हे १७ जण ग्रामपंचायतीतून पुढे आले आणि राज्याचे नेते बनले

आज राज्यातल्या २३५९ ग्रामपंचायतींचे निकाल आलेत. बहुतेक ठिकाणी भाजपा  पुढे आहे.

या निवडणूकांमध्ये उद्याचा आमदार, खासदार, मंत्री लपलेला असू शकतोय. भूतकाळात अनेक वेळा हे आपल्याला बघायला मिळालं आहे. गावच्या राजकारणातूनच आत्तापर्यंत कित्येक आमदार, खासदार, मंत्र्यांचे राजकीय करिअर घडले आहे.

त्यातीलच काही निवडक आणि राज्याचं राजकारण गाजवलेली नाव आणि त्यांचा प्रवास ‘बोल भिडू’ने आणला आहे.

१) सुधाकरराव नाईक :

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा राजकीय प्रवास सरपंच ते मुख्यमंत्री असाच आहे. १९५० च्या दशकात आपल्या छोट्याश्या गहुली गावचे सरपंच झाले. त्यानंतर १९६२ ते १९७२ पर्यंत त्यांनी पुसदच्या पंचायत समितीची धुरा यशस्वीपणे सांभाळली.

१९७२ ते १९७७ पर्यंत त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद भुषविले. त्याचवर्षी त्यांची मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. जुन १९७७ मध्ये ते राज्य विधान परिषदेवर नागपुर येथून स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून निवडून आले.

१९७८ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. पुढे त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये गृहनिर्माण, शिक्षणमंत्री अशी विविध खाती सांभाळली.

१९९१ मध्ये शरद पवार हे केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. ते २ वर्ष मुख्यमंत्री होते.

त्यानंतर १९९४ मध्ये त्यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले.२००१ मध्ये त्यांच निधन झालं.

२) विलासराव देशमुख :

विलासराव देशमुख हे राजकारणी होण्याआधी पुण्यात वकील म्हणून स्वतंत्र ओळख मिळवली होती. दोन अडीच वर्ष प्रॅक्टिस झाल्यानंतर वडिलांचा निरोप आला आणि १९७१ साली ते पुन्हा बाभूळगावला आले.

घरी कॉंग्रेसी वातावरणामुळे युथ कॉंग्रेसमध्ये काम करु लागले. ७२ च्या दुष्काळात काम केल्यानंतर त्यांचा जनसंपर्क वाढाल होता. त्यातूनच १९७४ मध्ये बाभूळगावचे सरपंच झाले.

पुढे जिल्हा परिषदेचे निवडणूक जिंकली. उस्मानाबाद जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर ८० सालात थेट आमदार झाले, पुढे राज्यमंत्री, मंत्री असा प्रवास राहिला.

१९९९ मध्ये ते पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आले. त्यानंतर २००४मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले.

२००९ मध्ये त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली. २०१२ च्या ऑगस्टमध्ये केंद्रीय मंत्रिपदावर असतानाच त्याचं यकृताच्या आजाराने निधन झाले. सध्या त्यांची दोन मुलं राजकारणात असून एक मंत्री आहेत तर दुसरे आमदार आहेत.

३) बाबासाहेब कुपेकर :

महाविद्यालयीन जीवनात राजकारण बाबासाहेबांच्या अंगात मुरले. गावातल्या राजकारणात त्यांचा प्रवेश झाला. १९६५ मध्ये कानेवाडीच्या सरपंचपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. याचवर्षी ते युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष झाले.

दोनच वर्षात म्हणजे १९६७ मध्ये ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले. त्यांना १९७२ मध्ये जिल्हा परिषदेत कृषी विभागाच्या सभापतीपदाची संधी मिळाली.

चंदगड विधानसभा मतदारसंघ दुर्गम-वाड्या वस्त्यांचा. १९९५ साली त्यांनी या विधानसभेची पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि या वाड्या वस्त्यांच्या मतदारसंघात ते निवडून आले.

१९९९ च्या निवडणुकीतही ते पुन्हा निवडून आले. २००४ ते २००९ दरम्यान विधान सभा अध्यक्ष होते. पुढे २००९ ते २०१२ दरम्यान ते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राहिले. २०१२ मध्ये त्यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर त्यांचा वारसा पत्नी संध्यादेवी कुपेकर यांच्याकडे आला.

४) विजयसिंह मोहिते पाटील :

काँग्रेसचे जेष्ठ नेते शंकरराव मोहिते यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा त्यांचा मुलगा विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे आला. ६० च्या दशकात अकलूज ग्रामपंचायतीचे सदस्य आणि पुढे सरपंच झाले.

१९७१ ते १९७९ च्या दरम्यान त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच अध्यक्षपद भूषवले.

