गोपीनाथ मुंडेंचे हे ५ किस्से ज्यावरून समजते की ते किती उमद्या मनाचे नेते होते…

कै. गोपीनाथ मुंडे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मंत्री तसेच सदस्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेश म्हणून कार्य केले होते. तसेच महाराष्ट्र प्रदेश, युवा जनता मोर्चाचे अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी पक्ष संघटनेत उत्तम कार्य केले होते. पक्षाच्या अनेक आंदोलनांचे नेतृत्व त्यांनी केले होते.

महाराष्ट्राची मुलूख मैदान तोफ अशीच त्यांची ओळख महाराष्ट्र आणि देशाने पाहिली आहे.

१९९५ ते १९९९ या काळात भाजप पक्ष सत्तेवर आला होता. त्यावेळी त्यांनी उप मुख्यमंत्री म्हणून केलेली भाषणे सभागृहात गाजली होती. विरोधी पक्षनेते आणि सदस्य म्हणून त्यांची भाषणे ऐकण्यासाठी सभागृह आणि गॅलरी भरलेली असे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात हजरजबाबीपणा होता.

एखाद्याला घायाळ करावयाचे म्हटले तर शब्दांनी आणि वक्तृत्वाने कशा प्रकारे हल्ला चढवायचा हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे अवगत होते. त्यांच्याकडे समयसूचकता सुध्दा फार चांगल्या प्रकारची होती.

त्यांचं अचानक अपघाती निधन हे सर्वांसाठीच मोठा धक्का होता…त्यांच्या आठवणीत अनेकांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या, किस्से सांगितले..

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितलेला किस्सा, 

१. नॉनव्हेज जेवणासाठी गोपीनाथ मुंडे जयंत पाटलांच्या डब्याची वाट बघायचे…

गोपीनाथ मुंडेंचा आणि जयंत पाटलांचा संबंध तसा आणीबाणीच्या काळात आलेला. आणीबाणीच्या काळात जयंत पाटलांचे वडील नाशिकच्या जेलमध्ये होते. त्या जेलमध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे व मोहन धारिया हे दिग्गज नेते देखील होते. जयंत पाटील दर ४ दिवसांनी डबा घेऊन वडिलांना भेटण्यासाठी जायचे. नाशिकमध्ये मांसाहारी तसं कमीच मिळायचं. त्यातही जेल म्हणल्यावर मांसाहारी जेवण मिळणं जरा कठीणच काम होतं. जयंत पाटील हे आपल्या वडिलांसाठी खासकरून नॉन व्हेज नेत असायचे.

आणि त्यांच्या नॉनव्हेजच्या डब्यात हक्काने भागीदारी करणारे एक म्हणजे गोपीनाथ मुंडे. ते जयंत पाटील डबा कधी घेऊन येतायत याची वाट बघत असत. डबा घेऊन आले कि जयंत पाटील यांना त्यांच्या वडिलांच्या आणि गोपीनाथ मुंडेंच्या चर्चा ऐकण्याची तेवढीच संधी मिळत असायची. जयंत पाटील सांगतात, “माझी त्यांच्या सोबत असलेली दोस्ती व व्यक्तिगत संबंध शेवटपर्य राहिले”. 

२ रा किस्सा म्हणजे, जयंत पाटलांनी विधानसभेची निवडणूक लढवावी म्हणून गोपीनाथ मुंडेंनी पुढाकार घेतला होता…

जयंत पाटील सांगतात, माझी या सभागृहात येण्याची  इच्छा नव्हती. ते ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथे काम करीत होते. तेंव्हा जयंत पाटील यांच्या बहीण आमदार होत्या.

अनेक वेळा गोपीनाथ मुंडे चर्चा करताना म्हणायचे की, तुम्ही विधिमंडळात आले पाहिजे. माझी इच्छा आहे. तुम्ही विधिमंडळात आला तर तुम्हाला वेगळा वाव मिळू शकतो. जयंत पाटील यांचं ठरलेलं उत्तर असायचं की, आम्ही दोघे भाऊ-बहीण कसे येऊ शकतो? ते शक्य नाही. 

तेव्हा गोपीनाथ मुंडे हट्टाला पेटले ते म्हणाले की,

तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवाच. 

