लोक म्हणतात हा रफी आणि किशोर पेक्षा मोठा गायक आहे.

शास्त्रीय संगीतात घराणी असतात. या संगीत घराण्यांचे गायकीवरून वाद असतात . असाच वाद भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा आहे. मोहम्मद रफी विरुद्ध किशोर कुमार.

खरं तर हे दोन्ही गायक एकमेकांच्या गाण्याचा आदर करणारे खास दोस्त. पण यांचे फॅन्सच त्यांच्या नावावरून एकमेकाच्या उरावर बसतात. पण हां दक्षिणेकडे मात्र रफी आणि किशोरपेक्षा एका गायकाला सर्वश्रेष्ठ मानलं जात, त्याच नाव “के.जे. येसुदास”

येसुदास यांचा जन्म १० जानेवारी १९४० रोजी केरळमध्ये एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांचे वडील ऑगस्टिन जोसेफ हे मल्याळी नाटकामध्ये अभिनेता आणि संगीतकार होते. पण संगीत हेच त्यांचे पहिले प्रेम होते. तोच आपला धर्म हीच त्यांची श्रद्धा होती. येसुदास त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा.

ऑगस्टिन जोसेफनी येसुदास लहान असतानाच त्याच्या आवाजाची रेंज ओळखली होती. त्यांना माहित होते हा मुलगा पुढे जाऊन संगीत क्षेत्रात कमाल करणार आहे. त्यांनी तो चार वर्षाचा असतानाच गाण्याची तालीम देण्यास सुरवात केली.

घरची परिस्थिती ओढातानीची होती पण त्याला चांगल्या संगीत स्कूलमध्ये शिकण्यास पाठवले. केरळ मधल्या त्या काळातल्या सगळ्या मोठ्या उस्तादांच्या पायाशी येसुदासला घातले. येसुदासने सुद्धा आपल्या वडिलांचा अपेक्षाभंग केला नाही.

वीस वर्षांच्या तालीमीनंतर एक पक्का गायक तयार झाला.

आज कोणाला सांगून विश्वास बसणार नाही पण सुरवातीला ऑगस्टिन जोसेफना चेन्नईच्या स्टुडिओमधून तुमच्या पोराच्या आवाजात दम नाही असं सांगून परत पाठवण्यात येत होत. अखेर त्याला एम.बी.श्रीनिवासन या संगीतकाराने  ब्रेक दिला. तिथून येसुदासने मागे फिरुनच पहिले नाही.

मल्याळम,तामिळ,तेलगु, कन्नड या सगळ्या भाषेतल्या सिनेमात त्यांच्या आवाजाची धूम उडाली. १९६५मध्ये त्यांना रशियन सरकारने त्यांना गाण्यासाठी खास आमंत्रण दिले.

गोड मखमली आवाज ही येसुदास यांची ओळख होती. हिंदीत ज्याला सुकून म्हणतात असं फिलिंग त्यांची गाणी ऐकली की वाटत. 

त्यांच्या आवाजाची कीर्ती हिंदी पर्यंत पोहचली. संगीतकार सलील चौधरीनी त्यांना बासू चटर्जी यांच्या छोटीसी बात या सिनेमासाठी एक गाण गायला लावलं,’ जानेमन जानेमन तेरे दो नयन’. या गाण्यानंतर शांत सज्जन दिसणारा अभिनेता अमोल पालेकर याच्यासाठी येसुदास यांचाच आवाज सुट होतो असे गणित बॉलीवूडने बांधले.

संगीतकार रविंद्र जैन यांच संगीत असलेल्या चितचोरची गोरी तेरा गांव बडा प्यारा सारखी गाणी सुपरहिट झाली.

पण दुर्दैवाने येसुदास यांचा म्हणावा तसा उपयोग हिंदी फिल्म इंडस्ट्रीने केला नाही. तरीही सदमा मधलं अप्रतिम लोरी गीत “सुरमई अखियोंसे” असो किंवा रहमानचं संगीत असलेल्या दौडमधलं”ओ भंवरे” असो येसुदास यांनी आपल्या गायकीची छाप उठवली.

