पंचायत समितीचे सभापतीपद नाकारलेल्या डकांनी थेट उपमुख्यमंत्र्यांना अस्मान दाखवलं…

राजकारण हे असं क्षेत्र आहे जिथं कोण कधी कोणावर कसं भारी पडेल, कोण कोणावर कधी कोणता बदला घेईल, कोण कधी कोणाला आस्मान दाखवेल काही सांगता येत नाही. भूतकाळात डोकावून आपण बघितले तर भले भले दिग्गजांना अगदी नवख्या उमेदवारांसमोर पराभव स्वीकारावा लागला आहे.

असचं काहीस झालं होतं १९८० साली, बीड जिल्ह्यात. इथं पंचायत समितीच्या सदस्याने त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला आस्मान दाखवलं होतं.

लोकल बोर्डाच्या राजकारणापासून सुरुवात केलेल्या सुंदरराव सोळंके यांनी १९६७ साली केज मतदार संघातून पहिली विधानसभेची निवडणुक लढवली आणि जिंकली देखील. पहिल्याच फटक्यात आमदार झाल्यानंतर त्यांचा दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात पहिल्यांदाचं मंत्री म्हणून समावेश झाला. त्यांच्याकडे जलसंधारण, पाटबंधारे, महसूल अशी महत्वाची खाती होती.

त्यानंतर केज मतदारसंघ राखीव झाल्यानंतर १९७२ साली त्यांनी गेवराई मतदार संघातून निवडणुक लढवली. विशेष म्हणजे ते बिनविरोध गेवराईचे आमदार झाले. त्यांचं हे रेकॉर्ड जिल्ह्यात अजूनही कोणी मोडू शकलेलं नाही. त्यावेळी दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रीमडळात सार्वजनिक बांधकाम व दुग्ध विकास खात्याचे कॅबीनेट मंत्री म्हणून त्यांनी काम केले.

पुढे माजलगाव मतदारसंघाची स्थापना झाल्यानंतर तिसऱ्या वेळी ते माजलगावमधूनही विजयी झाले. त्यावेळी शरद पवार यांच्या पुलोद कार्यक्रमात सोळंकी यांनी सोबत येऊन उपमुख्यमंत्रीपद मिळवले. सोबतच त्यांना उद्योग, बांधकाम, छपाई, दुग्धविकास यासह महत्त्वाची खाती देखील मिळाली.

त्यामुळे त्यावेळी सोळंके यांची राज्यात भावी मुख्यमंत्री अशी प्रतिमा तयार होत होती.

पुढे १९८० साली पुलोद बरखास्त झालं, राष्ट्रपती राजवट लावू झाली आणि त्यानंतर नव्यानं झालेल्या निवडणुकांमध्ये सोळंके परत शरद पवार यांना सोडून काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे पवारांनी सोळंके यांना पराभूत करण्याचं मनावर घेतलं. त्यावेळी त्यांनी गोविंदराव डक यांना एस. कॉंग्रेसकडून उमेदवारी देण्याचं ठरवलं.

त्याच कारण होतं, सोळंके उपमुख्यमंत्री असताना गोविंदराव डकांना पंचायत समितीचे सभापती व्हायचे होते; परंतु सोळंके यांनी त्यांना सभापती केले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचं सांगितले जायचे. पवारांनी हे हेरले आणि डकांना सोळंके यांच्या विरुद्ध निवडणूक लढवण्यास तयार केलं. नुसतं तयारच केलं नाही तर डकांना घरी तिकीट पाठवून दिले.  

इतकंच नाही तर मतदानाच्या एक दिवस अगोदर पवार यांनी रात्री १२ वाजता ऐतिहासिक सभा घेतली. असं म्हणतात कि त्याचवेळी सोळंकेंचा पराभव निश्चित झाला होता. सोबतच त्यावेळी सिंदफणा नदीवर सुरु असलेल्या धरणाच्या जागेवरून काही समाज गट नाराज झाले होते विरोधी पक्षांनी त्यांचा मुद्दा प्रचारात सुंदरराव सोळंके यांच्या विरोधात वापरला.

त्याचा फटका देखील त्यांना या निवडणुकीत बसला. निकाल लागल्यानंतर डकांनी सोळंकेंचा २६०० मतांनी पराभव केला होता.

त्यावेळी निवडून आलेल्या गोविंदराव डकांची संपूर्ण राज्यात चर्चा होती. कारण धिप्पाड आणि तब्बल १५० किलो वजनाच्या डक यांना पाहायला मुंबईहून लोक येत होते. असं म्हणतात कि या परभावनांतर सोळंके सावरलेच नाहीत. कारण त्यानंतर त्यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. ते सहकाराकडे वळले.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.