इंग्लिशचा गंधही नसलेला शेठजी तीन खंडाच्या कापूस व्यापाराचा बादशहा होता.

आजकाल उठल्या सुटल्या आपण इंग्लिश इज ग्लोबल लँग्वेज म्हणून ऐकत असतो. कॉर्पोरेट ऑफिस मध्ये अगदी चपराशाच्या मुलाखती देखील इंग्लिश मध्ये होतात. अगदी व्हाटस अप वर बोलताना इंग्लिश मध्ये टाईप केलं नाही तर गावंढळ म्हणून पोरी रिजेक्ट केलेले बांधव आपल्या ओळखी मध्ये असतात.

असं असलं तरी जगाच्या पाठीवर एक असा शेठजी होऊन गेला जो तब्बल तीन खंडाचा व्यापार मुंबईत बसून सांभाळत होता आणि त्याला इंग्लिशचा गंध देखील नव्हता.

गोष्ट आहे गोविंदराम सेकसरिया यांची.

राजस्थानच्या नवलगढमध्ये जन्मलेला हा मारवाडी. आईवडिलांचं छत्र कधीच हरपून गेलेलं. लग्न कमी वयात झालेलं. शिक्षण काही झालेलं नव्हतं.  नशिबाची परीक्षा बघण्यासाठी आपली बायको आणि ६ लहान भावांना घेऊन मुंबईला आला. लहानपणी ऐकलेलं असत ना कि फक्त एक लोटा घेऊन मारवाडी गावात आला आणि करोडपती बनला अगदी तसंच गोविंदराम यांच्या बाबतीतही घडलं.

विसाव्या शतकाच्या सुरवातीचा हा काळ. ब्रिटिश भारतावर राज्य करत होते. आपल्या परंपरागत उद्योगधंद्याना त्यांनी कधीच मोडून काढलं होतं. भारताच्या व्यापारावर पूर्णपणे त्यांचीच पकड होती. आधुनिक कारखाने उभे राहत होते. भारतातील गुजराती, मारवाडी, पारसी या व्यापारी जमाती त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होत्या.

गोविंदराम लहानपणापासून चलाख होता. मुंबईच्या मायानगरीत अनेक ठगांच्या गर्दीत त्याने प्रामाणिक पणे हातपाय मारून स्वतःच स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली. भाऊ मदतीला  होते. प्रचंड कष्ट करायची तयारी होती. परंपरागत चालत आलेलं व्यापारी डोकं होतं.

त्या काळी मुंबई ही कापसाचं केंद्र बनली  होती. विदर्भ, मराठवाड्यापासून ते देशभरात पिकणारा कापूस इंग्रज पडेल किमतीत उचलायचे आणि इंग्लंडच्या फक्टरी मध्ये तयार झालेला माल अवाच्या सव्वा किमतीत परत आणून इथेच विकायचा हे काम त्यांच चालेलं.

म्हणूनच मुंबई जागतिक नकाशावर व्यापारी गाव म्हणून नावारुपाला येत होतं.

यात मुंबईच्या मार्केटमध्ये अनेक दलाल कापसाची सौदेबाजी करायचे. देशभरातून आलेला कापूस एक ठोक किंमत घेऊन विकत घेतला जायचा आणि पुढे इंग्लंडला जाणाऱ्या जहाजात चढवला जायचा. या सौदेबाजीतूनच टाऊन हॉलच्या झाडाखाली मुंबई स्टॉक एक्स्चेंज स्थापन झाली. अमेरीकन सिव्हिल वॉर चा फायदा घेऊन भारतीय दलालांनी एकेकाळी तुफान पैसा कमावला होता.

मात्र विसाव्या शतकात अनेक व्यापारी या सौद्याच्या धंद्यात रावाचे रंक झाले. भल्या भल्याना या धंद्याने चकवा दिला. अशातच पहिले महायुद्ध आले आणि भारताच्या कापूस उद्योगाला पुन्हा चांगले दिवस आले. याचा सर्वात मोठा फायदा उचलणारे होते गोविंदराम सेकसरिया.

