फिराक गोरखपुरी यांच्या शिव्यांमध्येही शायरी असायची..

त्याचं खर नाव रघुपती सहाय. पण सार जग त्यांना फिराक गोरखपुरी या नावाने ओळखते. उर्दू शायरीच्या जगाचा बेताज बादशाह. असे म्हणतात आता पर्यंत उर्दू मध्ये तीन महान शायर होवून गेले. एक म्हणजे मीर तकी मीर, दुसरा गालिब आणि तिसरे फिराक गोरखपुरी.

रघुपती सहाय यांचा जन्म गोरखपूरचा. अलाहबाद विद्यापीठातून इंग्लिश विषयात एमएची पदवी घेतली. पण उर्दूच्या प्रेमात पडले. शालेय जीवनापासूनच हुशार म्हणून ओळखले जात होते. आज आपण ज्याला युपीएससी म्हणून ओळखतो ती प्रतिष्ठेची आयसीएसची परीक्षा पास झाले.

पण  गांधीजीच्या असहकार आंदोलनाने भारावून जायचा तो काळ होता. त्यांनी एवढ्या मोठया नोकरीला लाथ मारली आणि स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. अलाहबाद कॉंग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू यांचे अंडरसेक्रेटरी म्हणून काम पाहू लागले. स्वातंत्र्यलढ्यात त्यांना अठरा महिने तुरुंगवास ही झेलला. याच काळात या दोघांची घनिष्ट मैत्री झाली जी पुढे आयुष्यभर टिकली.

फिराक गोरखपुरी यांच्या काळात अल्लामा इक्बाल, फैज अहमद फैज, कैफी आझमी, साहीर लुधीयानवी असे अनेक मोठे शायर होवून गेले मात्र शायरीच्या जगात फिराक यांनाच सर्वश्रेष्ठ मानले जाते.

त्यांनी स्वतःचं एकेठिकाणी म्हणून ठेवलंय,

“आने वाली नस्लें तुम पर रश्क करेंगी हम असरों
जब भी उनको ध्यान आएगा, तुमने फ़िराक़ को देखा है”  

फिराक हे जेवढे रोमँटिक होते तेवढाच त्यांचा स्वभाव फटकळ होता. एकदा अत्यंत रटाळ झालेल्या मुशायऱ्यामध्ये आपल्या हातात माईक आल्यावर ते म्हणाले होते,

“हज़रात! अब तक आप कव्वाली सुन रहे थे. अब कुछ शे’र सुन लीजिए.”

त्यांच्या शिव्यांमध्येही शायरी असायची. त्यांना स्वतःच्या इंग्रजीवर गर्व होता. एकदा ते म्हणाले होते भारतात फक्त अडीच लोकांना इंग्रजी येते. एक म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्, दुसरा मी स्वतः आणि अर्धा जवाहरलाल नेहरू.

नेहरूंसोबतच्या त्यांच्या मैत्रीचे कडूगोड किस्से सुद्धा प्रसिद्ध आहेत .

एकदा पंतप्रधान असताना नेहरू अलाहबादला आले होते. फिराक त्यावेळी अलाहबाद विद्यापीठामध्ये नोकरीला होते. ते आपल्या मित्राला भेटायला त्याच्या घरी गेले. नेहरू मात्र एका मिटिंग मध्ये बिझी होते म्हणून त्यांच्या सचिवाने फिराकना आत जाऊ दिले नाही.

बराच वेळ झाला तरी आतून काही निरोप आला नाही मग मात्र फिराक चिडले. त्यांनी आरडाओरडा सुरु केला. तो आवाज ऐकून पंतप्रधान बाहेर आले. त्यांनी त्यांचा हात हातात घेऊन राग आला का विचारलं. तेव्हा फिराक उत्तरले,

“तुम मुखातिब भी हो, करीब भी

तुमको देखें कि तुमसे बात करें”

स्वतःला ते नेहरूंचे शिलेदार मानायचे. एकदा नेहरू अलाहबाद विद्यापीठात भाषणासाठी उभे होते. बोलता बोलता भाषणात त्यांनी काही इतिहासातल्या घटना सांगताना फॅक्टसची चूक केली. त्यावेळी तिथे सुप्रसिद्ध इतिहासकार ईश्वरीप्रसाद हजर होते. त्यांनी तिथल्या तिथे उभे राहून नेहरूंची चूक लक्षात आणून दिली. त्यावेळी शेजारी बसलेले फिराक उत्तरले,

“” ईश्वरी बैठ जाओ. तुम इतिहास  को रटने वाले आदमी हो और ये इतिहास को बनाने वाला आदमी है”

फिराक यांना राजकारणातही बराच इंटरेस्ट होता. त्यांना ते नेहरूचे मित्र होते तरी कधी कॉंग्रेसच तिकीट मिळालं नाही. पण तरीही त्यांनी बऱ्याचदा निवडणुकीला उभे राहिले पण प्रत्येक वेळी पडले. एकदा नेहरूंची आणि त्यांची भेट झाली. त्यावेळी नेहमीच्या सवयीने नेहरू त्यांना म्हणाले,

“सहाय साहब कैसे हो?”

तेव्हा सुद्धा फिराक यांची विनोदबुद्धी शाबूत होती. ते उत्तरले,

‘सहाय’ कहां, अब तो बस ‘हाय’ रह गया है.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.