१९४२ च्या लढ्यात इंग्रजांनी सर्वात मोठा इनाम अच्युतरावांवर लावलं होतं.

१९४२ सालचं ‘छोडो भारत’ आंदोलन हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सोनेरी पान. ७ ऑगस्टच्या मुंबई मधल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी जनतेला संदेश दिला की ‘आजपासून तुम्ही सर्वजण स्वतंत्र झाला आहात असे माना, सोबतच आपण भारताला स्वातंत्र्य तरी देऊ किंवा न थांबता प्रयत्न करताना मरून तरी जाऊ असं म्हणतं ‘करेंगे या मरेंगे’ चा मंत्र दिला.

मात्र इकडे समाजवादी नेत्यांना गांधीजींचा अहिंसावादी काहीसा मान्य नव्हता, म्हणून त्यांनी भूमिगत चळवळ कशी उभी करण्याच ठरवलं होतं. याचे मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस समाजवादी पक्षाने पुण्यात एक शिबिर आयोजित केलं होतं. ह्या शिबिरात राज्यातील पक्षाच्या निवडक कार्यकर्त्यांनाच बोलवलेले होते.

यात आचार्य नरेंद्र देव, युसुफ मेहेरअली, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, भाई कोतवाल, शिरुभाऊ लिमये, अशा दिग्गज नेत्यांच्या बरोबरीनं आणखी तेवढ्याच ताकदीची आणखी एक व्यक्ती तिथं उपस्थित होती ती म्हणजे,

अच्युतराव पटवर्धन

महाराष्ट्रातील समाजवादी नेत्यांमध्ये मोठे नाव असलेल्या अच्युतराव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भूमिगत चळवळ कशी चालवायची, चळवळीचा प्रसार गुप्ततेने कसा करायचा याच्या बारीकसारीक सूचना देण्यात आल्या. तसेच भूमिगत चळवळीचा कार्यक्रमही आखण्यात आला.

महात्मा गांधींनी जसे या आंदोलनाची घोषणा केली, त्याच रात्री म्हणजे ८ ऑगस्टला अच्युतरावांसह रंगराव दिवाकर, सुचेता कृपलानी, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे असे सर्व समाजवादी नेते ठरल्याप्रमाणे भूमिगत झाले.

दुसऱ्या बाजूला इंग्रज शासनाने म. गांधींसह पं. नेहरू, मौलाना आझाद, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल आदी काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना सरकारने अटक केली. यामुळे सर्वत्र जाळपोळ, मोर्चे, संप, निदर्शने, बहिष्कार सुरू करण्यात आले. सरकारी कार्यालये, पोस्ट कार्यालये, रेल्वे स्टेशन, पोलीस ठाणी जाळण्यात आली. सरकारने सामान्य लोकांवर लाठी, अश्रुधूर, गोळीबार करून जनतेचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला.

तसेच अच्युतरावांचे सोबती असलेले जयप्रकाश नारायण, सानेगुरुजी, ना. ग. गोरे, आचार्य नरेंद्र देव, युसुफ मेहेरअली, अशोक मेहता हे समाजवादी नेते या ना त्या कारणांनी लढा सुरू होण्याच्या आधीच पकडले गेले.

त्यामुळे साहजिकच भूमिगत लढ्याची सर्व जबाबदारी अच्युतरावांवर येऊन पडली होती. ती त्यांनी स्वीकारली.

टेलिग्राफचे खांब व तारा तोडणे, विद्युतखांब, व तारा तोडणे, रस्ते व रेल्वेमार्गावरील पूल उडवणे, रेल्वे उडवणे, ठिकठिकाणी रस्ते उखडणे, रेल्वेमार्गावरील प्लेट्स काढणे असे कार्यक्रम सुरु केले. पुण्यातील कॅपिटल सिनेमा बॉम्बस्फोट, वेस्टएण्ड सिनेमा बॉम्बस्फोट, कॉफी हाऊस बॉम्बस्फोट आणि नगरला सरोज सिनेमागृहात बाँम्बस्फोट करण्यात आले. तसेच जिल्ह्याच्या प्रमुख केंद्राशी असलेली दळणवळणाची साधने व संपर्क यंत्रणांचे नुकसान करण्यास सुरुवात केले.