पुढे १९८० ते २००९ असे जवळपास २९ वर्ष ते माळशिरसचे आमदार होते. या दरम्यान त्यांनी राज्य सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन व ग्रामविकास विभागाचे मंत्री तसेच

२००३ ते २००५ च्या दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पहिले.

पुढे २०१४ साली ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर माढा लोकसभा मतदारसंघातुन निवडून गेले. मात्र २०१९ मध्ये पक्षाशी मतभेद झाल्यानंतर ते राजकीय अज्ञातवासात आहेत. सध्या त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपकडून विधानपरिषदेचे सदस्य आहेत.

५) रावसाहेब दानवे पाटील :

१९७५ च्या आसपास वयाच्या २०व्या वर्षीच ते आपल्या जवखेडा गावाच्या राजकारणात उतरले. सरपंच झाले. त्यानंतर दानवे यांनी १९८० मध्ये भोकरदन पंचायत समितीची सभापतिपदाची निवडणूक जिंकली.

यानंतर १९८५ मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. पुढे १९९० व १९९५ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून आले. त्यानंतर १९९९, २००४ व २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर ते लोकसभेवरही निवडून गेले.

२०१४ मध्ये त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली होती.

पण तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर दानेवेंना प्रदेशाध्यक्ष म्हणून पाठवण्यात आले. २०१९ मध्ये दानवे यांची पुन्हा एकदा मंत्रीमंडळात वर्णी लागली. खास ग्रामीण ढंगात संवाद साधण्याच्या शैलीमुळे ते मतदारसंघात प्रसिद्ध आहेत.

६) एकनाथ खडसे :

अकोला येथे वाणिज्य विषयातील पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी मुक्ताईनगरातच समाजकारण सुरू केले. १९८० ते १९८५ या पाच वर्षांच्या काळात ते कोथळी गावचे सरपंच होते. याचदरम्यान त्यांचा जनसंघ, भाजपशी संपर्क आला. तेव्हापासून भाजपसोबत जोडले गेल्यानंतर सुरवातीला मुक्ताईनगर तालुका उपाध्यक्ष आणि नंतर पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष झाले.

भाजपच्या उमेदवारांच डिपॉझिट जप्त व्हायचे त्यावेळी १९९० मध्ये त्यांना तेव्हाच्या एदलाबाद (आताचा मुक्ताईनगर) विधानसभा क्षेत्रातून विजय मिळवला, त्यानंतर तब्बल तीस वर्षे म्हणजे १९९० ते २०१९ या काळात त्यांनी मुक्ताईनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

पुढे राज्यात महसूल, कृषी अशा विविध खात्याचे मंत्री, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते असा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या.

पण २०२० मध्ये पक्षाशी झालेल्या मतभेदातून त्यांनी भाजप सोडत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. सध्या एकनाथ खडसे विधानपरिषदेचे सदस्य आहेत.

७) गिरीष महाजन

गिरीश महाजन यांनी आपल्या जीवनाची राजकीय सुरवात ग्रामपंचायतीपासून केली. सन १९९२ मध्ये प्रथम जामनेर ग्रामपंयतीत सदस्य म्हणून निवडून आले. १९९२ ते १९९५ पर्यंत ते सरपंच होते. त्यावेळी त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम केले, त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे काम केले.

त्यानंतर १९९५ मध्ये जामनेर विधानसभा मतदार संघाची त्यांनी निवडणूक लढविली आणि आमदार झाले. त्यानंतर ते सातत्याने निवडून येत गेले. काही काळ ते युवा मोर्चाचे ते प्रदेशाध्यक्ष होते.

भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सन २०१४ ते २०१९ पर्यंत ते जलसंपदा व आरोग्य शिक्षण मंत्री होते. सध्या त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रीपद आहे.

८) शिवाजीराव कर्डीले : 

शिवाजीराव कर्डीले हे अहमदनगरच्या राजकारणातील मोठं नाव. लहानपणी शेती आणि दुग्धोत्पादन असं त्यांच काम होत. विविध राजकीय पदाधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, नगरचे प्रतिष्ठित लोकांच्या घरी ते दूध घालायचे.

त्यातून हळू हळू त्यांच्या ओळखी झाल्या. त्यातून ते लोकांचे प्रश्न सोडवायला लागले. त्यामुळे १९८४ साली ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी आग्रहाने त्यांना उभं केलं निवडणून आणलं आणि सरपंच पण केलं. पुढील दोन्ही निवडणुकात त्यांना बिनविरोध सरपंच म्हणून निवडून दिले.

१९९४ मध्ये त्यांनी जिल्हापरिषद निवडणूक देखील लढवली.

त्यानंतर १९९५ साली त्यांनी विधानसभा लढवली आणि ते आमदार झाले. त्यानंतर पुढील पंचवीस वर्षे आमदार म्हणून त्यांनी काम केले, मंत्रीपदाचीही संधी मिळाली.

