गोपीनाथ मुंडेंच्या त्या सुप्रसिद्ध संघर्षयात्रेमुळेच शरद पवारांचं सरकार पडलं….

गेली काही दिवस सुरु असलेले विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रचंड गाजताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस विधानसभेत सरकारला एका एका मुद्यावर घेरण्याचा प्रयत्न केला. अनेकदा ते ठाकरे सरकारला  घेरण्यात यशस्वी देखील होताना दिसले. एक सक्षम  विरोधी पक्ष नेते कसा असावा हे त्यांनी या अधिवेशनात दाखवून दिलं होतं.

पण सभागृहासोबतच सभागृहाबाहेर देखील विरोधी पक्ष नेता कसा असतो हे ९० च्या दशकात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी दाखवून दिलं होतं. १९९४ साली काढलेली त्यांनी काढलेली संघर्ष यात्रा काँग्रेसचं सरकार पडण्याचं एक महत्वाचं कारण बनली होती.

खरतरं गोपीनाथ मुंडेकडे योगायोगानेच विरोधी पक्ष नेतेपद आलं होतं.

१९९० च्या निवडणूकांमध्ये युतीमध्ये ५२ आमदारांसह शिवसेना मोठा भाऊ ठरला होता. तर ४२ आमदारांसह भाजपा छोटा भाऊ होता. त्यामुळे सुरुवातीला सेनेचे मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते. मात्र, छगन भुजबळांनी पक्ष फोडल्यानं शिवसेनेच संख्याबळ घटलं आणि विधानसभेत भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.

त्यानंतर पक्षानं गोपीनाथ मुंडे यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद दिलं होतं.

मुंडे सभागृहात सत्ताधारी काँग्रेसवर अक्षरशः तुटून पडायचे. संसदीय आयुध वापरुन त्यांनी रान उठवलं होते. त्या आठवणी आजही भाजपचे जुने नेते आणि कार्यकर्ते काढतात. आरक्षण, मंडल आयोग, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा प्रश्नांकडे गांभीर्यानं बघतं मुद्याचं राजकारण करण्यावर भर दिला.

हे सगळं सुरु असताना अशातचं दुसरीकडे १९९२ साली बाबरी मस्जिद पाडल्यानंतर मुंबईत दंगली उसळल्या होत्या. त्यावेळी अशांत मुंबईला शांत करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी सुधाकरराव नाईक यांच्या जागी शरद पवारांना मुख्यमंत्री म्हणून पाठवलं.

अशा वेळी राज्यात जर सत्ता मिळवायची असेल तर मुख्य आव्हान हे शरद पवारांचे होतं आणि त्याची गोपीनाथ मुंडेंना पूर्ण जाणीव होती. लढवय्या नेता अशी ओळख असलेल्या गोपीनाथ मुंडेंनी हे आव्हान स्वीकारलं.

त्यावेळी शरद पवार यांच्या विरोधात ३ लोकांनी मोर्चा काढला होता. एक अण्णा हजारे, दोन गोविंद खैरनार आणि तीन गोपीनाथ मुंडे.

अण्णा हजारे आणि खैरनार यांनी सरकार किती आणि कसा भ्रष्टाचार करत आहे हे सांगायला सुरुवात केली. तर तिकडे मुंडेंनी भारतीय राजकारणाला एक नवीन शब्द दिला राजकारणाच गुन्हेगारीकरण. याबाबतीत त्यांनी पवारांना जेरीस आणलं.

जे.जे. हत्याकांडातले आरोपी पवारांबरोबर विमानात होते, हे सिद्ध झालं असल्याचं सांगण्यात आलं. जळगाव सेक्स स्कॅण्डलमध्ये केवळ मुंडे यांच्या आरोपानंतर केस झाली. पप्पू कलानीने जमवलेल्या पैशाचा मुद्दा ऐरणीवर आला. गुन्हेगार आणि राजकारण्यांच्या भेटीमुळे अभद्र युती म्हणतं मुंडेंनी तोफ चालवली.

आणि सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा काढायचं अंतिम झालं.

राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा मुद्दा लोकांसमोर आणायचा असेल तर लोकांच्यात मिसळायला हवं. त्यामुळे कॉंग्रेस सरकार विरोधात १९९४ मध्ये संघर्ष यात्रा काढायची असा निर्णय मुंडेंनी घेतला. त्यासाठी शिवनेरी ते शीवतीर्थ असा मार्ग ठरला.

४५ दिवस चाललेल्या या संघर्ष यात्रे दरम्यान मुंडेनी जवळपास १५० च्यावर सभा घेऊन राज्यातील वातावरण ढवळून टाकलं. दाऊद इब्राहिमच्या मुसक्या बांधून आणू, एन्रॉन समुद्रात बुडवू, अशा एकाहून एक सनसनाटी घोषणा ही संघर्ष यात्रा राज्यभर प्रचंड गाजली.

नागपुरात झालेलं गोवारी प्रकरण असो की, जळगावचे कुप्रसिद्ध सेक्स स्कॅन्डल, शेतकर्‍यांचे प्रश्न असोत की बेरोजगारी किंवा कुपोषणाचा प्रश्न या विरोधात अवघ्या चाळीशीतील हा ग्रामीण नेता प्रभावी ठरत होता. शेतकरी, शेतमजूर तरुण यांच्यावर त्यांनी ठसा उमटवला

१९९५ चं सालं उजाडताना मुंडेंनी जनमत युतीच्या बाजूनं वळवलं होतं. त्यावर्षीच्या निवडणुकांत मुंडेंनी भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिले. काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला.

भाजप-शिवसेना युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या भाजप–सेनेच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले व राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांचा १४ मार्च १९९५ रोजी शपथविधी झाला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.