नेपाळ-भारत सीमावाद राहिला बाजूला, गुरख्यांना भारतातच एक वेगळ राज्य हवाय !

नेपाळ आपला सख्खा शेजारी. गेली शेकडो वर्षे यांचा आणि आपला जीवाभावाचा संबंध. हा एकमेव देश होता की ज्यांच्याशी आपले कधी सीमावाद नव्हते. पण आता चीनच्या कृपेनं हा देश सुद्धा सध्या आपल्याला बेंडकुळी दाखवायला लागलाय.

पण पूर्वी तस नव्हत. नेपाळ मधून हजारो लोक भारतात स्थलांतर करत होते, काश्मीर ते कन्याकुमारी सर्वत्र रखवालदारीसारख्या छोट्या मोठ्या नोकऱ्या करायचे. आजही करतात. भारतातली सर्वात शूर बटालियन म्हणून गोरखा बटालियनला ओळखल जात.

पण एकदाच अशी वेळ आली होती की या गुरखांनी भारतात स्वतंत्र राज्य हवं म्हणून रक्तरंजित आंदोलन सुरु केलेलं.

स्वातंत्र्यानंतर देशात राज्यांची पुनर्रचना झाली. अनेक ठिकाणी प्रांतवाद, भाषावाद असे अनेक वाद होते पण काही ना काही तोडगे काढले गेले. मात्र ज्या भूप्रदेशांचा इतिहास गुंतागुंतीचा आहे त्या भागात एकमत होऊ न शकल्यामुळे प्रश्न चिघळले.

यातच होता पश्चिम बंगाल मधला दार्जिलिंग जिल्हा.

दार्जिलिंग व आसपासच्या राज्यात गुरखा कम्युनिटीच्या लोकांचे प्रमाण प्रचंड आहे. हा मुळचा सिक्कीमच्या राजाच्या अधिपत्याखालचा भाग. मात्र पार आठव्या शतकापासून शेजारच्या नेपाळच्या राजांनी अनेकदा आक्रमण केलं होतं. अनेकदा ते यात विजयी देखील झालेले. याच कारणाने नेपाळहून अनेक लोकांनी या भागात वस्ती वाढवली होती.

पुढे इंग्रज राजवटीत त्यांनी नेपाळ व सिक्कीममध्ये मध्यस्थी केली.

एकोणिसाव्या शतकापासून नेपाळ मधून आलेल्या या गुरखा लोकांनी स्वतःच राजकीय अस्तित्व दाखवण्यास प्रारंभ केला. स्थलांतरामुळे १८७६ पर्यंत दार्जिलिंगमधील गुरखा जनतेची लोकसंख्या तब्बल ३४ % पर्यंत जाऊन पोहचलेली होती.

१९१७ साली या गुरखांनी हिल मेन्स असोशिएश्नची स्थापना केली व दार्जिलिंगला स्वतंत्र प्रशासकीय स्थान असावं अशी मागणी केली.

पुढच्या काही वर्षात अखिल भारतीय गुरखा लीग हा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला. याच काळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देखील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या गुरखा कामगारांचं वेगळ संघटन सुरु केलं.

भारत स्वतंत्र झाल्यावर कम्युनिस्ट पक्षाने १९५४ साली राज्य पुनर्रचना आयोगापुढे दार्जिलिंगला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली. याला गुरखा लीगने पाठींबा दिला. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तरी तत्कालीन प.बंगाल सरकारने गुरखा लोकांच्या इतर काही मागण्या केल्या.

१९६१ साली नेपाळी भाषेला दार्जिलिंग,कालीपॉंग, कुरसेऑंग या भागात अधिकृत भाषेचा दर्जा दिला.

१९७७ साली या भाषेला भारताच्या अधिकृत भाषांच्या यादीत देखील स्थान देण्यात आले. मात्र नेपाळी भाषेच्या अंमलबजावणी बाबत सरकार प्रामाणिक नाही असा गुरखा लोकांचा आरोप होता.

अशातच त्यांचा एक नेता पुढ आला त्याचं नाव सुभाष घिशिंग.

हा एकेकाळचा गुरखा रायफल्सचा सैनिक. पण निवृत्ती घेऊन दार्जिलिंगला परत आला आणि शाळेत शिकवण्याची नोकरी सुरु केली. त्यातूनच राजकारणात पडला. गुरखा ओळख, गुरखा अस्मिता या मागणीभोवती त्याने तरुणांना पेटवायला सुरवात केली.

त्याला गुरख्यांच स्वतंत्र राज्य हवं होतं, नाव गोरखालँड

१९८६ मध्ये सुभाष घिशिंग याच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठे आंदोलन सुरु झाले. शेकडो गुरखा तरुण यात सामील झाले. मोर्चे,बंद,हरताळ,निदर्शने,दंगली, हिंसाचार यांनी हा हिलस्टेशनचा प्रदेश पेटून उतला. तेव्हाच्या पश्चिम बंगालमधल्या कम्युनिस्ट सरकारने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.

एका साईडला नेपाळची तर दुसऱ्याबाजूला बांगलादेश अशी आंतरराष्ट्रीय सीमा असलेला हा प्रदेश संवेदनशील होता.

पण एक नवी क्रांती करत आहोत असं वाटणाऱ्या गुरखा तरुणांनी माघार घेण्यास नकार दिला. या आंदोलनामुळे दार्जिलिंग व आसपासच्या प्रदेशातील सगळे व्यवहार ठप्प पडले. चहाच्या मळ्यातील काम थांबलं. पर्यटन व्यवसायाचा तर कधी गुंडाळला गेला होता.

आंदोलक इतके आक्रमक झाले होते की त्यांनी थेट सरकारविरुद्ध उठाव करून सर्व प्रदेश ताब्यात घेण्याची तयारी केली होती.

पोलीस व आंदोलकांच्यात झालेल्या हातघाईमध्ये जवळपास १२०० जणांना प्राण गमवावे लागले. प्रकरण आणखी जास्त चिघळण्याची शक्यता दिसल्यावर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी हस्तक्षेप करायचा निर्णय घेतला.

त्यांनी अशा या दंगलीत दार्जिलिंगला येऊन सुभाष घिशिंग यांची भेट घेतली.

दोघांच्यात शांतता करार झाले. गुरखा नॅशनल लिबरेशन फ्रंटने आपले हिंसक आंदोलन मागे घेतले. या करारानुसार ऑगस्ट १९८८ मध्ये गुरखा हिल कौन्सिल स्थापन झाल व सुभाष घिशिंग त्याचे अध्यक्ष बनले.

हळूहळू या प्रश्नाची तीव्रता निवळत गेली. पुढे गुरखांच्या पक्षातही फुट पडली. त्यांच्या त्यांच्यात वाद चालू झाल्यामुळे आक्रमक आंदोलने संपूर्ण बंद पडली. मात्र आजही जेव्हा जेव्हा छोट्या राज्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुढे येतो तेव्हा गुरखांच्या गोरखालँडची चर्चा होतेच.

स्वतंत्र भारतात गुरखा कम्युनिटी सुद्धा दुधात साखर विरघळल्याप्रमाणे मिक्स झाली आहे मात्र अधूनमधून सुभाष घेशिंगसारखा एखादा हे नाते नासवायचा प्रयत्न करतो. आजच्या बदलत्या परिस्थितीत चीन याचा फायदा उठवेल हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.