गोविंदराम सेकसरिया यांनी कापूस उद्योगात आपला जम बसवला. मुंबईत राहून त्यांनी आशिया, युरोप आणि अमेरिका या तीन खंडात हा व्यापार पसरला. दूरदूरचे व्यापारी गोविंदराम यांच्यावर प्रामाणिकपणावर अगदी डोळे झाकून भरवसा ठेवायचे.

त्यांनीदेखील कधी कोणाला  फसवलं नाही आणि धंद्यात गोविंदराम सेकसरिया यांचा अंदाज कधी चुकला नाही. कापसाच्या पाठोपाठ गहू, साखर यांच्या निर्यातीत व सौद्यात त्यांनी धंद्याचा विस्तार केला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये त्यांचं मोठं नाव होतं, त्यांनीच पुढे जाऊन इंडियन स्टॉक एक्स्चेंजची स्थापना केली.

एकवेळ तर अशी आली होती की अमेरिका, इंग्लंड आणि आशिया इथल्या कापूस व्यापारावर अप्रत्यक्षरीत्या गोविंदराम सेकसरिया या शाळा देखील न शिकलेल्या व्यक्तीचे वर्चस्व निर्माण झाले होते. त्यांची कीर्ती एवढी अफाट होती की जगातल्या सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या न्यूयॉर्क कॉटन एक्स्चेंज आणि इंग्लंडच्या लिव्हरपूल कॉटन एक्स्चेंज चं मानद सदस्यत्व त्यांना देण्यात आलं होतं.

१९३७ साली न्यूयॉर्क कॉटन एक्स्चेंजचे प्रतिनिधी गोविंदराम सेकसरिया यांना भेटण्यासाठी भारतात आले.

इथं आले तेव्हा त्यांना वाटत होतं की एवढा मोठा माणूस त्याच भलं थोरलं ऑफिस असेल. पण जेव्हा ते त्यांच्या पेढीवर पोहचले तेव्हा लाकडी डेस्कवर हात ठेवून पांढरी गादी तक्क्यावर मांडी घालून बसलेला म्हातारा दिसला. मारवाडी सोडून दुसरी कुठली भाषा न बोलता येणारा हा माणूस जगातला सर्वात मोठा कापूस सम्राट आहे ह्यावर त्यांचा विश्वास बसने कठीण झाले होते.

गोविंदराम सेकसरिया हे फक्त कापूस उद्योगात राहिले नाहीत तर त्यांनी राजस्थान बँकेचे स्थापना केली, कापड गिरण्या, तेलगिरण्या, साखर कारखाने उभे केले. प्रिटिंग प्रेस, सावंतवाडी मिनरल्स एवढं नाही तर बॉम्बे टॉकीज या सुप्रसिद्ध चित्रपटसंस्थेच्या उभारणीत देखील त्यांचा सिंहाचा होता.

बॉम्बे हॉस्पिटलचे सर्वात मोठे डोनर ते होते. स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत महात्मा गांधीजींच्या पाठीशी उभे असणाऱ्या उद्योगपतींमध्ये त्यांचा समावेश होता. स्वतःच शिक्षण झालं नसलं तरी भारतभरात त्यांनी खेडोपाडी शिक्षण संस्था उभारल्या. शंभर वर्षांपूर्वी ‘मुली उत्तम शिकायला हव्यात’ असा आग्रह धरून कन्याशाळा आणि कन्या महाविद्यालये हिरीरीने उभी करणाऱ्या गोविंदराम यांच्याकडे आधुनिक काळाकडे जाण्याची दूरदृष्टी होती हे नक्की.

२२ मे १९४६ रोजी त्यांचे निधन झाले. जर ते आणखी काही वर्ष जगले असते तर टाटा बिर्ला बजाज यांच्या सोबतच त्यांनी देखील देशाच्या उद्योगधंद्याच्या पायाभरणीमध्ये सिंहाचा वाटा उचलला असता. आणि जगाच्या पाठीवर देशाचं नाव आणखी उजळलं असतं.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.