धोतर नेसुन सिक्स मारणारे देवधर मास्तर

साल होत १८९६. पुण्याला कुप्रसिद्ध प्लेगच्या साथीन छळलं होत. गावाला रिकामं करून बळजबरीने छावण्यामध्ये वसवण्यात आलं होत. शाळा बंद होत्या.

अस्मानी संकट पण लहान मुलांसाठी ही एक मोठ्या सुट्टी होती. क्रिकेटचं वेड नुकतच भारतात आलं होत. इंग्लिश सैनिकांमध्ये क्रिकेट लोकप्रिय होत. त्यांचा खेळ बघून छावण्यामधली मुले लाकडी फळीचा बॅट आणि चिंध्यांचा बॉल बनवून खेळू लागली. यातच होता एक छोटा मुलगा नाव होत दिनकर बळवंत देवधर.

प्लेगच्या साथीत दिनकर देवधरला क्रिकेटनं झपाटलं हे वेड त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे वयाच्या १०१व्या वर्षापर्यंत टिकलं.

दिनकर देवधर म्हणजेच भारतीय क्रिकेटचे भीष्म पितामह म्हणून ओळखले जाणारे प्रो. डी.बी.देवधर. डी.बी.देवधर यांच्या स्फोटक बॅटीगची चर्चा ते शाळेत असताना पासूनच होती. नुमविच्या शालेय क्रिकेट टीमचे ते कप्तान होते.

त्याकाळात पारसी आणि इंग्लिश अधिकाऱ्यांची टीम यांच्यात प्रेसिडेन्सी सामने खेळवण्यात येत. १९०७साली हिंदूची टीम सुद्धा या स्पर्धेत उतरली. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असलेल्या देवधरांना त्यांनी गाजवलेल्या सामन्याची कीर्ती ऐकून हिंदू टीमकडून खेळण्याचे निमंत्रण देण्यात आले. १९११ साली ते पारसी संघाच्या विरुद्ध पहिला प्रथम श्रेणी सामना खेळले.

db deodhar
source- sarita magazine

देवधर मधल्या फळीत खेळणारे आक्रमक फलंदाज आणि पार्टटाईम लेगब्रेक स्पिनर होते. बॅकफुटवर जाऊन मोठे शॉट मारणे हि त्यांची खासियत होती. त्यांच्याकाळात स्पर्धात्मक क्रिकेट अतिशय कमी प्रमाणात खेळले जायचे. पारतन्त्र्यात असल्यामुळे भारताची वेगळी अशी टीम नव्हती. डी.बी देवधर एस.पी. कॉलेजमध्ये संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून जॉईन झाले.

एस.पी. च्या भल्या मोठ्या क्रीडांगणावर अथवा हिंदू जिमखान्याच्या ग्राउंडवर धोतर नेसलेले देवधर मास्तर सिक्स वर सिक्स मारतायत हे पुणेकरांना नेहमीचे दृश्य होते.

१९२६-२७ ला इंग्लिश कप्तान आर्थर गिलिगन याच्या नेतृत्वाखाली एमसीसी क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर आली. तेव्हा अखिल भारतीय टीम कडून खेळताना देवधर यांनी शतक झळकवले. भारतीय टीमचे हे पहिले शतक असेल पण भारतात राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट मंडळ अस्तित्वात नसल्यामुळे हा सामना अनधिकृत मानला गेला.

या सामन्यानंतर खर तर क्रिकेट जगताला जाणीव झाली की भारतात क्रिकेट गंभीरपणे खेळले जाते. आर्थर गिलिगनने आयसीसी म्हणजे त्याकाळातल्या इम्पेरिअल क्रिकेट कौन्सिलकडे भारताची शिफारिश केली. पतियाळाच्या महाराजांच्या पुढाकाराने बीसीसीआयची स्थापना झाली.