९) सुरेश धस :

१९९१ मध्ये कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच आष्टी तालुक्यातील जामगावचे बिनविरोध सरपंच होऊन त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली. त्यानंतर आष्टी तालुका दूध संघाचे संचालक, आष्टी गटातून जिल्हा परिषद सदस्य असा चढता आलेख ठेवत त्यांनी १९९७ आणि १९९८ मध्ये जिल्हा परिषदेवर उपाध्यक्ष म्हणून काम केले.

त्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी त्यांना १९९९ आणि २००४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे निवडून आणले. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सुरेश धस निवडून गेले. त्यावेळी त्यांना दूध संघांची शिखर संस्था असलेल्या महानंदचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. तसेच अनुसूचित जातीजमाती कल्याण मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.

२०१२ मध्ये धस यांना महसूल व पुनर्वसन राज्यमंत्रिपद वर्णी लागली.

२०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लोकसभा आणि भीमराव धोंडे यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण त्यानंतर ते स्वगृही परतले आणि लातूर – उस्मानाबाद – बीड या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून आमदार झाले.

१०) विनायकदादा पाटील : 

निफाडच्या विनायक दादा यांनी देखील कुंदेवाडीचे सरपंच म्हणून राजकारणात श्रीगणेशा केला. त्यानंतर निफाड तालुका पंचायत समिती सभापती, निफाडचे आमदार, विधान परिषद सदस्य असा त्यांचा चढता आलेख होता.

शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व युवकसेवा अशा विविध खात्यांच्या मंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.

कुंदेवाडी विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन, नाशिक जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राज्यमंत्रिपदाच्या दर्जासह त्यांना महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही पाच वर्षे देण्यात आले होते.

११) बच्चू कडू :

रुग्णसेवा, विद्यार्थ्यांचे प्रश्न, अपंग, शेतकऱ्यांसाठी विविध आंदोलन अशी सामाजिक सेवा करत असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावाने ते राजकारणात आले.

राजकारणात येताच बच्चू कडूंनी १९९४ साली आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. दरम्यान चांदूरबाजार पंचायत समिती निवडणुकीतही बच्चू कडू निवडून आले थेट सभापती पदावर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. 

१९९९ साली विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघातून त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला. लोकसभा निवडणुकीतही ते थोडक्यात पराभूत झाले. त्यानंतर देखील त्यांनी आंदोलन थांबवली नाहीत.

त्या जोरावर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू प्रचंड मतांनी विजयी झाले. त्यानंतर २००९, २०१४ आणि आता २०१९ अशा सलग निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला.

महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांची राज्यमंत्री पदी वर्णी लागली होती.

१२) अब्दुल सत्तार :

माजी मंत्री कै.बाबूरावजी काळे यांच्या मार्गदर्शनात सत्तार यांनी १९८४ साली सिल्लोड ग्रामपंचायतची निवडणूक लढवून जिंकली. त्यानंतर १९९४ साली सिल्लोड नगरपरिषदेची पहिली निवडणूक झाली. यात पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला.

नगरपरिषदेच्या वीस वर्षाच्या सत्ता कार्यकाळात अडीच-तीन वर्षे सोडता पूर्ण कार्यकाळ अब्दुल सत्तार दाम्पत्यांनी नगराध्यक्ष पद भूषवलं आहे.

कै. शंकरराव चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांना काँग्रेस पक्षात प्रवेश दिला. आणि सोबतच २००१ साली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधानपरिषदेची उमेदवारी मिळवून दिली. विरोधकांवर मात करत ते विधानपरिषद सदस्य झाले.

२००४ साली सिल्लोड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली पण त्यांचा ३०१ मतांनी निसटता पराभव झाला. २००७ मध्ये विधान परिषदेतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

२००९ मध्ये सत्तार यांना पक्षाने सिल्लोड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. ही निवडणूक त्यांनी मोठ्या फरकाने जिंकली. पुढे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना कैबिनेट मंत्री पद देऊन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायाचे खाते दिले.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सुरेश बनकर यांचा पराभव करून ते पुन्हा आमदार झाले. २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश करत त्यांनी विधानसभा जिंकली आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. सध्या ते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आहेत.

१३) साहेबराव डोणगावकर :

साहेबराव डोणगावकर हे त्यांचे डोणगावचे १९६७ ते १९७९ अशी जवळपास १३ वर्ष सरपंच होते. पुढे गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, गंगापूर तालुका शिक्षण संस्थेचे १० वर्षे सरचिटणीस अशा विविध पदांवर ते होते. त्यासह मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील राहिले.

