महाभारताच्या ही पूर्वीपासून हा रस्ता भारताला जगाशी जोडत आलाय
ही गोष्ट आहे भारतातील सगळ्यात जुन्या रस्त्याची. त्या काळातल्या रस्त्याची ज्याने आतापर्यंत जगाच्या इतिहासात वेगवेगळ्या प्रकारच्या सत्ता बघितल्या. जोपर्यंत पायी चालत जाणे सोडून काही वेगळे साधन माणसाजवळ नव्हते. या काळापासून ते आज इलेक्ट्रॉनिक रिक्षा चालेपर्यंत सगळे बदल या रस्त्याने बघितले आहेत. शकुनीमामाच्या रथापासून ते राम रहीम च्या कोंव्होयपर्यंत सगळी वाहने या रस्त्याने बघितली आहेत.
एका अर्थाने भारताच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा एक मोठा अध्याय या रस्त्यानेच सुरू होतो. या रस्त्याचे नाव आहे ग्रँड ट्रंक रोड.
या रस्त्याला उत्तरपथ किंवा सडक-ए-आजम असेही नाव दिले जाते. काही लोक याला बादशाही सडक म्हणूनही ओळखतात. सडक-ए-शेरशहा या नावाने हा रस्ता मोगल काळात प्रसिद्ध होता.
आता एखाद्या रस्त्याला अशी महान पैलवानी नावे का दिली असतील?
त्याचं कारण म्हणजे हा भारतातील सगळ्यात मोठा आणि सगळ्यात प्राचीन इतिहास सांगणारा रस्ता आहे. या रस्त्याला भारतातील सगळ्यात जुना रस्ता म्हणून ओळखला जातो.
जवळपास 2500 वर्ष या रस्त्याने मध्य एशियाला भारतीय उपखंडाशी जोडून ठेवले होते.
त्यामुळे भारतात झालेली आक्रमणे, सांस्कृतिक बदल आणि राजकीय पटावर घडणाऱ्या घटना या सगळ्याचा थेट संबंध या रस्त्याशी आहे. या रस्त्याची एकूण लांबी जवळपास 3710 किलोमीटर इतकी आहे.
म्हणजे उत्तरेच्या टोकापासून भारताच्या दक्षिणेच्या टोकापर्यंत असणाऱ्या अंतरापेक्षा काही कमी अंतर या एका रस्त्याच्या मार्फत आपल्याला पार करता येते. या रस्त्याला जवळपास दोन ते अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे.
हा रस्ता सुरू होतो तो थेट बांगलादेशमध्ये.
बांगलादेशमध्ये म्हणजे बांगलादेशपासून दूर, बांगलादेशच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून!
ही सीमा बांगलादेशच्या शेजारी म्यानमारला लागून आहे. तेथून हा रस्ता अख्ख्या बांगलादेशला पार करत भारतामध्ये शिरतो. त्यानंतर चितगाव आणि ढाका ही बांगलादेशमधील महत्त्वाची शहरे या रस्त्याने जोडली जातात. भारतात अर्थातच या रस्त्याचे सुरुवात कोलकात्या पासून होते. कोलकाता वरून येणारा हा रस्ता पुढे अलाहाबाद म्हणजेच सध्याचे प्रयागराज आणि पुढे तसाच राजधानी दिल्लीमधून जातो.
इथून निघून हा रस्ता अमृतसरला येऊन पोहोचतो. पंजाब प्रांतातून अमृतसर मधून हा रस्ता लाहोरला जोडला जातो.
सध्याच्या पाकिस्तानमधील महत्त्वाची शहरे अर्थात रावळपिंडी, पेशावर ही याच रस्त्याने जोडलेली आहेत. पाकिस्तान मधून पुढे जात हा रस्ता थेट अफगाणिस्तानमधील काबुल पर्यंत जातो.
हा रस्ता भारतात इसवीसनपूर्व 322 सालापासून कार्यरत असल्याचे पुरावे सापडले आहेत.
महाभारतामध्ये या रस्त्याचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख केलेला आहे. मौर्य काळाच्या आधीही हा रस्ता अस्तित्वात होता असा तज्ञांचा दावा आहे तो याच कारणासाठी.