१९३२साली सीके नायडूंच्या नेतृत्वाखाली पहिली भारतीय टीम कसोटी दौऱ्यासाठी इंग्लंडला गेली. पण यात देवधर यांचा समावेश नव्हता.

नुकताच चाळीस वर्षं पूर्ण केलेल्या देवधर यांना चाळीसच्या वरच्या खेळाडूना संघात समावेश करता येणार नाही या नियमाचा फटका बसला. आयुष्यभर त्यांना कधीच अधिकृत भारतीय संघाकडून खेळता आले नाही. विजय मर्चंट म्हणतात की

“देवधर यांना भारताकडून कसोटी क्रिकेट खेळायला मिळाले नाही .यात त्यांचे नाही तर भारतीय टीमचं नुकसान जास्त झाले.”

बीसीसीआयने १९३४-३५च्या सिझन मध्ये महाराजा रणजीतसिंग यांच्या स्मरणार्थ रणजी सामन्यांची सुरवात केली. देवधर यांनी हि स्पर्धा देखील गाजवली. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्राने सलग दोन वेळा रणजी ट्रॉफी जिंकली. भारतीय क्रिकेटवर महाराष्ट्राच्या अधिप्त्याचा हा काळ महाराष्ट्रा मग्नीट्युड म्हणून ओळखला जातो.

याच रणजीच्या एका सामन्यात सर्वशक्तिमान मुंबईच्या संघाविरुध्द त्यांनी एकोणपन्नासाव्या वाढदिवसाला काही दिवस उरलेले असताना २४६ धावा फटकावल्या. या खेळीमध्ये चौकार आणि षटकारांची बरसात होती. आजकाल तिशीमध्ये असतानाच खेळाडू निवृत्त होऊन हॉस्पिटलच रस्ता पकडतात अशावेळी डी.बी देवधर त्यांच्या पुढे फिटनेसचे आदर्श उदाहरण ठरावेत.

त्यांची आणखी एक अविस्मरणीय खेळी म्हणजे नवानगरविरुध्दच्या रणजी सामन्यात त्यांनी वेगवान बॉलिंगच्या विरुद्ध दोन्ही डावात सेन्चुरी काढली. त्यावेळी ते बावन्न वर्षाचे होते.

१९४८ साली ते रिटायर झाले. तेव्हा ८१ फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यामध्ये ३९ च्या अवरेजने साडेचार हजार धावा काढल्या. यात ९ शतक आणि ११ विकेट यांचा समावेश होता. चार दशके मोठी त्यांची क्रिकेट कारकीर्द होती या दरम्यान दोन महायुद्धे घडून गेली होती. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर त्यांनी आपल्या एसपी महाविद्यालयातल्या नोकरीचाही राजीनामा दिला.

हिंदुस्तान टाइम्समध्ये क्रिकेटस्तंभलेखक म्हणून जॉब स्वीकारला. भारताच्या विदेश दौऱ्यावर संघाबरोबर ते कायम असायचे. टीममधल्या खेळाडूना मार्गदर्शनासाठी त्यांचे दरवाजे कायम उघडे असायचे. निवृत्तीनंतरही त्यांची भारतीय क्रिकेटसाठी धडपड सुरु राहिली. भारतीय संघाच्या व्यवस्थापनातही त्यांनी विशेष लक्ष दिले.बीसीसीआयचा उपाध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला.

१९६५ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री दिली. १९७३ साली बीसीसीआय ने त्यांच्या नावाने देवधर करंडक स्पर्धा सुरु केली. १९९१साली त्यांना नव्यानऊव्या वर्षी पद्मभूषण देऊन त्यांच्या क्रिकेटच्या योगदानाचा सन्मान केला. २३ ऑगस्ट १९९३साली त्यांचे निधन झाले.

cl deodhar
source- cricket country

काही वर्षापूर्वी पुण्यातील गहुंजे येथे उभा करण्यात आलेल्या नवीन स्टेडियमवर त्यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.