नमाजाच्या ठिकाणी गोवर्धन पूजा केली..अन म्हणे हाच ‘खरा’ स्वातंत्र्याचा लढा आहे.

देशात हिंदू मुस्लीम वादावरून होणारं राजकारण काही नवीन नाहीये..त्यातच आता गुरूग्राममध्ये देखील गेल्या बऱ्याच दिवसांपासून असाच काहीसा वाद चालू आहे. दिल्लीतल्या गुरूग्राम मध्ये..

तर विषय असाय कि, विषय कुठे वादच म्हणा. गुरुग्राममध्ये सार्वजनिक ठिकाणी नमाजला विरोध सुरू झाला आहे. कालच म्हणजे ५ नोव्हेंबर रोजी गुरुग्रामच्या सेक्टर-१२  मध्ये ज्या ठिकाणी शुक्रवारी नमाज पढला ज्याचा त्याच ठिकाणी गोवर्धन पूजेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू संघटनांनी आयोजित केलेल्या गोवर्धन पूजेच्या कार्यक्रमाला अर्थातच राजकीय रंग आहे. दिल्ली भाजपचे नेते आणि माजी आमदार कपिल मिश्रा यांनी या पूजेमध्ये सहभाग नोंदवला होता. हि पूजा आयोजित केल्यामुळे शुक्रवारची नमाज अदा होऊ शकली नाही. 

या सगळ्यात राजकीय वादाने जोर धरला आहे.

गोवर्धन पूजनाच्या कार्यक्रमामध्ये कपिल मिश्रा म्हणाले कि, सार्वजनिक रस्त्यांचा वापर धर्मासाठी,  राजकारणासाठी होऊ नये. त्यांच्या या बोलण्यामध्ये त्यांनी शाहीनबागमध्ये झालेल्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी हे वक्तव्य केलेले आहे. 

संयुक्त हिंदू संघर्ष समितीने शहरातील खुल्या जागेवर शुक्रवारच्या नमाजला विरोध करण्यासाठी गोवर्धन पूजा आयोजित केली असे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. यावेळी संस्थेच्या सदस्यांना ‘अन्नकूट प्रसाद’ वाटप करण्यात आले आहे. हिंदू संघटनेच्या कृतीमुळे सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस विभाग अलर्ट मोडवर आला आहे.  कारण हे तेच ठिकाण आहे जे, गेल्या २९ ऑक्टोबर रोजी शुक्रवारच्या नमाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हिंदू संघटनांच्या ३० सदस्यांना अटक केली होती.

याच जागेवर जेंव्हा २९ ऑक्टोबर रोजी मुस्लिम समुदायाकडून नमाज अदा करण्यात येत होती आणि तितक्यात नमाजात व्यत्यय आणल्याप्रकरणी पोलिसांनी सुमारे ३० जणांना ताब्यात घेतले होतं. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तात आंदोलक, बहुतेक हिंदूवादी संघटनांचे सदस्य, ‘जय श्री राम’ आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देत होते. तरीही मुस्लिम समाजाचे लोक नमाज अदा करण्यासाठी त्या ठिकाणी येत राहिले.

सार्वजनिक ठिकाणी नमाज बंद करा हा मुद्दा सामोर येतोय…

एसएचएसएसचे प्रदेशाध्यक्ष महावीर भारद्वाज यांचं म्हणन आहे की, गुरुग्राममध्ये सार्वजनिक ठिकाणी होणारी नमाज तात्काळ थांबवावी. जिल्हा प्रशासन कोणत्याही अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीशिवाय शुक्रवारच्या नमाजासाठी निश्चित केलेल्या ठिकाणांची यादी दाखवून सरकारची दिशाभूल करत असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. भारद्वाज यांनी हरियाणा सरकारकडे राज्यातील सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही धार्मिक प्रथेवर बंदी घालणारी अधिसूचना जारी करण्याची मागणी केली आहे.

शहरातील नियोजित ठिकाणी खुल्या नमाजला परवानगी दिल्याबद्दल आंदोलकांनी फलक घेऊन प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. मात्र, तणावपूर्ण वातावरण असूनही शांतता राखली गेली. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे ३० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पण हा वाद आत्ता चालू झाला तरी याच ठिकाणी गेल्या २  वर्षांपासून नमाज अदा केली जातेय.

गुरुग्रामच्या स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकं गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी नमाज अदा करत आहेत. दुसऱ्या गटातील काही लोक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच आम्ही त्यांना दहशतीचे वातावरण आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये असे सांगितले. तत्पूर्वी उघड्यावर नमाजपठण विस्कळीत करण्याची धमकी हिंदुत्ववादी संघटनांकडून दिल्याने घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हे ही वाच भिडू:

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.