अच्युतरावांच्या नेतृत्वातच भाई कोतवालांच्या सशस्त्र गटाचे कुलाबा जिल्ह्यातील आंदोलन, कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी खजिन्यावरील हल्ला, सांगलीजवळ कुपवाड येथील डिरेलमेन्ट, बार्शी लाईटमेल लूट, सातारा, मिदनापूर, बालिया येथील प्रति-सरकारे, जेजुरीचे खंडोबा देवस्थान लूट, अशा अनेक कारवाया भूमिगत चळवळीने घडवून आणल्या.

या चळवळीला मार्गदर्शन करण्यासाठी अच्युतरावांनी केंद्रीय भूमिगत समितीमार्फत ‘क्रांतिकारक’ नावाचे भूमिगत पत्र सुरू केले. त्याचे संपादक ते आणि एस. एम. जोशी होते. वेळच्या वेळी बुलेटिन्स छापून ती ठिकठिकाणी पाठविण्यात येत असतं.

चळवळीला आर्थिक मदत करण्यासाठी अच्युतरावांनी बनावट नोटा छापण्याची योजना बनवली. यासाठी त्यांनी थेट नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसलाच लक्ष केलं. पण नोटांसाठी लागणार दर्जेदार कागद कार्यकर्ते प्रेसमधून आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न फसला.

आता हे आंदोलन जर थांबवायचं असेल तर यामुळे त्यांना पकडलच पाहिजे असा चंगच इंग्रजांनी बांधला होता.  

अच्युतराव त्यावेळी मुंबईत होते. ताडदेवला अहमदनगरचा गुण्या नावाचा एक विद्यार्थी राहात होता. त्याच्याबरोबर त्याचे बरेच मित्र पण तिथं राहत असायचे. या गुण्याची अच्युतरावांवर फार श्रद्धा होती. त्याच्या खोलीवरच अच्युतराव काँग्रेस- समाजवादी पक्षाच्या भूमिगत नेत्यांची व कार्यकर्त्यांची गुप्त बैठक घेत असतं.

या ठिकाणच वैशिष्ट्य म्हणजे तिथं सुरुवातीला उंदीर मोठ्या प्रमाणावर होते. म्हणून भूमिगतांनी त्या जागेला ‘मूषक महाल’ असं नाव ठेवलं होतं.

मूषक महाल ही जागा विद्यार्थ्यांची असल्याने सरकारला या जागेवर संशय आला नव्हता. थोड्याच दिवसात या विद्यार्थ्यांचा जीव धिक्यात घालायला नको म्हणून अच्युतरावांनी सर्व विद्यार्थ्यांना तेथून जाण्यास सांगितले आणि ती जागा भूमिगतांचे मोठे वसतिस्थान झाली.

बैठकीस अच्युतरावांबरोबर डॉ. राम मनोहर लोहिया, रंगराव दिवाकर, रामानंद मिश्रा, एस. एम. जोशी, कमलादेवी चट्टोपाध्याय आदी अनेक नेते आणि कार्यकर्ते हजर असायचे.

अच्युतराव गुप्तपणे सर्वत्र फिरून लढ्याला मार्गदर्शन करीत होते. अरुणा असफअली आणि डॉ. राममनोहर लोहियासुद्धा लढ्याला मार्गदर्शन करीत होते. जयप्रकाश नारायण सप्टेंबर १९४२ मध्ये हजारीबाग तुरुंगातून निसटून आल्यावर मुंबईला येऊन अच्युतरावांना भेटले. त्यांच्या येण्याने भूमिगत चळवळीला आणखीन जोर आला.

