पेग नंबर दोन नंतर गोविंदा प्ले लिस्ट लावा..

ऐंशीच्या उत्तरार्धात बीबीसी लंडनच्या टीमने बॉलिवूड डान्सर स्टार्स अभिनेत्यांच्या मुलाखतीची मोहीम केली होती. नंतर त्यातली काही लोकं छायाचित्रकार गौतम राजाध्यक्षांना भेटायला आली तेव्हा त्यांनी राजाध्यक्षांवर एक बॉम्बच टाकला.

“तुमच्या बॉलिवूडच्या लोकांमध्ये एक अभिनेता खूपच प्रॉमिसिंग आहे… त्याने प्रत्येक डान्सर स्टारची स्टाईल करून दाखवली मग तो शम्मी कपूर असेल की अमिताभ बच्चन आणि त्याने या सगळ्यातून काय घेतलंय ते ही आम्हाला स्टेप्स करून दाखवलं.. तो अभिनेता म्हणजे गोविंदा”

आपला विरारचा पोरगा. गोंदया. गोविंद.

आपला माणूस.

पिताश्री अरुणकुमार एकेकाळचे हिंदी चित्रपटांचे नायक, मातोश्री निर्मला देवी या ठुमरी गायिका.. अरुण कुमार आहुजा सिंधी तर निर्मला देवी मूळच्या पंजाबी मग वाराणसीला वास्तव्य असणाऱ्या अशा सगळ्या झांगडगूत्त्यातून लहानगा चिची (पंजाबीमध्ये अर्थ करंगळी) मात्र अस्सल मराठी!

याचं कारण मात्र फारसं सुखावह नाही. अरुणकुमार आणि त्यांचं कुटुंब वांद्र्याच्या कार्टर रोडला बंगल्यात राहायचं. मात्र अरुण कुमार निर्माते बनले आणि अपयश कर्जबाजारी करून गेलं. आहुजा कुटुंब कार्टर रोड वरून विरारला थेट चायना क्रीकच्याही पलीकडे गेलं.

गोविंदा मराठी शाळेत शिकला. तिकडेच धमाल करत वाढला.

वडिलांनी एकदा ज्योतिष वर्तवलं, की तू मोठा अभिनेता बनशील. गोविंद कामाला लागला. त्या काळात जेव्हा स्ट्रगलर्स आपले फोटो घेऊन स्टुडिओजच्या उंबरठ्यावर उभे राहायचे, गोविंदाने चक्क आपली विडिओ कॅसेट बनवली, नृत्य आणि अभिनयाच्या नमुन्याची.

त्यावेळचे मोठे निर्माते प्राणलाल मेहता यांच्या लव्ह ८६ मध्ये महेंद्र कपूर यांच्या सुपुत्राबरोबर रोहन बरोबर ब्रेक मिळाला, नायिका होत्या फराह आणि नीलम. पण गोंदयाचा पहिला प्रदर्शित झाला ‘झुठा ईल्ज़ाम” आणि तो बऱ्यापैकी चालला.. गोंदयाच्या टॅलेंटमुळे असेल पण त्याची हवा जाम भारी होती. गोविंदा आला रे अशी एक कॅम्पेनच होती. आणि हे पॅकेज पैसावसुल होतं.

हास्य, करुण, क्रोध ह्या बॉलीवूडला हव्या असलेल्या मुख्य मुद्राभिनय छटा, नृत्य, मारामारी हे सगळं गोविंदा छानच करायचा. कमल हासनची थोडी स्वस्तातली आवृत्ती पण अस्सल हिंदीत.

सुसाट निघाली गोंदयाची गाडी. मोठा भाऊ किर्तीकुमार सेक्रेटरी. निर्माते साइन करायला दरवाजात उभे म्हटल्यावर ले घपाघप सिनेमे साइन करून घेतले दोघा भावांनी. एक मजेशीर किस्सा. खूप पैसे जमले की गोविंद ते किर्तीकुमारला दाखवायचा आणि म्हणायचा,

“दादा काय करूया? ट्रक्स घेऊया का ट्रान्सपोर्टचा धंदा करायला?”