जन्मापासून अंध असलेले जेष्ठ संगीतकार रविंद्र जैन म्हणायचे,

” जर मला ही दुनिया बघायची संधी मिळाली तर ईश्वराचा हात असलेल्या येसुदास यांना भेटायला आवडल असत.”

येसुदास यांनी विविध भाषेत मिळून तब्बल ऐंशी हजार गाणी गायली आहेत. साठ वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर अनेक पुरस्कारांचा वर्षाव झाला. 

भारतातील सर्वात प्रतिष्ठेचा नॅशनल अवाॅर्ड त्यांना विक्रमी आठवेळा मिळाला. केरळ राज्याचा उत्कृष्ठ गायकाचा पुरस्कार पंचवीसवेळा , तामिळनाडूचा पाच वेळा आणि आंध्रप्रदेशचा चार वेळा. हे सोडून त्यांना फिल्मफेअरसारखे पुरस्कार किती मिळाले याला गणतीच नाही.  भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि दोन वर्षापूर्वी पद्मविभूषण हे पुरस्कार दिलेले आहेत. युनेस्कोने त्यांच्या संगीत आणि शांततेसाठी केलेल्या कार्याचा पुरस्कार देऊन सन्मान केला.

गंमतीनं असं म्हंटल जात येसुदास यांच्या घरी अवाॅर्ड ट्रॉफी ठेवायलाही जागा उरली नाही. अखेर त्यांना जाहीर करावं लागलं की कोणताही पुरस्कार ते स्वीकारणार नाहीत.

असे हे जागतिक पातळीवरही आपल्या देशाचं गाण पोहचवणारे येसुदास. पण काही वेळा त्यांना आपल्या देशातच अपमान सहन करावा लागला.  त्यांचे गुरु चेन्बाई वैद्यनाथ भागवातर यांच्या प्रेरणेने नारायण गुरु यांच्या शिकवणीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. यातूनच त्यांनी आपल्या गाण्यामधून धर्माधर्मातील तेढ मिटावी यासाठी प्रयत्न सुरु केले.

एकदा गुरु चेन्बाई त्यांना केरळच्या सुप्रसिद्ध गुरुवायूर मंदिरात घेऊन गेले होते, मात्र तिथे येसुदास धर्माने ख्रिश्चन असल्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश मिळाला नाही.

i.0
गुरु चेंबई आपल्या शिष्याचा येसुदासचा सन्मान करत असताना

वास्तविकपणे येसुदास यांनी गुरुवायूरपन्न यांची अनेक भक्तीगीत गायली आहेत आणि ती खूप प्रसिद्ध देखील आहेत तरीही त्यांना प्रवेश दिला नाही. याचा जास्त राग गुरु  चेंबई यांना आला. त्यांनी येसुदासचा अपमान स्वतःचा अपमान मानून मंदिरात प्रवेश केला नाही आणि त्याला घेऊन मंदिरासमोरच्या पटांगणात रात्रभर मल्ल्याळम भक्ती गीतांची मैफिल केली.

येसुदास यांना सर्वच ठिकाणी भेदभावाची वागणूक मिळाली असे नव्हे. ते दर वर्षी शबरीमाला मंदिरात यात्रेदरम्यान दर्शनास जातात. पद्मनाभ स्वामी मंदिरात त्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या रसिक चाहत्यांनी अॉनलाईन पिटीशनची चळवळ चालवली होती. मन्दिर प्रशासनाने देखील त्यांना ती परवानगी दिली.

एकदा ख्रिश्चन धर्मगुरूनी त्यांना इतर धार्मिकस्थळामध्ये गायनास मज्जाव करण्याचा प्रयत्न केला मात्र येसुदास आपली चळवळ थांबवणारे नाहीत. भाषा जात धर्म पुरस्कार याच्यापुढे त्यांच गाण पोहचलेल आहे. ते असचं चालू राहणार.

ता.क.- त्यांचे चाहते काही का म्हणोत श्रेष्ठ गायक येसुदास हे किशोर आणि रफीच्या गीतांचे खूप मोठे चाहते आहेत आणि ते म्हणतात रफीच्या गाण्याची उंची गाठायला मला दुसरा जन्म घ्यावा लागेल.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.