या काळामध्ये या रस्त्याला उत्तरपथ म्हणून ओळखले जात असे. मध्य आशियामध्ये तसेच इराणकडे जाण्यासाठी रस्ता मोठ्या प्रमाणात वापरला जात होता. अनेक प्राचीन बौद्ध धर्माच्या ग्रंथांमध्येही या रस्त्याने प्रवास झाल्याचा उल्लेख आढळतो. ग्रीक नगरराज्यांमध्ये पोचण्यासाठी व व्यापार करण्यासाठी प्राचीन काळात या रस्त्याचा वापर झाल्याचे पुरावे आढळतात.
गांधार देशाचा राजा म्हणून शकुनि जेव्हा हस्तिनापूरच्या राजधानीत येतो तेव्हा त्याने उत्तरपथ मार्ग वापरल्याचा उल्लेख आहे.
चितगाव, फेणी, कोमिला, नारायणगंज, ढाका आणि राजशाही ही आजच्या बांगलादेशमधील महत्त्वाची औद्योगिक शहरे या शहरांना जोडणारा दुसरा कोणताही रस्ता आज पर्यंत उपलब्ध नाही म्हणून बांगलादेशच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांची भिस्त ही याच ग्रँड ट्रंक रोडवरती आहे. हावडा, कोलकाता, दुर्गापुर या पश्चिम बंगालमधील शहरांना बिहारमधील पूर्णिया, पटना भागाशी जोडणारा हा मार्ग आहे. बिहारचे उत्तर प्रदेशशी असणारे नाते याच रस्त्यातून तयार झाले आहे.
वाराणसी, अलाहाबाद, कानपुर, आग्रा, मथुरा, अलिगड, दिल्ली, सोनिपत, पानिपत, करनाल, कुरूक्षेत्र, अंबाला, लुधियाना, जलंधर, अमृतसर असा सगळा उत्तर भारतातच या रस्त्याने आपल्या कवेत घेतला आहे.
पाकिस्तानचा पंजाब प्रांत आधीपासूनच सधन प्रांत राहिला आहे.
त्यामुळे या भागातील बहुतांश मोठी शहरे या रस्त्याने जोडली गेली आहेत. लाहोर, गुजरांवाला, रावळपिंडी पेशावर, जलालाबाद या पाकिस्तानच्या सुवर्ण रेखेला जोडण्यासाठी हा एकच मार्ग अस्तित्वात आहे. आणि शेवटी तो काबुल या अफगाणिस्तानचा राजधानीपर्यंत जातो.
हा मार्ग इसवी सन पूर्व तिसर्या शतकात बांधण्यात आला होता. त्यावेळी त्याला उत्तरपथ म्हणजे उत्तर भारतातील रस्ता असे सरळसोट नाव दिले होते.
मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याने जवळपास सर्व उत्तर भारत आपल्या ताब्यात घेतला होता. या काळामध्ये पहिल्यांदा एकाच राज्याच्या ताब्यात एवढा प्रचंड देश आल्याने परस्पर व्यापारासाठी दूरवर जाण्याची गरज पडत होती.
म्हणून या काळात हा रस्ता बनवण्यात आला होता. गंगेच्या समुद्राला मिळणाऱ्या संगमापासून ते राज्याच्या नैऋत्येकडील अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत या रस्त्याचा विस्तार होता.
मौर्य काळात या रस्त्यामध्ये विशेष सुधारणा झाली. आज रस्ता च्या स्वरुपात आहे त्याला तितके विशाल स्वरूप देण्याची पायाभरणी तेथूनच झाली. या काळात भारताचा इतर देशांसोबत चा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला होता. आशिया आणि बॅक्टरीया या भागातून प्रवासी भारतात येत. तक्षशिला आणि पुरुषपुरा ही महत्त्वाची शहरे होती. येथे परदेशी लोकांचा कायम भरणा असे.
आज आपण ज्याला पेशावर म्हणतो ते म्हणजेच पुरुषपुरा. सोसा ते सारदिस ही या रस्त्याची सीमा म्हणून ओळखली जायची.
तक्षशिला पासून ते पाटलीपुत्र या राजधानीपर्यंत या रस्त्याचा विस्तार होता. पाटलीपुत्र म्हणजे आजच्या बिहारची राजधानी पाटणा हे शहर. म्हणजे एखादा प्रवासी अफगाणिस्तानवरून निघून या रस्त्याने बिनदिक्कतपणे थेट बिहार पर्यंत प्रवास करू शकत असे.