मग किर्तीकुमार विचार करायचा (उगीच, हत्या बरा सिनेमा असला तरी कॉपी होता मग त्याचा राधा का संगम बघितला आणि सेक्रेटरी म्हणून त्याने गोंदयाचं लै नुस्कान केलं असं वाटलं) तर विचार करून कीर्ती म्हणायचा, “अरे ये अपने बस की बात नही हैं.” असं करत करत जेव्हा चिक्कार पैसे जमले तेव्हा किर्तीने धीरगंभीर चेहऱ्याने जाहीर केलं,

“आपण या पैशाच्या रिक्षा घ्यायच्या…”

इकडे गोंदयाची आणि निलमची जोडी तुफान जमली होती. हा छोटा पॅकेट बडा धमाका तर ती बेबी डॉल.

हा ब्रेक डान्स ते गणपती डान्स काहीही तर ती बॅलेड डान्सर. आम्हाला वाटलेलं उडतोय बार. पण या सुसाट गाडीला ब्रेक लागला. भरमसाठ पिक्चर्स घेऊन, अक्षरशः एका सेटवरून दुसऱ्या सेटवर पळताना गोंदया आजारी पडला.

तो किस्सा पण त्याच्या कडून असा ऐकला, की एका फिल्मच्या गाण्याच्या शूटला ज्युनिअर डान्सर्स मधल्या बऱ्याचशा मुली या गोंदया डान्स शिकतानाच्या त्याच्या मैत्रिणी. आता आपला मित्र स्टार झाला याचा कोण आनंद, मग एकीने त्याला फ्रुटी (आमच्यावेळी रेड बुल नव्हतं) पाजली, मग प्रत्येकीने. कारण गोविंद आपलाच ना..

हे असले डझनावारी फ्रुटी पिऊन साहेब आजारी न पडतील तर नवल…

गोविंद विरारला असतानाच सुनीता त्याच्या आयुष्यात होती. आई निर्मालादेवीने तीच ओके केली आणि परम मातृ भक्त गोविंदने शिस्तीत लग्न करून आपली दुसरी इनिंग चालू केली.

गोंदयाची दुसरी इनिंग १९९२ ते १९९९, मला जबरी आवडते (पहिली सुद्धा) पण दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला डेव्हिड धवन भेटला (तसा आधी गोंदयाने धवन बरोबर ताकतवर केला होता संजू बाबा सहित) पण गोंदयाची नाळ जी पब्लिकशी जुळलीय.. बॉस! सगळे नंबर वन सिनेमे.

त्या आधी शोला और शबनम मग आँखे. ‘आँखे’ हा गोंदयाचा ‘घायल’ आहे. त्याची कॉमेडी आधी गैरकानुनी मध्ये श्री बरोबर, दादागिरी मध्ये धरमबरोबर मजाच होती पण आँखे मध्ये तो सुटला.

“इरडिरडईईई…सुरजपे गर्मी होत हैं? तो हम सूरज पे दिन में ना जाब, रात में जाब…”

युसूफसाबच्या गंगाचं इतकं सुरेख स्केच कुणी केलं नव्हतं आणि करू शकणार ही नाही. धवन सोडा त्याच्या शिवायही दुल्हे राजा मध्ये काय फटाके फोडतो गोंदया. कादरखान साहेब आणि त्याची जुगली कडकच.

हद कर दि आप ने मध्ये गोंदया भरकटलाय आणि तरी… तरी… त्याची कॉमेडी (हेलन ब्रॉडी [माँ कसम!] ssss चॅनेल चेंज करतेय आणि गोंदया वेगवेगळे वेष घालून टिव्हीमधून चाळे करतोय, बाहेर तोंड काढून हेलनला स्मूच करतोय) अशी धादांत बेअक्कल कॉमेडी आमची आजही आवडती आहे. यात तो शेवटी ‘ढगाला लागली कळ’ वर दादा कोंडके बनून नाचतो तेव्हा तो बॉलिवूड मध्ये आला असताना त्याला दादा कोंडकेंचा मुलगा समजायचे हे आठवलं…

मग काय झालं कळत नाही, तो उगीच राजकारणात गेला. त्याचा तो प्रांत नाहीच.

