पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये मुस्लिम खेळाडू खेळवायचा नाही ही पद्धत त्यांनी मोडून काढली

गोष्ट आहे १९७५ सालची. मलेशिया मध्ये हॉकीचा वर्ल्डकप सुरू होता. फायनल मॅच भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार होती. दोन्ही देशांमध्ये सीमावाद आहे म्हणून नाही पण दोन्हीही हॉकी जगातल्या सर्वात बाप टीम होत्या.

पण हा काळ म्हणजे भारतीय हॉकीचा उतरता काळ होता.

एकेकाळ असा होता जेव्हा भारत हॉकीचा अनभिषिक्त सम्राट होता. ऑलिंपिकचे सात गोल्ड मेडल आपण हॉकी मध्ये मिळवले होते.

मात्र तो आता इतिहास ठरला होता. गेली दहा वर्षे आपल्याला सुवर्णपदक मिळवता आलं नव्हतं. नव्याने सुरू झालेला हॉकी वर्ल्ड कप सुद्धा जिंकता आला नव्हता.

हॉकी जगज्जेत्याच आपलं स्थान ढळून तिसऱ्या स्थानावर पोहचल होत.

याला अनेक कारणे होती. एक तर नव्याने आलेल्या अस्ट्रो टर्फ वर खेळण्याला आपले प्लेअर्स जुळवून घेऊ शकले नव्हते. अचानक आपले होणारे पराभव कोणीही पचवू शकले नव्हते.

मग सुरू झाला ब्लेम गेम.

भारतीय हॉकी टीममध्ये गटबाजी सुरू झाली. पंजाबी विरुद्ध इतर, शीख खेळाडू विरुद्ध इतर अशी भांडणे सुरू झाली. भारतीय टीम पोखरली होती.

अशातच आणखी वाईट पद्धत पडली होती,

पाकिस्तानच्या विरुद्धच्या सामन्यात मुस्लिम खेळाडूंना न खेळवणे.

भारतात अनेक गुणवान मुस्लिम हॉकीपटू होते. यापैकी अनेकांनी राष्ट्रीय टीममध्ये देखील प्रवेश मिळवला होता मात्र नुकताच झालेल्या १९६५च्या व ७१च्या युद्धाचा ज्वर उतरला नव्हता.

फाळणीची जखम सुद्धा भरून निघाली नव्हती. फाळणी नंतर अनेक मुस्लिम खेळाडूंनी पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला होता याचाही भारतीय हॉकीमध्ये राग असावा. त्यांच्या बद्दल काहीसा अविश्वास दाखवला जायचा.

आणि आता फायनल पाकिस्तान विरुद्धच्या होती.

भारताच्या कोच पदी जुने सुपरस्टार खेळाडू बलबीर सिंग होते. त्यांनी गेल्या काही दिवसात टीममध्ये नवा जोश भरला होता. खेळाडूंचे गट मोडून काढून फक्त भारतीय ही आयडेंटिटी निर्माण करायचा त्यांचा प्रयत्न होता.

शीख खेळाडू सामन्यापूर्वी जो बोले सौ निहाल सत श्री अकाल ही घोषणा द्यायचे. बलबीर सिंग यांनी ती घोषणा बदलून

” जो बोले सो है, भारत माता की जय!”

स्वतः पगडीधारी शीख असूनही बलबीर सिंग यांनी भारतीय टीममधल्या प्रत्येकाला ही घोषणा सक्तीची केली. टीममधली शीख विरुद्ध नॉन शीख ही भांडणे मोडली. आता प्रश्न मुस्लिम खेळाडूंचा होता.

तेव्हाची पाकिस्तानी टीम अतिशय खतरनाक होती.

सर्व खेळाडू तगडे होते. बऱ्याचदा मैदानात बचावपटू आले तर त्यांच्या अंगावर धावून जायलाही ते मागे पुढे पाहत नव्हते.

त्यांचा सामना करणारा एकच खेळाडू भारताकडे होता,

अस्लम शेर खान.

पण तो मुस्लिम असल्यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या फायनलमध्ये त्याला संधी मिळणार नाही हे निश्चित होते. बलबीर सिंग खूप विचारात पडले.

फायनलच्या आदल्या दिवशी बलबीर सिंग यांनी अस्लम शेर खानला बोलावलं. ते दोघे आणि टीमचा डॉक्टर दुपारच्या नमाजाच्या वेळी क्वालालांपुरच्या मशिदीत गेले.अस्लमला आश्चर्य वाटलं.

तिथल्या मौलवीने देखील बलबीर सिंगना मशिदीत प्रार्थना करण्याची परवानगी दिली.

अस्लम शेर खान खाली वाकून नमाज पढत होता आणि कोच बलबीर सिंग हात जोडून पंजाबी मध्ये प्रार्थना करत होते.

त्यांची प्रार्थना संपली व ते मागे वळले तर तिथे नमाज पढण्यासाठी पाकिस्तानी टीम येऊन उभी राहिली होती. त्यांच्या कोचची बलबीर सिंग यांच्याशी ओळख होती. दोघे एकत्र खेळले देखील होते.

पाकिस्तानी कोच बलबीर सिंग यांना म्हणाला,

“ओय यार तुने तो आजही फायनल जितली.”

अस्लम शेर खान दुसऱ्या दिवशी जीव तोडून खेळला. त्याने पाकिस्तानी खेळाडूंना जखडून ठेवलं. मेजर ध्यानचंद यांचे सुपुत्र अशोक कुमार यांनी केलेल्या गोल च्या जीवावर भारताने तो वर्ल्ड कप जिंकला.

या विजयाचे खरे शिल्पकार कोच बलबीर सिंग होते.

पण त्यांची ओळख फक्त एवढी नाही. आपल्या तारुण्यात त्यांनी देशाला अनेक गोल्डमेडल मिळवून दिले होते. सेंटर फॉरवर्ड ला खेळणाऱ्या बलबीर सिंग यांची तुलना मोठया झुंडीचं नेतृत्व करणाऱ्या सिंहाशी केली जाई.

१९५२ सालच्या ऑलिंपिक फायनल मध्ये त्यांनी ५ गोल ठोकले होते ज्याचा विश्वविक्रम अजूनही मोडला गेलेला नाही. हॉकीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट सेंटर फॉरवर्ड खेळाडू म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.

इतकंच नाही तर गेल्या शतकात होऊन गेलेल्या जगभरातल्या १६ सर्वोत्कृष्ट ऑलिम्पिक खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश केला होता.

आज आपण क्रिकेटमधल्या वगैरे खेळाडूंना देव मानतो मात्र मेजर ध्यानचंद आणि बलबीर सिंग यांनी देशाला जे मिळवून दिलंय त्याच्या १०% ही कोणत्याही क्रिकेटरला अचिव्ह करता आलेले नाही.

असा हा भारतातला आजवरचा सर्वात महान खेळाडू. गेल्या आठवड्यात  २५ मे रोजी त्यांचे वयाच्या ९६ वर्षी निधन झाले.

या कोरोनाच्या काळात एखाद्या फिल्म किंवा क्रिकेटमधल्या सेलिब्रिटीनी शिंकलेल्याची बातमी आवडीने वाचणाऱ्या आपल्याला आयुष्यभर हॉकीस्टिक उशाशी धरून झोपणाऱ्या, देशाला जगज्जेता बनवणाऱ्या दिग्गज खेळाडूच नाव देखील माहीत नसणे हे दुर्दैव आहे.

जेष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी घेतलेल्या मुलाखती मध्ये बलबीर सिंग यांनी हे किस्से सांगितले आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.