चंद्रगुप्त मौर्याने या रस्त्याचा कारभार पाहण्यासाठी एक वेगळे खाते तयार केले होते. सैन्यामधील एका वेगळ्या तुकडिकडे या रस्त्याचा कारभार सोपवला जात होता. रस्त्यावर करावयाची डागडुजी आणि प्रवाशांना येणाऱ्या अडचणी या सगळ्यांकडे हे खाते लक्ष पुरवत असे.
चंद्रगुप्त मौर्याच्या राजदरबारामध्ये पंधरा दिवस राहून गेलेला ग्रीक अधिकारी मॅगस्थेनस याने आपल्या लेखनामध्ये याचा उल्लेख केला आहे.
हा रस्ता आठ टप्प्यांमध्ये बनवला आला होता. एकूण दोन हजार सहाशे किलोमीटर इतका परिसर या रस्त्याने व्यापला होता. हस्तिनापुर, कन्याकुब्ज, प्रयाग, ताम्रलिप्ति ही शहरे जोडणारा हा तेव्हाचा एकमेव रस्ता होता. पाणिनीच्या व्याकरणाचा मध्ये देखील या रस्त्याचा उल्लेख आढळतो.
सम्राट अशोकाच्या काळात या रस्त्यामध्ये काही डागडुजीचे काम करण्यात आले. अनेक ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण झाले. जुन्या रस्त्याची सुधारणा करण्यात आली. त्याने दिलेली रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याची आज्ञा याच रस्त्याच्या बाबत होती.
याच रस्त्याने जाता जाता त्याचे अनेक शिलालेख सापडले आहेत. त्याने या रस्त्यांवर जाताना व्यापारी आणि धर्मगुरूंना सोय व्हावी म्हणून अनेक ठिकाणी विश्रामगृहे उभारली होती. दर अर्ध्या कोसावर विश्रामगृहे असावीत असा त्याचा आदेश आहे.
नंतरच्या काही काळात राजा कनिष्क याने देखील या रस्त्याचा कारभार सांभाळला होता असाही इतिहास आहे.
रुपया हे चलन म्हणून सर्वप्रथम भारतात सुरू करणारा शेर शह सुरी या बादशहाच्या काळात या रस्त्याचे कामकाज कितीतरी वेळा नव्याने पुन्हा करावे लागले होते . याच रस्त्याचा वापर नंतरच्या काळात मुघलांनी व्यापारासाठी केला.
त्यानंतर ब्रिटिश सत्ताही याच रस्त्याने आपला व्यवहार आणि व्यापार करत असे. शेरशाह सुरीने या रस्त्याचे कामकाज करताना यामध्ये सोनारगाव आणि रोहतक ही दोन शहरे अजून बनवली. हा रस्ता त्या शहरांकडून वळवून घेतला.
त्यानंतरच्या काळात या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले होते.
चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात असणारी भरभराटीची परिस्थिती यायला सुर साम्राज्याचे राज्य उदयाला येईपर्यंत वाट पाहावी लागली. शेरशहा सुरी यांनी सोळाव्या शतकामध्ये या रस्त्याचे कामकाज पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पावले उचलली. अनेक फळांची झाडे, सावलीसाठी लावण्यात येणारी झाडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावण्यात आली. दर दोन किलोमीटरवर एक सराई बनवण्यात आली. अंतर मोजण्यासाठी त्या काळातील माईलस्टोन म्हणजेच “कोस मिनार” बनवण्यात आले.
बावडीचीही व्यवस्था करण्यात आली. प्रवाशांना पिण्यासाठी पाण्याची सोय करण्यात आली तसेच आराम करता यावा यासाठी ठिकठिकाणी काही निवारे उभारण्यात आले. काही जागी शेरशहा सुरी याने बागाही बनवून घेतल्या होत्या. सराई मध्ये थांबणाऱ्या लोकांसाठी झाडाच्या खालीच पंगती मांडल्या जात. हे अन्न त्यांना फुकट उपलब्ध करून दिले जात असे.
शेरशहा सुरी चा मुलगा इस्लाम शाह सुरी याने या रस्त्याचा विस्तार बंगाल प्रांतांमध्ये अजून वाढवला. इकडे अनेक महत्त्वाची नवीन शहरे तयार करण्यात आली व या रस्त्याला त्या शहरांशी जोडण्यात आले.
मोगल सत्तेने या रस्त्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. जहांगीर राजाच्या काळात या रस्त्याचा वापर वाढत गेला. आपल्या छानछोकी आणि दर्शनी सौंदर्याकडे लक्ष देण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जहांगीर बादशहाने या रस्त्यावर असणाऱ्या सर्व सराई सुशोभित करण्याचा आदेश दिला होता.
