बाळासाहेब म्हणाले, “उज्वल निकम हा पवारांचा माणूस आहे…”

गोपीनाथ मुंडे. आजवर महाराष्ट्राला लाभलेल्या सर्वात कार्यक्षम गृहमंत्र्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. आजही अनेक अधिकारी त्यांनी मुंबईमधून अंडरवर्ल्डच विश्व कस खणून काढलं याबद्दलच्या आठवणी अभिमानाने सांगतात.

मुंडे आपल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे, त्यांच्यावर विश्वास टाकायचे. त्यामुळे काम करायला स्वातंत्र्य मिळायचं. याचा फायदा प्रशासनात अनेकांना झाला.

असाच त्यांच्या सच्चेपणाचा किस्सा उज्वल निकम यांनी एकेठिकाणी सांगितलं आहे.

आज सुप्रसिद्ध सरकारी वकील म्हणून ओळखले जाणारे उज्वल निकम हे पहिल्यांदा चर्चेत आले ते १९९३ सालच्या बॉम्बस्फोट केसपासून. यापूर्वी ते जळगाव येथे वकिली करत होते. त्यांना शरद पवार मुख्यमंत्री असताना बॉम्बस्फोट खटल्यासाठी मुंबईला बोलावून घेण्यात आले.

मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट हि संपूर्ण भारताला नाहीच तर जगभराला धडकी भरवणारी घटना होती. यात अंडरवर्ल्ड सोबतच पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनांचा हात होता. संजय दत्तसारख्या फिल्मसेलिब्रिटीला देखील अटक झाली होती. अत्यंत गुंतागुंतीची केस असल्याने मीडियाचे बारकाईने याकडे लक्ष होते.

या बॉम्बस्फोट खटल्यात सरकारी वकील म्हणून  उज्वल निकम यांच्यावरील जबाबदारी वाढली होती.

मधल्या काळात सरकारे बदलली. शरद पवारांच्या जागी शिवसेना भाजप युतीचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. एकदा उज्वल निकमांना पोलीस आयुक्तांकडून निरोप आला की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भेटायला बोलावलं आहे. बाळासाहेबांनी उज्वल निकम यांना संजय दत्त निर्दोष असून त्याला सोडण्याचे आदेश दिले. उज्वल निकम यांचं म्हणणं होतं की,

“संजय दत्तला सोडायचे तर आणखी दहा-बारा गुन्हेगारांना सोडावे लागेल.’’

उज्वल निकम आपल्या मुलाखतीमध्ये सांगतात की त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका शिवसैनिकाने ‘‘तुम्ही सरकारचे नोकर आहात. सरकार आमचे आहे आणि बाळासाहेब हेच सरकार आहेत. त्यांचा शब्द हा अंतिम असतो. तुम्हाला तसेच वागावे लागेल.’’ अशी धमकी दिली.

पण उज्वल निकमांनी या आदेशाला मान्य करण्यास नकार दिल्यावर बाळासाहेबांनी थेट मुख्यमंत्री मनोहर जोशी याना फोन केला आणि खटल्याचे कामकाज त्यांच्याकडून काढून घेण्यास सांगितले.

उज्वल निकम ‘मातोश्री’वरून बाहेर पडले. त्यांनी जळगाव येथे परतण्याची मनाची तयारी केली. ते पोलीस आयुक्तांच्या ऑफिसमध्ये पोहचले’. इतक्यात आयुक्तांना गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा फोन आला. ते म्हणाले,

 ‘‘उज्ज्वल निकम यांची मी सगळी माहिती काढली आहे. ते प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ वकील आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांना परत जाऊ देऊ नका…’’

पोलीस आयुक्तांना व निकम याना मुंडे यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावले. उज्वल निकम याना हटवण्याच्या निर्णयाबद्दल मुंडेंनी जोशींना फोन करून विचारणा केली. हा आदेश ‘मातोश्री’चा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. गृह खाते मुंडेंच्याकडे असल्यामुळे कारवाई त्यांनाच करायची होती पण काहीही करून निकम यांना केस वरून हटवायचे असे ठरले होते.

अखेर गोपीनाथ मुंडे यांनी उज्वल निकम यांच्यादेखत बाळासाहेबांना फोन केला. ते म्हणाले,

‘‘साहेब, उज्ज्वलची सर्व माहिती मी काढली आहे. हा प्रामाणिक माणूस आहे. गृहखात्याची प्रतिमा डागाळू नये यासाठी अशाच खमक्या आणि निःस्वार्थ वकीलाची गरज आहे.’’

पण बाळासाहेब म्हणाले , ‘‘तो शरद पवारांचा माणूस आहे…’’

पण गृहमंत्र्यांनी ठासून सांगितले,

‘‘साहेब, मी यांची खात्री देतो. ते फक्त प्रामाणिकपणाची वकिली करतील. पवारांचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही.”

गोपीनाथ मुंडे म्हणत होते की मी गृहमंत्री असल्यामुळे हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मला द्या. बाळासाहेबांनी रागाच्या भरात फोन ठेवून दिला. उज्वल निकम सांगतात,

माझी आणि गोपीनाथ मुंडे यांची ही पहिलीच भेट होती. यापूर्वी आम्ही कधी फोनवरही बोललो नव्हतो. मात्र माझी सगळी कुंडलीच त्यांनी काढली होती. माझ्यासाठी त्यांनी बाळासाहेबांकडे आपला शब्द टाकला. टोकाची भूमिका घेत माझी पाठराखण केली.

खरं तर सुनील दत्त यांनी संजय दत्तला बाळासाहेबांच्या पायाशी आणून घातलं होतं. बाळासाहेबांना संजय दत्त निर्दोष आहे याबद्दल खात्री बसली होती म्हणूनच त्यांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. जेव्हा खटला सुरु झाला तेव्हा मात्र बाळासाहेबांनी उज्वल निकम यांच्या कामकाजात कोणताही हस्तक्षेप केला नाही. उलट गैरसमज दूर झाल्यावर त्यांनी निकम यांना भेटायला बोलावून घेतलं. त्यांच्यात चांगली मैत्री देखील झाली.

उज्वल निकम सांगतात,

त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी स्वतःहून पुढाकार घेतला नसता तर कदाचित आजचा उज्ज्वल निकम दिसला नसता. मुंडे साहेबांनी त्यावेळी बाळासाहेबांना समजावून सांगितले नसते तर मी जळगावपुरताच मर्यादित राहिलो असतो.

संदर्भ- गोपीनाथ मुंडे यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त पुण्यातील ‘चपराक’ या साप्ताहिकास दिलेल्या मुलाखतीमध्ये हि आठवण सांगितली आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.