त्यावेळी आघाडी सरकार होते. जयंत पाटील निवडणुकीसाठी उभे राहिले. निवडून आले. ते  विधिमंडळात आले तेव्हा गोपीनाथ मुंडेंनीच जयंत पाटील यांना मार्गदर्शक तत्वे सांगितली. कोणाशी कसे बोलले पाहजे, कशी माहिती घेतली पाहिजे, ग्रंथालयात कसे गेले पाहिजे हे सर्व सांगितले. 

नवीन पध्दतीच्या संदर्भात गोपीनाथ मुंडे नेहमीच जयंत पाटील यांच्याशी चर्चा करीत होते. जयंत पाटील सांगतात गोपीनाथ मुंडे त्यांच्यासाठी एक चांगला मित्र व मार्गदर्शक म्हणून होते. या दोन्ही नेत्यांमधले  राजकीय मतभेद टोकाचे होते तरीही त्यांच्या मैत्रीमध्ये कधीही अंतर पडू दिले नाही.

भाजपचे नेते कपिल पाटील यांनी त्यांचा अन् गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीतला के किस्सा सांगितला…

कपिल पाटील जेंव्हा पहिल्यांदा निवडणुकीला उभा राहिलेले आणि निवडून आले तेंव्हा सर्वात जास्त कुणाला आनंद झाला असेल तर तो म्हणजे गोपीनाथ मुंडेंना..कारण कपिल पाटील हे भिवंडी लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले. हा मतदार संघ सलग ३० वर्षे काँग्रेसच्या ताब्यात होती.

म्हणूनच कपिल पाटील निवडून आल्यानंतर मुंडे यांनी त्यांना खास बोलावून घेतलं. आणि कपिल पाटलांच्या उंची एवढा बुके दिला होता.

 “तू निवडून आल्याबद्दल मला आनंद झाला आहे. मला तर असे कळले होते कि, तू ज्या मतदारसंघातून उभा राहिलास तिथून तुझं डिपॉझिट जप्त होणार आहे. पण मला तू निवडून येशील याची खात्री होती”.

त्यांनी घट्ट मिठी मारत मोठ्या प्रेमाने कपिल पाटील यांना भेटले. तू या सभागृहात येत आहेस याचा मला जास्त आनंद आहे असे ते म्हणाले होते. इतके व्यक्तिगत संबंध ते जपत असत. अशी आठवण कपिल पाटील यांनी सांगितली होती.

काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी देखील एक किस्सा सांगितलेला…

३. सभागृहाचा विरोधी पक्षनेता कसा असावा, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गोपीनाथराव मुंडे हे होते.

शरद रणपिसे म्हणायचे, विरोधी पक्ष नेते म्हणून खऱ्या अर्थाने गोपीनाथराव मुंडे यांनी काम केले, हे आपल्य विसरता येणार नाही.

याबाबद्दल त्यांनी एक प्रसंग सांगितलं होता. विधानसभेच्या अध्यक्षांवर अविश्वासाचा प्रस्ताव आणला गेला होता. ही नेहमीची पध्दत होती की पक्षाकडून मनोहर जोशी आणि गोपीनाथराव मुंडे बोलायचे आणि ट्रेझरी बेंचकडून माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे आणि आणखी काही सदस्य बोलायचे. त्यांनी जो अविश्वासा प्रस्ताव आणला होता, त्यावर सभागृहात खूप चर्चा झाली. 

ट्रेझरी बेंचकडून रणपिसे, माणिकराव ठाकरे आणि अन्य सदस्य बोलले आणि त्यानंतर त्यांचा प्रस्ताव बारगळला. त्यांना तो मागे घ्यावा लागला. 

परंतु, गोपीनाथराव मुंडे यांचे वागणे एवढे सोबर होते की, प्रस्ताव बारगळल्यानंतर ते जेव्हा लॉबीमध्ये आले त्यावेळी त्यांनी शरद रणपिसे यांच्या पाठीवर हात मारला आणि म्हणाले की, रणपिसे तुम्ही अतिशय उत्तम बोलला.

म्हणजेच, विरोधी पक्षनेते असताना सुध्दा सर्वांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध राखणारे असे ते नेते होते, ज्याचा अनुभव जवळजवळ प्रत्येक नेत्यांना आलेला आहे.

४. गोपीनाथ मुंडेंचे १० वर्षे पी.ए. राहिलेले आमदार हरिसिंग राठोड यांच्या गाडीचे स्टेअरिंग गोपीनाथ मुंडेंनी घेतले होते. 