“बनवल्या जाणाऱ्या सर्व सराई या एकाच प्रकारे बांधाव्यात. त्यांच्यासाठी भाजलेल्या पक्क्या वीटा आणि दगडांचा वापर करावा”
असे आज्ञापत्र त्यांनी काढले.
या रस्त्यावर मोठी लांबलचक पाने असणारे वृक्ष लावावेत लाहोर ते आग्रा या मार्गाकडे विशेष लक्ष देण्यात यावे याकडे जहांगीर बादशहाचा कटाक्ष होता या रस्त्याला सुरी सडक-ए-आझम म्हणायचा मोगल काळामध्ये याचे नाव बादशाही सडक असे पडले.
दिल्लीची सत्ताअफगाणिस्तान मधून आलेल्या लोकांवर ती येऊन पडली तेव्हा मेहमूद शहा दुराणी या राजाने आपल्या अफगाणी सैनिकांना आदेश देऊन या रस्त्याची डागडुजी करून घेतली होती. याच काळात हा रस्ता थेट अफगाणिस्तान पर्यंत जाऊन पोहोचला.
ब्रिटिश काळामध्ये 1833 आणि 1860 या काळांमध्ये या रस्त्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. रशिया किंवा इतर लोक अफगाणिस्तानमधून भारतावर हल्ला करतील ही भीती इंग्रजांना सतत वाटत होती. त्यामुळे त्यांनी खैबर खिंडीपासून पुढे सैन्याची लवकर वाहतूक करता यावी याकडे विशेष लक्ष दिले. म्हणून या रस्त्यावर ब्रिटिशांचा विशेष जीव होता. त्यांनी आपल्या सैन्याच्या हालचालीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून या रस्त्याची दुरूस्ती केली. या काळात या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. या कामासाठी दर महिन्याला 1500 इतका खर्च आल्याचे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिले आहे. 1830 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने या कामाची सुरुवात केली होती.
अर्थात त्या काळापासूनच या रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप करण्यात आले होते.
प्रवास करण्यासाठी हा रस्ता वगळता दुसरा कोणताही विश्वसनीय मार्ग तेव्हा भारतात नव्हता. ब्रिटिशांनी पोस्ट व्यवस्था सुरू केल्यानंतर या रस्त्याने वाहतूक अजूनच वाढली. भारतभरात पाठवल्या जाणाऱ्या पत्र आणि पोस्टाच्या व्यवस्थेसाठी हाच मार्ग वापरला जायचा.
कित्येक शतके हा रस्ता या भागातील एक महत्त्वाचा व्यापाराचा मार्ग होता.
भारतात देशोदेशी होऊन येणार्या व्यापाऱ्यांनी आक्रमकांनी राजांनी याच रस्त्याचा वापर केला. जुन्या भारतीय गणराज्यामध्ये परस्परांना जोडण्यासाठी हा रस्ता एक महत्त्वाचे साधन होता.
“वेगवेगळी राज्य असूनही भारत हा एकच प्रदेश आहे” हे या रस्त्यावरून कुणालाही उमजून येई.
भारतात बदलत जाणाऱ्या परिस्थिती, प्रदेश, लोकांच्या राहणीमानाच्या पद्धती त्या काळीही तशाच होत्या. भारताच्या या विविधतेला जोडणारा हा सगळ्यात जुना सांधा होता.
ब्रिटिशांच्या काळात ह्या रस्त्याला ग्रँड ट्रंक रोड असे नाव पडले. अनेक लेखकांनी आपल्या लेखनामध्ये याचा उल्लेख केला आहे. 2015 साली युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या शतकांच्या काळानंतर आजही ग्रँड ट्रंक रोड वापरात आहे कित्येक जागी भारत सरकारने यावर मोठे हायवे उभारले आहेत पाकिस्तानमध्येही विविध शहरांना जोडणारे मार्ग आणि रस्ते यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे अनेक देशांनी यावर आपले राष्ट्रीय महामार्ग उभे केले आहेत.
हे ही वाच भिडू.
- या राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.
- कितीही टिका केली तरी टिपू सुलतानने रॉकेटस् बनवल्याची कर्तबगारी दूर्लक्षित करता येत नाही
- पृथ्वीराज चौहान यांच्या अस्थी अफगाणिस्तानातून भारतात आणणारा शेर सिंह राणा सध्या काय करतो?
धन्यवाद