हॉलिवूड त्याच्यापायी वेडं होतं, पण तो भारतीय अभिनेत्रीला भेटायला मध्यरात्री तिच्या घरी आला

संगीतच्या क्षितिजावर लता मंगेशकरचा उदय होण्याच्या अगोदर ज्या पार्श्वगायिकांनी आपल्या स्वराने रसिकांवर अवीट गोडीची छाप टाकली होती त्यात सुरैय्याचं नावं अग्रक्रमाने घ्यावं लागेल.

ती केवळ गायिका नव्हती तर ती उत्तम अभिनेत्री देखील होती. 

लाहोरला १५ जून १९२९ रोजी तिचा जन्म झाला. एक देखणी आणि सुरेल गळ्याची गायिका असा तिचा लौकिक होता. बालकलाकार म्हणून ती मायानगरीत आली. १९४३ साली वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ती पृथ्वीराज कपूर ची नायिका म्हणून पडद्यावर आली.

१९६३ साली तिचा अखेरचा चित्रपट ‘रुस्तुम सोहराब ‘ प्रदर्शित झाला. यात तिचे नायक होते पृथ्वीराज कपूरच ! पहिल्या राष्ट्रपती पदक विजेत्या हिंदी सिनेमाची ‘मिर्झा गालिब ‘ ची ती नायिका होती. तिच्यावर चित्रित अनेक गाणी आजही रसिकांच्या परिचयाचे आहेत .

धडकते दिल कि तमन्ना (शमा) बेताब है दिल (दर्द) ये न थी हमारी किस्मत (मिर्झा गालिब),ये कैसी अजब दास्तान हो गई है ( रुस्तुम सोहराब) वो पास रहे या दूर रहे (बडी बहन) मुरली वाले मुरली बजा ( दिल्लगी) लाई खुशी कि दुनिया (विद्या) देव आनंद सोबतची तिची ’अधुरी प्रेमकहाणी’ आठवून आजही जुने रसिक हळहळतात. 

या सुरैय्याला त्या काळातील हॉलीवूडचा सुपरस्टार ग्रेगरी पेक प्रचंड आवडायचा.

’गुड्डी’ सिनेमात जया जशी धर्मेंद्रच्या रूपेरी प्रतिमेवर लुब्ध असायची तशीच काहीशी अवस्था सुरैय्याची होती. ती देव आनंद मध्ये ग्रेगरी पेक शोधायची. देव देखील त्याची स्टाईल कॉपी करायचा! तर तिच्या या भन्नाट ग्रेगरी प्रेमाचा एक मशहूर किस्सा आहे. विख्यात दिग्दर्शक फ्रॅंक काप्रा एकदा मुंबईत आले होते.

तेंव्हा सुरैय्या त्यांना भेटायला गेली व स्वत:चा एक फोटो त्यांना देवून हा फोटो ग्रेगरी पर्य़ंत पोचविण्याची जवाबदारी दिली. तिच्यातील इनोसंस आणि ग्रेगरीच्या प्रतिमेचे आकर्षण बघून त्यांनी ते काम आनंदाने स्विकारले. पुढे त्यांनी तिचा फोटो ग्रेगरी ला दिला. खरी गंमत पुढेच आहे.

१९५४ साली एका सिनेमाच्या शूटींग साठी ग्रेगरीला श्रीलंकेला जायचे होते. त्या करीता तो मुंबईत आला होता. त्याचं फ्लाईट पहाटे होतं. रात्री एका पार्टीत त्याची भेट पाकीस्तानचे अभिनेते अल नसिर (जे सुरैय्याचे काका होते) यांच्याशी झाली.

त्यांनी ग्रेगरीला सांगितले माझी एक अभिनेत्री पुतणी आहे जी तुमच्या सिनेमाची दिवानी आहे तुम्ही तिला भेटाल? त्या वेळी रात्रीचा एक वाजून गेला होता. पहाटेच विमानाने कोलंबोला जायचे होते. ग्रेगने विचारले ’आत्ता? इतक्या रात्री अवेळी ?’ त्या वर अल नासिर म्हणाला ’तिची भेट होणं महत्वाचं आहे. काळजी करू नका.’

तडक दोघे ताज मधून बाहेर पडले आणि थेट मरीन ड्राईव्हच्या सुरैय्याच्या घरी पोचले. दारावरची बेल ऐकल्यावर तिच्या आईने दार उघडले. दारात ग्रेगला पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. 

तिने आत जावून मस्त झोपलेल्या सुरैय्याला हि बातमी दिली. ती कंप्लीट उडाली. उरातील धडधड वाढली. एकाच वेळी आनंद,आश्चर्य, भीती या भावनांच्या कल्लोळात तिच्या घशाला कोरड पडली. आपल्या स्वप्नातील राजकुमार रोमन हॉलिडेचा नायक प्रत्यक्ष आपल्या घरी! तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. तिची अवस्था ’कशी करू स्वागता’ अशी झाली.

ग्रेगरी सोबत दोन तास गप्पात घालवले.तो गेल्यावर तिची झोपच उडाली. सकाळी शूटींगच्या वेळी तिच्या या सांगण्यावर कुणी विश्वासच ठेवेना. संध्याकाळच्या काही सायं दैनिकांनी हि बातमी फोटो सहीत छापली. पुढे अनेक महिने या बातमीचा प्रभाव बॉलीवूडवर होता.

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.