म्हणून गुजरातची गाढवं जगात भारी समजली जातात..!

गाढव म्हणजे येडा, बिनडोक, समज नसलेला आणिक कायकाय. पण ही गाढवं जर ८० किमी प्रतितासाने पळू शकताय म्हणल्यावर काय म्हणाल?

या गाढवांना ओळखल्यावर तुम्ही परत कुणाला गाढाव म्हणणार नाही.

या जंगली गाढवांना इंडियन वाईल्ड ऍस म्हणून त्यांना ओळखलं जातंय. (चावट वाचकहो, ती ऍस नाही, गाढवाला ऍस म्हणत्यात ब्रिटिशांत भिडू!) खूर किंवा घुडखुर असंही स्थानिक नाव त्यांना दिलं गेलंय.

गुजराती लोकं ह्यांना ओंगर म्हणून ओळखतात.

दक्षिण आशियात भारतातच ही गाढवांची जमात सर्वाधिक आढळते. अर्थात पाकिस्तान, इराण, इस्राएल, तिबेट, मंगोलिया, सौदी अरेबिया ह्या भागात अगदी तुरळक संख्येनं त्यांचं अस्तित्व कसबसं टिकून आहे. आपल्या अफ्रिकन भावकीपेक्षा ही गाढवं रंगरूपात वेगळी आहेत. त्यांच्या पाठीवर असणाऱ्या केसांच्या पट्ट्यासाठी ती ओळखली जातात. त्यांना पाठीपासून ते शेपटापर्यंत विटकरी रंगाच्या केसांचा झुपका असतो.

कच्छच्या रणात त्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यासोबतच सुरेंद्रनगर, मेहसाणा ह्या जिल्यांमध्येही ते आढळतात.

त्यांची संख्या एकेकाळी रोडावली होती त्याच कारण म्हणजे होणारी अमर्याद शिकार. हे गाढव अतिशय चपळ प्राणी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळं त्याचा पाठलाग करून शिकार करणे त्याकाळातील राजांचा आवडता छंद होता. जीपनेही त्याच्या मागे जाणं सोपी गोष्ट नव्हती. अकबराने स्वतःच्या काढून घेतलेल्या 60% चित्रांमध्ये त्याला गाढवांची शिकार करताना दाखवलं गेलंय.

स्पष्ट आहे, एवढ्या वेगानं त्यांची संख्या कमी होणे साहजिक आहे. 

हा एकमेव प्राणी आहे ज्याने गवताळ प्रदेश नसताना 59 अंश सेल्सियस एवढ्या मोठ्या तापमानाच्या प्रदेशातही हवामानाशी जुळवून घेतलं आहे.

एकेकाळी त्यांच्या झुंडी हजारांनी सोबत असायच्या. १९५८-६० ह्या काळात कच्छ च्या रणात पसरलेल्या आजारामुळे त्यांनी संख्या कमी होऊन ही प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर होती. त्याच्याच पुढच्या वर्षी आफ्रिकन घोड्यांच्या तापाचा रोग पसरला आणि ही गाढवं पटापट मरू लागली.

1956 मध्ये 3, 500 असणारी त्यांची संख्या 1962 मध्ये कमी होऊन 870 इतकीच उरली होती.

1972 हे ह्यात महत्त्वाचं वर्ष होतं. तेव्हा पहिला कायदा ह्यांच्या संरक्षणासाठी करण्यात आला आणि त्यांच्यासाठी समुद्री पट्ट्यालगत मिठाने भरलेल्या वाळवंटी भागात अभयारण्य उभारण्यात आलं.

ह्याच वर्षी वाईल्डलाइफ प्रोटेक्शन ऍक्ट तयार झाला आणि 4954 चौरस किमी क्षेत्र राखीव ठेवण्यात आलं.

2016 साली ह्या अभयारण्यात तब्बल 15,000 पर्यटकांनी मुक्काम ठोकला होता. अभिताभ बच्चन यांनी आपल्या ‘कुछ दिन तो गुजारो गुजरात में’ जाहिरातीत ह्या अभयारण्याची जाहिरात केली होती. जसजशी शिकारीची मर्यादा नियंत्रित झाली तसतशी त्यांची संख्या वाढत गेली.
आता मिठाची गृहे असणारी ही जागा स्वतःच धोक्यात आली आहे.

जागतिक पातळीवर तापमानवाढ झाल्यामुळं तसेच मिठांच्या खोदकाम यामुळं जगभरात ह्यांच्या राहण्याच्या जागा धोक्यात आल्या आहेत. (जगातल्या इतर भागांत मीठ खाणींमधून काढलं जातं. जमिनीवर कधीकाळी समुद्र असल्यामुळं हे मीठ पृथ्वीच्या पोटात तसंच आहे.) शिवाय हा भाग पाकिस्तान सीमेवर असल्यानं सतत अनेक कुरापती काढून फायरिंग करणाऱ्या चकमकींमुळे ह्या जातीवर अनेकदा अरिष्ट ओढवले आहे.

ही गाढवांची जमात आता आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्तंगत पावत चाललेली जात म्हणून यादीत आलीय. २००९ साली झालेल्या त्यांच्या गणनेत ४,०३८ गाढवं सापडली होती. डिसेंबर २०१४ आकडा वाढून ४४५१ झाली असेल असा अंदाज केला गेला होता. त्यामुळं ह्या जातीचं संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.