मतदान करण्यासाठी पदवीधरच पाहीजे पण उमेदवार अंगठाछाप असला तरी चालतं..

महाराष्ट्रात सध्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात आता १ डिसेंबरला मतदान होऊन ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. आणि त्यानंतर पदवीधारकांना आणि शिक्षकांना त्यांचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी प्रतिनिधी मिळणार आहे.

पुढच्या महिन्यात होणाऱ्या या निवडणुकांसाठी मागील जवळपास वर्षभर मतदार नोंदणी चालू होती. यात पदवीधर मतदार यादीत नोंदणी करणारा आणि मतदान करणारा मतदार हा पदवीधर असलाच पाहिजे, असा निवडणुक आयोगाचा प्राथमिक नियम आहे.

तर शिक्षक मतदारसंघात मतदान करणारा शिक्षक असलाच पाहिजे, सोबतच शिक्षकाचा दर्जा माध्यमिक शिक्षकापेक्षा कमी नसावा आणि शिक्षक म्हणून किमान तीन वर्षे तो सेवेत असावा असे अनेक नियम आहे.

म्हणजे थोडक्यात काय, तर मतदान करताना तुम्ही त्या क्षेत्राशी संबंधित पाहिजे किंवा त्यातील तुम्ही अनुभवी आणि जाणकार पाहिजे. 

पण पदवीधर भिडूनों आणि आदरणीय शिक्षकांनो, या निवडणुकीत तुम्ही ज्याला मतदान करणार आहात, त्यांना मात्र यातील एकही अट लागू होत नाही. म्हणजे तुम्ही तुमचे प्रश्न मांडण्यासाठी ज्यांना सभागृहात पाठवणार आहात त्यांच्यासाठीचे नियम वेगळे आहेत.

ते असे आहेत कि,  पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार पदवीधरच असावा, अशी अट आहे असा जर तुमचा काही समज असेल तर तो आम्ही दूर करू इच्छितो. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की,

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव पदवीधरच्या यादीत असण्याची अट नाही. त्याचे नाव विधानसभा मतदारसंघाच्या यादीत असले तरी तो ही निवडणूक लढवू शकतो.

सोबतच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दहा सूचक लागतात. आणि त्या सूचकांची नावे पदवीधर मतदारसंघाच्या यादीत असली पाहिजे. तसे असेल तरच अर्ज वैध ठरतो. म्हणजेच उमेदवारासाठी नाही तर त्यांच्या सूचकांसाठी शिक्षण आवश्यक आहे. अशा आणि एवढ्याच अटी यासाठी आहेत.

त्यामुळे कोणतीही अशिक्षित व्यक्ती पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवू शकते.

आता शिक्षकांचे, शिक्षक उमेदवारांबद्दल पण शिक्षकच असावा जर काही तुम्हाला वाटत असेल तर थांबा. या शिक्षक उमेदवारांच्यासाठी कोणतीच शैक्षणिक पात्रतेची अट नाही.

उमेदवार भारताचा नागरिक असावा व त्याच्या वयाला किमान तीस वर्ष पूर्ण झालेली असावी, एवढीच शिक्षक आमदार होण्यासाठी लागणारी अट आहे.

थोडक्यात काय तर राजकारणी होण्यासाठी, निवडणुकीला उभे राहण्यासाठी आणि सभागृहात प्रतिनिधी होऊन प्रश्न मांडण्यासाठी शिक्षण लागतेच असे नाही.

त्यामुळे अंगठे बहाद्दर आणि शिक्षक नसलेली व्यक्तीसुध्दा निवडणूक लढवू शकते.

कदाचित याच कारणामुळे शिक्षक आणि पदवीधरचा अर्ज भरल्यानंतर शेवटला सही/अंगठा असे लिहिलेले असते. अनेकांना ही बाब अतर्क्य वाटते, पण शेवटी हेच वास्तव आहे. त्यामुळे विधानपरिषद हे पुनर्वसनाचे एक माध्यम आहे का असा प्रश्न पडतो. आता राजकीय पक्षांनी संकेत पळून पदवीधरांना आणि शिक्षकांनाच उमेदवारी द्यावी म्हणजे झाल. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.