिंकली. सोहळ्याला गालबोट लागलं.

पुरस्कार प्रदान होतं असताना अर्धी हिस्सेदारी म्हणून भाजपचा पाठींबा असलेल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे कुठेच दिसतं नव्हते.

मग ते कुठे होते? तर मुंडे चक्क मंत्रालयातील पाचव्या मजल्यावर एका गावातील पाण्याच्या प्रश्नावर बैठक घेत बसले होते.

ही गोष्ट नेमकी मंत्रालयातील काही पत्रकारांच्या लक्षात आली. नागपूरला एवढा मोठा शानदार सोहळा असताना, मुंडे साहेब मंत्रालयात कसे..! काही तरी गडबड असल्याची पत्रकारांच्या मनात पाल चुकचुकली. तेव्हा पत्रकारांनी सुरू असलेल्या बैठकीत घुसून आपण नागपूर सोडून मंत्रालयात कसे बसला? ही मनातील शंका मुंडेंना बोलून दाखवली.

मग काय त्यांनी हसत हसत आपल्या गंमतीदार शैलीत उत्तर दिलं,

जिथं आमंत्रण नाही, तिथे जात नाही.

हे ऐकुन काही वेळ पत्रकारांना कळेनाच. मुंडे साहेब नेमकं काय म्हणताय म्हणून त्यांनी पुन्हा विचारलं. अखेर त्यावर निमंत्रण पत्रिकाच दाखवत पत्रकारांना विचारलं की,

तुम्हाला या पत्रिकेत कुठे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे असं नाव दिसते का?

तेव्हा पत्रकारांना कळालं की, त्यांना मनोहर जोशी यांनी मुद्दाम नागपूरला घेऊन जायला डावललं होतं, त्यामुळे मुंडे साहेब नाराज होऊन मंत्रालय बसले होते. दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रांच्या हेडलाईन्स दिसल्या.

‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार आमंत्रणावरुन गोपीनाथ मुंडे नाराज’

सकाळी – सकाळी जेव्हा मुख्यमंत्र्यांसहित अख्या मंत्रिमंडळानं ही बातमी बघितली तेव्हा तत्कालीन मंत्री प्रमोद नवलकर यांनी मुंडेंची नाराजी घालवण्याचं काम फत्ते केलं. त्यांनी आपल्या देवगिरी बंगल्यातून रामटेक बंगल्यावर चालत जावून गोपीनाथ मुंडे यांची माफी मागतली होती. आज ही महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला की मंत्रालयातील तत्कालीन पत्रकारांना हा किस्सा हमखास आठवतो.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.