जेव्हा शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा पवार यांच्यासह ते देखील काँग्रेस (एस) मध्ये आले. काँग्रेस एसचे पाच वर्षे जिल्हाध्यक्ष राहिले. १९८० सालच्या लोकसभेचे तिकीट मिळाले पण पराभूत झाले.

१९८४ ला मात्र इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सहानुभूतीच्या लाटेत देखील काँग्रेस विरुद्ध काँग्रेस एसचे महाराष्ट्रात दोन खासदार निवडून आले होते. एक होते शरद पवार आणि दुसरे साहेबराव डोणगावकर.

१४) राम शिंदे :

१९९५ चौंडी योजनेचे काम बघत असताना राम शिंदे पंचायत समितीच्या जवळा गणातून प्रथम निवडणूक लढवली. मात्र, पहिल्या प्रयत्नात त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर १९९९ मध्ये चौंडी ग्रामपंचायत निवडणूक लढवून ते सरपंच झाले. २००२ मध्ये जामखेड बाजार समितीची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली. परंतु केवळ एका मताने त्यांना पराभव झाला.

सन २००४ मध्ये त्यांना चौंडी ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत होण्याची वेळ आली.

त्यानंतर त्यांनी २००९ साली कर्जत-जामखेड विधानसभेची भाजपकडून निवडणूक लढवली आणि ते आमदार म्हणून निवडून आले. २०१४ मध्ये देखील ते याच मतदारसंघातून निवडून आले.

राज्यात सत्ता येताच राम शिंदे यांना राज्यमंत्री आणि २ वर्षांनी पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद मिळाले.

२०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी राम शिंदेचा या मतदारसंघातून पराभव केला.

१५) संदीपान भुमरे :

पैठण विधानसभा मतदार संघातील पाचोड ग्रामपंचायत. सध्याचे शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या राजकीय प्रवासाला याच ग्रामपंचायतीपासून सुरुवात झाली होती.

१९८८ मध्ये पाचोड येथे शिवसेनेची शाखा स्थापन करत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पुढच्याच वर्षी म्हणजे १९८९ मध्ये ते पाचोड ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडुन आले होते. १९९२ साली ते पंचायत समिती सदस्य म्हणून ही निवडुन गेले. आणि उपसभापती देखील झाले होते.

त्यानंतर १९९५ साली विधानसभेची निवडणूक लढवत तेव्हापासून तब्ब्ल ५ वेळा आमदार झाले आणि आता २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देण्यात आलं होत. सध्याच्या सरकारमध्ये ते फलोत्पादन मंत्री आहेत.

१६) बबन शिंदे : 

माढ्याचे आमदार बबन शिंदे यांचा देखील प्रवास ग्रामपंचायतीपासूनचा. १९७२ पासून पुढील दशकभर ते निमगाव (टे) ग्रामपंचायतीचे सरपंच होते. पुढे १९७९ साली ते माढा तालुका पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले.

१९८५ ते १९९० याकाळात माढा पंचायत समितीचे सभापती देखील झाले. याचकाळात ते शिक्षण संस्था, दुधसंघ, जिल्हा बॅकेवर निवडून येत होते.

१९९२ साली सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणुक लढवत ते विजयी झाले. ते काँग्रेस पक्षाचे पक्षनेते देखील झाले.

१९९५ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९९, २००४ या वेळी देखील त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली. २०१९ मध्ये देखील ते निवडून आले आहेत.

१७) संजयमामा शिंदे :

करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणात सक्रिय आहेत. त्यावेळीच यांनी सरपंच पदापासून आपला राजकीय प्रवास सुरू केला. ते दहा वर्षे निमगावचे सरपंच होते.

त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आणि भाऊ बबनराव शिंदे यांच्या सहकार्याने १९९९ मध्ये संजय शिंदे कुर्डूवाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी निवडून आले होते.

२०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करमाळा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर शिंदे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आणि जिल्हा परिषदेचे बिनविरोध अध्यक्षही झाले.

आता २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत ते करमाळा मतदार संघातुन पहिल्यांदा आमदार झाले.

वरच्या सगळ्यांचा प्रवास वाचल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणूक किती महत्वाच्या असतात हे अधोरेखित होत. याच निवडणुकीत भविष्यात आता एखाद मोठं नेतृत्व देखील पुढं येऊ शकत.

आणखी काही नाव तुम्हाला आठवत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. Avinash balasaheb pawar says

    तुम्ही मोहोळ चे माजी आमदार राजन पाटील यांचा उल्लेख करायला हवा
    ते पण सरपंच, DCC बँक चेअरमन ,15 वर्ष आमदार राहिलेले आहेत आणि त्यांनी 2009, 2014 ,आणि 2019 ला 15 दिवसात पक्षाने दिलेले उमेदवार निवडून आणलेले आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.