‘मूषक महाल’ महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीचे प्रमुख केंद्र बनले.

काही दिवसातच ‘मूषक महाल’ मध्ये कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली. ब्रिटिश सरकारच्या गुप्त पोलिसांची भूमिगतांच्या हालचालींवर नजर होतीच. तेव्हा सुरक्षिततेच्या दृष्टीने तिथं जास्त दिवस थांबणं धोक्याच होतं. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या निवासाची सोय दुसरीकडे करावी असे अच्युतरावांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी भेंडी बाजारातील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका घरात त्यांची सोय केली.

त्या निर्जन जागेला ते ‘हडळ हाऊस’ असे म्हणत. कारण त्या जागी पूर्वी एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला होता. तिच्या भीतीने तेथे कोणीही राहत नव्हते. म्हणूनच सुरक्षिततेच्या दृष्टीने ती जागा भूमिगतांना सोयीची होती.

‘मूषक महाल’ आणि ‘हडळ हाऊस’ या दोन्ही ठिकाणी अच्युतराव वारंवार येत. जिल्ह्याचे प्रमुख कार्यकर्ते आले की अच्युतराव त्यांच्याकडून चळवळीचा आढावा घेत आणि त्यांना चळवळीस
मार्गदर्शन करत.

ते तेथे जास्त वेळ न थांबता लगेचच आपल्या गुप्त निवासस्थानी निघून जात. भूमिगत नेते आणि कार्यकर्ते स्वतःला ब्रिटिश गुप्त पोलिसांकडून पकडले जाऊ नये यासाठी सतत जागरूक असायचे. ब्रिटिश गुप्त पोलीस त्यांना पकडण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करीत होते.

अखेरीस ८ एप्रिल १९४३ रोजी ब्रिटिश गुप्त पोलिसांनी ‘मूषक महाल’ वर छापा टाकला.

यात शिरुभाऊ लिमये, सानेगुरुजी, नानासाहेब गोरे, माधव लिमये आदी नेत्यांना तेथे पोलिसांनी पकडले.

या महत्त्वाच्या नेत्यांना पकडल्यामुळे भूमिगत लढ्याला खीळ बसू नये आणि कार्यकर्त्यांमध्ये ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीची भीती निर्माण होऊ नये यासाठी अच्युतरावांनी ‘हडळ हाऊस’वर निवडक कार्यकर्त्यांची गुप्त बैठक घेतली.

या बैठकीला एस. एम. जोशी, बाबू भावे, शंकर पेंढारकर, वसंत बापट, रामदास फेणे, भा. रा. भागवत उपस्थित होते.

मूषक महालवर ब्रिटिश गुप्त पोलिसांनी छापा टाकल्यानंतर अच्युतरावांनी ‘हडळ हाऊस’ हे भूमिगत
लढ्याचे मुख्य केंद्र केले. परंतु हे ठिकाणही फार काळ गुप्त राहू शकले नाही.

१८ सप्टेंबर १९४३ रोजी ब्रिटिश गुप्त पोलिसांनी हडळ हाऊसवर छापा टाकला.

तेथे एस. एम. जोशी, मधू लिमये, विनायक करकरे, यशवंत पटवर्धन या नेत्यांना पकडण्यात आले.

पोलीस अधिकारी त्यांना नेत असताना या सर्वांनी घोषणा दिल्या – महात्मा गांधी की जय’, ‘भारतमाता की जय’. गाडीतून नेत असतानाही त्यांच्या घोषणा चालूच होत्या. या मागचा त्यांचा हेतू असा की, त्या इमारतीतील व मोहल्ल्यातील लोकांना कळावे की पकडलेले सर्व स्वातंत्र्य सैनिक आहेत, टोळीतील लोक नाहीत आणि तिथं येणारे भूमिगत कार्यकर्ते सावध होऊन पकडले जाऊ नयेत.