बॉलिवूड मध्येच आधी तो वेळेच्या बाबतीत शॉटगन सिन्हा पेक्षा बदनाम. त्याचा आलेख मंदावतच गेला. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ साठी त्यावेळी गर्तेत असलेल्या अमिताभने खुद्द गोविंदाला फोन करून सोबत काम करण्याची विनंती केली होती म्हणे… आणि गोविंदा अमितजी साठी वेळेआधी पोहोचायचा पण हे कुणी आवर्जून सांगितलं नाही ही त्याची खंत आहे.

बाय दि वे यातलं मखना हे गाणं म्हणजे ट्रीट आहे यात आपली माधुरी आणि आपला गोंदया चक्क बच्चनला झाकोळून टाकतात. विजू भाईचं संगीत तर तुफानच. मॅडज आणि गोंदया १९९०च्या इज्जतदार नंतर एकत्र आले नव्हते हे दुर्दैव. हे गाणं पाहिलं की समजतं.

पण मिलेनियमने आमचा गोंदया हरवून टाकला हे खरं.

व्यक्तिगत आयुष्यातही खूप मोठ्या समस्या आल्या त्याला. त्याच्या कुटूंबाचा राजस्थानमध्ये भयानक अपघात झाला, पत्नी सुनीता मरणाच्या दाढेतून परत आली, राजकारणात तो फ्लॉप झाला. वय चेहऱ्यावर दिसू लागलं. सिनेमे चालेना.

स्वभावाने तर इतका विचित्र बनलाय की, आमचा गोविंदा नाहीये हा. पण हां, मध्ये मध्ये त्याने ‘पार्टनर’, ‘भागमभाग’ ‘किल दिल’ आणि ‘हॅपी एंडिंग’ मधून तो काय चीज आहे हे दाखवून दिलंय.

गोविंदा उत्तम नर्तक आहे, तो नाच करत नाही तर नाचाला या जगातली सर्वात सुंदर गोष्ट बनवतो…

मर्द नाचा नही करते म्हणणाऱ्या आम्हा देओल फॅन्सनाही जागेवरून उठवण्याची कला त्याच्या नाचऱ्या आनंदी डोळ्यात दिसते मग ‘सोणा कितना सोणा हैं’ वर त्याचं नुसतं खांदे लहरत चालणं असो की ‘आयाम अ स्ट्रीट डान्सर’ की ‘किसी डिस्को में जाये’ मध्ये पहिल्या कडव्याआधी रविना नाचत असते. हा तिला न्याहाळत फुल स्वॅग मध्ये चालत,तिच्याभोवती राउंड मारतो आणि मग नाचायला सुरू .. ले धमाल ना बाप्पू!

गोंदयाची गाणी हा बडा रिचार्ज आहे.

आजही कॉर्पोरेट, मीडिया वगैरेच्या पार्टीज मध्ये आधी इंग्रजी गाणी लावून थोडं हलकं हलकं ढवळून घेतात आणि क्लास वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतात. पेग नंबर दोन नंतर गोविंदा प्ले लिस्ट लावा. सगळे फ्लोअरवर झुलायला लागतात आणि त्याच्या स्टेप्स पण प्रयत्न तर करून पाहू अशा असतात डुग्गू आणि प्रभू देवासारख्या दुरून नमस्कार वाल्या नसतात.

आणि अभिनेता म्हणून उमदाच आहे आमचा गोविंद. त्याचा हत्या, एन चंद्राचा शिकारी यात उत्तम अभिनय आहे. तो स्वतःला दिलीप, राजेश, अमिताभ व मिथुनचा कॉम्बो समजतो ते अलाहिदा पण पिटातला पब्लिक आजही गोंदयावर जान छिडकतो.

‘राजा बाबू’ त्याने त्याच्या विरारच्या एका पाटील म्हणून मोठ्या धेंडाच्या लाडावलेल्या बावळट मित्रावर बेतला होता…

दिसत नसला तरी विचारी अभिनेता आहे आमचा गोविंद. बस्स याला साजेशी स्क्रिप्ट यावी आणि बघा आमचा हा विरार का छोकरा नंबर वन मनोरंजन देतो की नाय… सवाल?

अरे बाप रे लय लांब लिवला.. विरार से चर्चगेट तक!

अरे ए गोविंद…तू अपने आप को व्यास मुनी और हमका गणपती समझें हो क्या? कितना लिखायेगा बे? ????

Love & #HappyBirthdayGovinda

#CinemaGully

  • गुरुदत्त सोनसुरकर

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.