फक्त मैत्रीने चमत्कार घडवला अन काँग्रेसला पाडून भाजपचा उमेदवार निवडून आला….

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीनिमित्त प्रचंड भांडणे अनुभवायला मिळाली. राजकारणात मैत्री फार अभावाने पाहायला मिळते. एरव्ही खुर्चीसाठीच्या स्पर्धा, भांडणे ही चालतच असतात. सत्ताधारी विरोधक जाऊ द्या. एकाच पक्षातले नेते एकमेकांच्या विरोधात अगदी टोकाला जाऊन राजकारण करताना दिसतात. पण याच राज्यात असेही काही नेते होऊन गेले जे पक्ष वगैरे विसरून एकमेकांना मदत करायचे.

यात येणारं प्रमुख नाव म्हणजे विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे.

विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे म्हणजे महान लोकनेते. दुष्काळी मराठवाड्यातून आलेल्या या नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला, आज दोघांच्याही मृत्यूनंतर एवढे वर्षे झाले तरी त्यांच्या लोकप्रियतेमध्ये तसूभरही कमतरता आलेली नाही.

दोघे दोन वेगवेगळ्या पक्षाचे होते, त्यांची विचारसरणी वेगळी होती, तरीही त्यांच्या दोस्तीचे अनेक किस्से अजरामर झालेले आहेत. असाच एक किस्सा त्यांच्या मैत्रीतील बंध उलगडणारा.

विलासराव बाभळगाव लातूरचे तर गोपीनाथराव परळीचे. दोघेही एकाच भागातले, तसं बघायला गेलं तर शेजारी-शेजारी. वयानेही तसे समवयस्क. पुण्यात कॉलेजला असताना त्यांची ओळख झाली असावी.

वरवर पाहिलं तर जिवाभावाची मैत्री जुळावी असा कोणताही समान धागा त्या दोघांमध्ये नव्हता. गोपीनाथराव यांचा जन्म गरीब शेतकरी कुटुंबात झाला होता, तर विलासराव हे देशमुखी ऐश्वर्यात वाढले होते.गोपीनाथराव मुंडे हे ओबीसी समाजातून आलेले तर विलासराव हे प्रस्थापित मराठा समाजाचे.

दोघांच्याही राजकारणाची सुरवात मात्र एकाच काळात झाली.

गोपीनाथराव मुंडे हे अखिल भारतीय विद्यार्थी चळवळीतून घडले, आणीबाणीच्या कठोर कारावासात तावून सुलाखून त्यांचं नेतृत्व घडलं. तर विलासरावांनी गावच्या सरपंचपदापासून राजकारणात पाय जमवायला सुरवात केली.

गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर हिंदुत्वाची मशाल आपल्या खांद्यावर वाहिली तर विलासराव काँग्रेसच्या पुरोगामी विचारांवर ठाम राहिले.

अशा अनेक बाबतीत त्यांच्यात विषमता असूनही त्यांच्या मैत्रीत कधी अंतर पडले नाही.

दोघेही १९७८ साली जिल्हा परिषदेवर एकदम निवडून गेले.

पुढच्या दोनच वर्षात त्यांच्या कामाचा झपाटा बघून त्यांच्या पक्षाने आमदारकीची तिकिटे दिली. मुंडे आणि देशमुख दोघेही एकाच वेळी आमदार म्हणून निवडून आले.

अस म्हणतात की त्यांनी त्याही काळात एकमेकांना निवडणुकीत मदत केली होती.

याचाच परिणाम दोघांनीही आपापल्या मतदारसंघात जुन्या नेत्यांना पाडून स्वतःचे राज्य सुरू केले. या मैत्रीबाबत आठवण सांगताना मराठवाडयातील आरएसएसचे जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी धाराशिवे एकेठिकाणी म्हणतात,

की मराठवाडा पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचे वसंतराव काळे हे दोन वेळेस आमदार होते. ते तिसऱ्यांदा निवडून येतील ही शक्यता होती. मात्र भाजपचे श्रीकांत जोशी नवखे होते. त्यांच्याबरोबर मुंडे होते. या निवडणुकीत जोशी निवडून आले. यातून विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीची प्रचिती आली.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.