बॉथमच्या शॉटने सुनील गावस्करांचा पाय फ्रॅक्चर झाला होता !

सर इयान बॉथम.

इंग्लंडचे महान ऑल राउंडर खेळाडू. त्याचे वडील वेस्टलँड क्लबसाठी खेळायचे, तर आई नर्सिंग सर्व्हिसेसच्या संघाची कॅप्टन होती.

शाळेत असताना तो क्रिकेट आणि फुटबॉल खेळायचा. विशेष म्हणजे दोन्हीही खेळांमध्ये तो भारी खेळायचा. इयानचा जास्तीचा इंटरेस्ट तसा फुटबॉलमध्ये. पण जेव्हा क्रिकेट आणि फुटबॉल यांच्यातून एकाची निवड करायची वेळ आली तेव्हा वडलांच्या सल्ल्याने त्याने क्रिकेटला पसंती दिली.

वयाच्या सतराव्या वर्षीपासून तो सॉमरसेटसाठी खेळायला लागला. सुरुवातीचे २-३ वर्षे संघर्ष केल्यानंतर १९७६ चं साल मात्र त्याच्यासाठी चांगलं राहिलं. या वर्षातील फर्स्टक्लास क्रिकेटमधील त्याच्या दमदार कामगिरीने त्याला इंग्लंडच्या संघाचे दरवाजे उघडले.

richards and botham
व्हिव्ह रिचर्ड आणि इयान बॉथम

बॉथम आणि वेस्टइंडीजचे महान व्हिव्ह रिचर्डस या दोघांनीही सॉमरसेटकडून सोबतच खेळायला सुरुवात केली होती. तिथेच ते एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले. बॉथमने आपल्या पहिल्या मॅचमध्ये शतक ठोकलं होतं, तर रिचर्ड पहिल्याच बॉलवर आउट झाला होता. रिचर्डसने बॉलिंग करताना मात्र २५ रन्स देऊन ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी बॉथम रिचर्डसला म्हणाला होता,

“व्हिव्ह, इथून पुढे मी रन्स काढेन, तू विकेट्स घेत जा”

या दोघांची मैत्री अशीच बहरत गेली आणि पुढे ज्यावेळी सॉमरसेटने व्हिव्ह रिचर्डसला वगळलं, त्यावेळी बॉथमने देखील त्याविरोधात सॉमरसेटचा राजीनामा दिला. या दोघांच्या मैत्रीचे एकापेक्षा एक बहारदार किस्से आहेत. ते पुन्हा कधीतरी.

२६ ऑगस्ट १९७६ रोजी वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्यावेळी तो इंग्लडचा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. त्यानंतर पुढे त्याने जुलै १९७७ साली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात्तून कसोटी क्रिकेटमध्ये देखील पदार्पण केलं. आपल्या या पहिल्याच सामन्यात त्याने ७४ रन्स देऊन ५ विकेट्स घेतल्या.

अल्पावधीतच त्याने संघातील एक महत्वाचा ऑल राउंडर खेळाडू म्हणून जागा पक्की केली. १९८०-८१ या काळात तो संघाचा कॅप्टन देखील राहिला. पण आपल्या कर्णधारपदाच्या काळात त्याला संघाला विजय मात्र मिळवून देता आला नाही. त्याच्या नेतृत्वात खेळलेल्या ८ सामन्यांपैकी ४ सामने इंग्लंडने गमावले, तर ४ सामने अनिर्णीत राहिले.

botham
सर इयान बॉथम

इंग्लंडला आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्धची १९८१ सालची अॅशेज जिंकून देण्यात त्याचा महत्वाचा वाटा राहिला होता. या सिरीजमध्ये त्याने ३९९ रन्स काढण्याबरोबरच ३४ विकेट्स घेतल्या होत्या. शिवाय संपूर्ण सिरीजमध्ये त्याने १२ कॅचेस पकडल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळेच इंग्लंड ही सिरीज ३-१ अशी जिंकू शकला होता. बॉथम त्यावेळी ‘मॅन ऑफ द सिरीज’ ठरले. ती सिरीज अजूनही ‘बॉथमची अॅशेज’ म्हणूनच ओळखली जाते.

१९८२ साली भारताचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्याआधी भारताच्या दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडच्या संघाला टेस्ट आणि वन-डे अशा दोन्हीही सिरीजमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे इंग्लंडचा संघाने पराभवाचे उट्टे काढण्याच्या दृष्टीनेच या दौऱ्याची तयारी केली होती.

या दौऱ्यातली वन-डे सिरीज इंग्लंडने २-० ने जिंकली होती. त्यानंतर लॉर्डसवर खेळवल्या गेलेल्या पहिल्या टेस्टमध्ये दिलीप वेंगसरकर यांच्या शतकानंतर देखील बॉथम आणि बॉब विलीस यांच्या तिखट माऱ्यासमोर टिकू न शकल्याने भारताने हा सामना गमावला. त्यानंतर मँचेस्टरमधला दुसरी कसोटी पावसामुळे अनिर्णीत राहिली.

आता ओव्हलवर खेळवली जाणारी तिसरी भारताच्या दृष्टीने टेस्ट सिरीज  वाचविण्यासाठी महत्वाची  ठरणार होती. परंतु या टेस्टमध्ये बॉथम आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम इनिंग खेळून गेला.

बॉथमने फक्त २२६ बॉल्समध्ये फटकावलेल्या २०८ रन्सच्या धुंवाधार इनिंगमुळे ही टेस्टदेखील अनिर्णीत राहिली आणि भारताने टेस्ट सिरीज देखील गमावली. या आक्रमक इनिंगमध्ये बॉथमने खेळलेला एक शॉट लिटील मास्टर सुनील गावस्कर यांच्या पायाला जाऊन लागला आणि त्यांच्या पायाचं हाड फ्रॅक्चर झालं होतं.

इयान बॉथम हे निर्विवादपणे इंग्लंडला दिलेले सर्वोत्तम ऑल राउंडर होते. उत्कृष्ट क्रिकेट कारकीर्द पूर्ण केल्यानंतर देखील ते क्रिकेटशी जोडले गेलेले आहेत. कॉमेंट्री बॉक्स मधली त्यांची इनिंग देखील त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीइतकीच चांगली राहिली आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.