अच्युतराव येथे याच दिवशी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार होते. परंतु त्यांना ही जागा धोक्यात आहे असं कळल्याने त्यांनी आपला सेक्रेटरी रामदास फेणे याला हडळ हाऊसची स्थिती कशी आहे हे समजून घेण्यासाठी पाठवले होते.

परंतु रामदास फेणे तेथे पकडले गेल्याने अच्युतराव या छाप्यात पकडले गेले नाहीत.

अखेरीस अच्युतरावांना पकडण्यासाठी पोलिसांनी त्यावेळचा सर्वात जास्त म्हणजे जवळपास १ लाख रुपयांचा इनाम जाहीर केला. 

अच्युतरावांना इकडे काही काळ मेहेर मंडईतील त्यांच्या व्यापारी कार्यकर्त्यांनी लपवलं होतं. ते एका जागी जास्त वेळ थांबत नसत. सारखी वसती, ठिकाणे बदलत. काही काळ आचार्य आत्रे यांच्या आमोद या निवासस्थानी थांबले होते. 

सुरक्षिततेसाठी ते आपल्या निवासस्थानी कोणालाही भेटायला बोलवत नसत. कार्यकर्त्यांना ते दुसऱ्या कोणत्याही नवीन जागी भेटत. त्यांचे चिटणीस किंवा संपर्क व्यक्ती म्हणून काम करणाऱ्या एक- दोन विश्वासू व्यक्तींनाच त्यांच्या निवासस्थानाची माहिती असे.

ते जेव्हा दिवसा मार्गदर्शनासाठी बाहेर पडत तेव्हा त्यांची एक खास पद्धत होती. अनेक श्रीमंत लोक त्यांचे मित्र होते. बाहेर पडताना कोणत्याही एका मित्राची फॅशनेबल गाडी घ्यायचे आणि गाडी चालवायला ड्रायव्हर म्हणून अनेकदा श्रीराम महाराज पंडित, बाबुराव पाटणकर असे दिग्गज नाव असायचे.

अच्युतराव प्रवास करताना ड्रायव्हरच्या शेजारी बॉबकट केलेली, लिपस्टिक लावलेली सुंदर तरुणी
बसवली जायची. मागच्या सीटवर विठ्ठल पटवर्धन नोकराच्या वेषात बसलेला असायचा. त्याच्या शेजारी अच्युतराव ‘साहेबी’ पोषाखात बसत.

साहेबी पोषाख म्हणजे उत्तम पँट पर घालत. डोक्यावर हॅट घालत. ती नाकापर्यंत पुढे ओढलेली असे.

धारदार नाक आणि गोरा वण यामुळे ते पारशीसाहेब वाटत. पुढच्या सीटवर सुंदर तरुणी बसलेली असल्याने मागे साहेबी पोषाखातील अच्युतरावांकडे कोणाचे लक्ष जात नसे. कधी कधी ते बिनटपाच्या उघड्या घोडागाडीतूनही मुंबईच्या भरवस्तीतून फेरफटका मारून येत.

जनतेची अच्युतरावांना मोठी सहानुभूती आणि पाठिंबा होता. अच्युतरावांच्या धाडसामुळे आणि कल्पनाशक्तीमुळे लढा संपेपर्यत पोलीस त्यांना अटक करू शकले नाहीत.

प्रसिद्ध संपादक फ्रँक मोराएस, डॉ. बालिगा, यांच्यापासून आय.सी.एस. अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यापर्यत तसेच भारतीय सेनेतील अधिकार्यांनी व विमान कंपन्यातील पायलट्सनी देखील अच्युतराव आणि अरुणा असफअली तसेच इतर नेत्यांना भूमिगत काळात आश्रय दिला होता. अशा सगळ्यांच्या योगदानामुळेच हा भूमिगत लढा अच्युतराव यशस्वी करू शकले.

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. Komal says

    Very nice information….. I enjoyed reading it

Leave A Reply

Your email address will not be published.