त्यांनी मियावाकी पद्धतीने मुंबईत एका एकरात १२ हजार झाडे लावली आहेत.

काल रात्री प्रशासनाने आरे कॉलनीतील प्रस्तावित कार शेडच्या ठिकाणावरील ४०० झाडे तोडली. आरे बचाव आंदोलनातील पर्यावरणवाद्यांच्या प्रखर विरोधाला न जुमानता प्रशासनाने ही कारवाई केली. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा वेळ न देता ही कारवाई करण्यात आल्याने पर्यावरणवादी नाराज आहेत.
प्रशासनाचा दावा आहे की मुंबईत मेट्रोच्या कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात जागेची गरज आहे. मुंबईतील मोकळी जागा म्हणजे आरे कॉलनीचा परिसर. या परिसरातली २६४६ झाडे तोडण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
शासन आणि शासनाच्या या निर्णयाला समर्थन देणारे म्हणतात, विकास करायचा असेल तर जागा हवीच. पर्यावरणवादी मुद्दाम विकासाच्या आड येत आहेत. तर दूसरीकडे पर्यावरणवादी कार शेडच्या निमित्ताने आरे कॉलनीचा संपुर्ण परिसर अर्थात जंगल तोडण्याचा डाव असल्याच सांगतात.
या झाल्या दोन्हीकडच्या बाजू,
पण इथे एक प्रश्न अधोरेखित करायला हवा की मुंबईत जागा नाही.
मग तो विकासकामे करायची असोत किंवा झाडे लावायची असोत. दोन्हीचा मध्यमार्ग सापडणार नाही तोपर्यन्त हे प्रकार होतच राहणार हे स्पष्ट आहे.
अशा वेळी मुंबईतच वृक्षारोपणाची एक वेगळी चळवळ आकाराला येत आहे. मियावाकी अस त्या पद्धतीचं नाव.
या पद्धतीने कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावण्यात येतात. विशेष म्हणजे झाडांची संपुर्ण वाढ होवून काहीच वर्षात इथे कमी जागेतलं जंगल निर्माण होवू शकतं. तो तोडगा योग्य ठरेल का नाही हे काळच ठरवेल पण तुर्तात ही मुलं काय करत आहेत हे समजून घेणं महत्वाच आहे.
काय आहे मियावाकी पद्धत.
जापनिझ वनस्पती शास्त्रज्ञ व पर्यावरणवादी असणारे डी. अकिरा मियावाकी यांनी वृक्षारोपणाच्या या पद्धतीचा शोध लावला. या पद्धतीने एकमेकांपासून अगदी जवळजवळ झाडे लावण्यात येतात. कोणत्याही प्रकारे झाडांमध्ये अधिकच अंतर ठेवण्यात येत नाही. त्यामुळे कमीत कमी जागेवर जास्तीत जास्त झाडे लावता येतात.
या पद्धतीचा फायदा दोन प्रकारे होतो.
एकतर जवळजवळ झाडे लावल्यामुळे झाडे आजूबाजूच्या दिशेन न वाढता उंच वाढतात. या पद्धतीने झाडे लावताना ती इतक्या जवळ लावली जातात की जेणेकरून झाडांना फक्त वरच्या दिशेने प्रकाश मिळेल. त्यामुळे शेंड्याच्या दिशेने झाड वाढू लागते. अशा पद्धतीमुळे दूसरी गोष्ट काय होते तर दोन्ही झाडांमध्ये कमी अंतर असल्याने सुर्यप्रकाश जमीनीपर्यन्त पोहचत नाही. त्यामुळे जमीनीत ओलावा कायम राहतो आणि तिथे खुरटे गवत उगवत नाही. गवत उगवत नसल्याने वृक्षांची वाढ कायम राहते.
जवळजवळ झाडे लावण्याच्या या पद्धतीत झाडांची निवड योग्य प्रकारे केली जाते. त्यामुळे एकमेकांना अडथळा ठरणारी झाडे आपोआप एकमेकांपासून दूर लावली जातात तर एकमेकांच्या वाढीस कारणीभूत ठरणारी झाडे जवळ लावली जातात. जेणेकरून संपुर्ण जंगलाची वाढ योग्य पद्धतीने होवू शकते.
मुंबईत असा प्रयोग सध्या ग्रीन यात्री या स्वयंसेवी संस्थेमार्फत हाती घेण्यात आला आहे.
ग्रीन यात्री मार्फत जोगेश्वरी इस्ट मधल्या सेंटर रेल्वे वेअरहाऊस कंपनीच्या परिसरात हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या परिसरात पारंपारिक पद्धतीने झाडे लावली असती तर साधारण ८०० झाडे लावता आली असती पण याठिकाणी १२ हजार झाडे ग्रीनयात्री मार्फत यशस्वीरित्या लावण्यात आली आहेत.
ग्रीनयात्री संस्थेचे प्रमुख प्रदिप त्रिपाठी यांनी मंध्यतरी माध्यमांसोबत संवाद साधताना सांगितलं होतं की मियावाकी पद्धतीने आम्ही २०१९ मध्ये १० लाख आणि २०२५ पर्यन्त १० कोटी झाडे लावू शकतो. ते देखील कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावून.
मात्र अशा पद्धतीने झाडे लावल्यास ते वन्यजीवांसाठी किती पूरक आहेत हे मात्र समजू शकत नाही. मात्र मुंबईसारख्या शहरांना कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी ही पद्धत पूरक ठरू शकते हे मात्र नक्की.
हे ही वाच भिडू.
- गुटखा सोडला आणि वाचलेल्या पैशातून १ हजार झाडांच जंगल उभा केलं..
- गोंडवनातील माडिया
- डॉ.कलामांचे शिष्य अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात सेंद्रिय शेती करण्यासाठी आले.
Need More People like this.