कोश्यारींच्या जागी नवे राज्यपाल कोण ? कॅप्टन…येडियुरप्पा कि सुमित्रा महाजन ?

महाराष्ट्रात मागचे काही दिवस राजकारण हे काही ठराविक मुद्द्यांभोवती फिरताना आपण बघितलंय. शिवसेना ठाकरे गट-शिंदे गट, छत्रपती शिवाजी महाराज, वादग्रस्त वक्तव्य आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांपैकी काही मुद्दे आहेत. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते कायम महाविकास आघाडीच्या टार्गेटवर राहिलेत.

महाविकास आघाडीकडून सातत्याने राज्यपालांची पदावरून गच्छंती करावी अशी मागणी केली गेलीये. काही दिवसांपुर्वी मात्र स्वत: राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलीये.

आता लवकरच भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून निघतील. मग प्रश्न उभा राहतो तो, कोश्यारींनंतर आता कोण? महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आता कुणाची वर्णी लागणार?

याबाबत सध्या माध्यमांमध्ये वेगवेगळी नावं घेतली जातायत तर, अनेक नावं ही चर्चेत सुद्धा आहेत. ती नावं कोणती आहेत? चर्चेत असलेल्या व्यक्तींची राजकीय कारकीर्द कशी राहिलीये? हेच बघुया.

चर्चेत असलेलं पहिलं नाव म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंग

कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबच्या राजकारणातलं मोठं आणि वरिष्ठ नाव. राजकारणात येण्यापुर्वी भारतीय सैन्यातही त्यांनी काम केलंय. सैन्यातून निवृत्ती घेतल्यानंतर तब्बल १५ वर्षांनी राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून त्यांनी राजकारणात एन्ट्री केली होती.

चार वर्षांनी ऑपरेशन ब्लूस्टार अंतर्गत सुवर्णमंदिरावर झालेल्या कारवाईमुळे त्यांनी काँग्रेसला रामराम देऊन अकाली दलात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष सुरू केला होता. मग तो पक्ष फेल जातोय हे लक्षात घेऊन त्यांनी त्या पक्षाचा गाशा गुंडाळला आणि पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेससाठी राजकारण करत असताना त्यांना दोनदा पंजाब राज्याचं मुख्यमंत्री पद भुषवण्याची संधीही मिळाली. २००२ साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यानंतर २०१७ साली ते मुख्यमंत्री झाले. २०१७ सालची त्यांची टर्म पूर्ण होण्याआधीच काँग्रेसमधल्या अंतर्गत कलहामुळे त्यांनी मुख्यमंत्री पद आणि पक्ष दोन्हीचा राजीनामा दिला.

२०२१ ला पक्ष सोडल्याच्या एका महिन्यानंतर कॅप्टन अमरिंदर यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंजाब लोक काँग्रेस हा स्वतःचा पक्ष सुरू केला. आगामी निवडणुकीत मात्र त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही आणि मग त्यांनी भाजपमध्ये आपला पक्ष विलीन केला.

अशाप्रकारे पंजाबमधल्या पंजाबमध्ये २ प्रस्थापित पक्ष फिरूल आलेले, स्वत:चे दोन पक्ष सुरू केलेले कॅप्टन अमरिंदर सिंग हे आता महाराष्ट्राचे राज्यपाल होतील अशी चर्चा सुरू आहे.

दुसरं नाव म्हणजे सुमित्रा महाजन

सुमित्रा महाजन या मुळच्या आपल्या महाराष्ट्रातल्याच. म्हणून त्यांनी “मला महाराष्ट्राचे राज्यपाल व्हायला आवडेल” अशी इच्छा बोलून दाखवली होती. यामुळे सर्वांना उत्सुकता लागली आहे.

तर सुमित्रा महाजन या मूळच्या चिपळूणच्या. मागच्या ३ दशकांपेक्षा अधिक काळ भाजपमध्ये आहेत. १९८९ साली त्या पहिल्यांदा खासदार झाल्या. त्यानंतर सलग आठ वेळा त्या इंदोरमधून खासदार म्हणून निवडून आल्या.

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी आपल्या वयाची ७५ वर्ष पूर्ण झाली असल्यानं निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी निवडणूक लढवली नसली तरी त्यांचं भाजपसाठीचं असलेलं मोठं योगदान बघुन पक्ष त्यांच्याकडे मोठी जबाबदारी द्यायला तयार असेल. त्यातच त्या मुळच्या महाराष्ट्रातल्या असल्याने आणि महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी एक महिला राज्यपाल म्हणून त्यांच्याकडे दिली जाऊ शकते.

इतिहासात महाराष्ट्राला पहिल्या महिला राज्यपाल लाभल्या होत्या त्या म्हणजे नेहरूंच्या भगिनी व महाराष्ट्राच्या माजी राज्यपाल विजयलक्ष्मी पंडित. त्यानंतर आता सुमित्रा महाजनांच्या निमित्ताने राज्याला महिला राज्यपाल लाभली तर त्यातून भाजपला एक सकारात्मक संदेश देता येईल.

तिसरं नाव म्हणजे बी.एस. येडियुरप्पा.

कोश्यारी यांना पदमुक्त केल्यास नवे राज्यपाल कोण येणार या चर्चेत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. येडियुरप्पा यांच्या नावाचीही चर्चा आहे.

बुकानेकेरे सिद्धलिंगप्पा येडियुरप्पा असे त्यांचे पूर्ण नाव. आपल्या कॉलेजच्या दिवसांपासूनच येडियुरप्पा यांची संघाशी जवळीक होती. १९७० मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना शिकारीपुरा युनिटचे कार्यवाहक म्हणून नेमलं. १९७२ मध्ये ते शिकारीपुरा नगर नगरपालिकेत निवडून आले. आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख उंचावतच राहिला. कारण त्यांना त्याचं वर्षी पक्षाने जनसंघाच्या तालुका युनिटचे अध्यक्ष बनवले. १९७५ मध्ये ते प्रथमच नगरपालिकेचे नगराध्यक्ष बनले होते. 

त्यानंतर शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपुरा मतदारसंघातून ते आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. कर्नाटकाचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. 

येडियुरप्पा यांनी कर्नाटकात सलग चार वेळा मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे.

विरोधी पक्षनेते म्हणून ३ वेळा आणि मुख्यमंत्री म्हणून सलग ४ वेळा कार्यरत असणारे ते कर्नाटकमधील आतापर्यंतचे एकमेव मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव लक्षात घेता त्यांना राज्यपाल पद देऊन आता रिटायर केलं जाईल.

महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर आता राज्यपालपदाची जबाबदारी देण्याची शक्यता बोलून दाखवली जाते. मात्र नियमानुसार नारायण राणे महाराष्ट्राचे राज्यपाल होऊ शकत नाही. त्यामुळे राणे यांची राज्यपाल म्हणून होणारी नियुक्ती महाराष्ट्रात नव्हे, तर इतर कोणत्याही राज्यात होऊ शकते, अशी माहितीही समोर येत आहे.

बाकी कोश्यारींच्या जागी नवे राज्यपाल कोण असतील हे लवकरच कळेल मात्र तूर्तास तुमच्या मते कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होईल, तुम्हाला काय वाटतं ?

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.