आमदार हरिसिंग राठोड जे १० वर्ष गोपीनाथ मुंडे यांचे खाजगी सचिव राहिलेत. ते सांगतात कि,

“एवढ्या उमद्या मनाच्या उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या माणसाला मी जवळून पाहिले आहे. त्यांच्या सोबत मी संपूर्ण देशभर आणि राज्यभर दौरे केले. उत्तर प्रदेशामध्ये हेलिकॉप्टरमधून दौरा करीत असतना ते हेलिकॉप्टर हवेत हेलकावे खाऊ लागले होते, त्यावेळी मी त्यांच्या समवेत होतो. अशा प्रकारची अनेक संकटे त्यांच्यावर आली”.

त्यांनी अशीच एक आठवण सांगितली. २००३ मध्ये त्यांनी हरिसिंग राठोड यांना एक स्कार्पिओ गाडी दिली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर गाडी उभी होती मुंडे साहेबांना हरिसिंग राठोड यांनी सांगितले की, तुम्ही नारळ फोडा मी गाडीत बसतो. 

त्यांनी नारळ फोडला स्टेअरिंगवर बसले. हरिसिंग राठोड यांना त्यांनी बाजूला बसायला सांगितले आणि एलआयसी कार्यालय, विधान भवन या रस्त्याने त्यांनी गाडी फिरवून आणली. 

त्यावेळी ते हरिसिंग राठोड यांना म्हणाले की, “हरिभाऊ, आज मी तुझा सारथी आहे. आज मी तुझ्यासाठी स्टेअरिंग पकडले आहे”.

हरिसिंग राठोड यांच्या सारख्या सारख्या सामान्य माणसाला देखील गोपीनाथ मुंडेंनी घडविले होते. 

५. कामगार नेत्याला संरक्षण मिळणारे भाई जगताप हे महाराष्ट्रातील पहिले नेते ठरले होते, तेही गोपीनाथ मुंडेंमुळे.. 

भाई जगताप १९८८ पासून कामगार चळवळीमध्ये काम करायला लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते कामगारांसाठी रस्त्यांवर संघर्ष करीत असायचे. योगायोगाने युती शासनामधील शिवसेनेच्या युनियनशी त्यांचा संघर्ष सुरू होता. 

१९५५ मध्ये युती सरकार सत्तेवर आले. त्यावेळी सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांना सत्तेची कैफ येणे स्वाभाविकच आहे. असो भाई जगताप ज्या ज्यावेळी युनियनची कामे करायला जात असायचे त्या त्यावेळी त्यांच्यावर जीव घेणे झाले. 

युती शासनाच्या साडेचार वर्षांच्या काळात जवळ जवळ ३८ हल्ले त्यांच्यावर झाले होते.

युती शासनाच्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्याकडे गृह खाते होते. त्यावेळेसचा एक प्रसंग भाई जगताप सांगतात,  १९९७ भाई जगताप यांना गोपीनाथ मुंडेंनी एक दिवस बोलावून घेतले. तेव्हा ते म्हणाले की, अरे काय वेडा झाला आहेस काय ? स्वतःचा कशाला जीव धोक्यात घालून घेतोस? यासाठी तू संरक्षण घे. आणि त्यांना संरक्षण देण्यात आलं.

कामगार नेत्याला संरक्षण मिळणारे भाई जगताप हे महाराष्ट्रातील पहिले नेते होते. भाई जगताप सांगतात ते संरक्षण दिले हे महत्त्वाचे नव्हते. तर मला संरक्षण ‘दिल्यामुळे युती शासनामध्ये बराच मोठा खल देखील झाला. त्यावर वाद देखील झाला. मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे”.

पुढे १ मे ला कामगार दीनानानिमित्त भाई जगताप यांनी ‘कामगार नेता’ म्हणून सर्व पक्षीय नेत्यांना आमंत्रित करायला गेले. त्या आमंत्रितांमध्ये गोपीनाथ मुंडे देखील होते. आणि विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे त्या कार्यक्रमाला आले आणि २ तास उपस्थित होते. 

या किस्से आणि आठवणींमधून जाणवते कि,  कै. मुंडे यांची उत्तम संघटक, कुशल प्रशासक, अत्यंत कार्यक्षम अभ्यासू, उत्कृष्ट संसदपटू तसेच वक्तृत्व व कर्तृत्व या गुणांचा संगम असणारे दिलखुलास व रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे जनमानसातील लोकप्रिय नेते तर होतेच शिवाय पक्ष आणि राजकारणाच्याही पुढे जाऊन ते एक उमद्या मनाचे नेते होते.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.