हमालानं उभ्या केलेल्या गुची ब्रॅण्डनं सगळ्यात महागडी जीन्स विकत रेकॉर्ड केला होता…

मेहनत करणारे लोकं कधी अपयशाला घाबरत नसतात, कितीही संकट आली तरी ते ठामपणे उभे राहतात आणि आपल्या ठरवलेल्या ध्येयाला गवसणी घालतात. हेच लोकं पुढे इतिहासात आपलं नाव कोरतात. आजचा किस्सा अशाच एका माणसाचा ज्याने गरिबीतून मार्ग काढला आणि डोक्यालिटीच्या जोरावर मोठा ब्रँड उभा केला.

१८८१ सालची ही गोष्ट. इटलीमधल्या फ्लोरेन्सच्या एका गरीब परिवारात जन्म झालेल्या एका मुलाची. याच मुलाने वयाच्या २३ व्या वर्षी डोकं वापरलं आणि काहीतरी केलं पाहिजे म्हणून स्वतःचा बिझनेस करायचा असं ठरवलं. त्याने १९०४ ला हर्निशमध्ये लेदरचा व्यवसाय करायचं ठरवलं.पण यात तो काय यशस्वी झाला नाही आणि कर्ज वाढलं.

आता कर्ज फेडायचं म्हणून तो जॉब करू लागला. आपलं काम बंद करून तो लंडनला गेला आणि तिथल्या सेवॉय हॉटेलमध्ये  हमाल म्हणून काम करू लागला.

हमाल म्हणून काम करत असला, तरी त्याचा प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा होता.

२३ वर्षांचा पोरगा डोक्यावरचं कर्ज उतरवण्यासाठी लंडनला आला होता आणि इथंच त्याला आपल्या यशाचा रस्ता सापडला. तो पोरगा ज्या हॉटेलमध्ये काम करत असायचा त्या हॉटेलमध्ये विस्टन चर्चिल, मर्लिन मन्रो अशा मोठ्या मोठ्या लोकांचं आगमन व्हायचं.

या फेमस लोकांना आपल्या हॉटेलवर आलेलं पाहून ते पोरगं त्यांच्या पोशाखावरून लय इम्प्रेस व्हायचं. त्याच लोकांकडं बघून तो त्यांचे पोशाख न्याहाळायचा आणि इथूनच त्यानं स्वतःचा बिझनेस करायचं ठरवलं तेही कपड्यांचा. त्या मुलाने विचार केला की मी या हॉटेलात १० वर्ष जरी काम केलं तरी हमाली करावी लागेल आणि फारफार तर वेटर बनवतील बाकी प्रगती होणार नाही. पण जर त्याने स्वतःचा बिझनेस सुरू केला तर तो लवकर पुढे जाईल आणि फेल झालाच तर असंही काय फरक पडणार होता.

आपल्या डोक्यात नवीन आयडिया घेऊन तो पोरगा १९२१ ला फ्लोरेन्स शहरात परत आला. १९२२ ला त्या मुलाने एका छोट्याशा दुकानात आपला दुसरा व्यवसाय सुरू केला. सुरवातीला त्याने चामड्याच्या वस्तू विकायला सुरवात केली त्यात घोडेस्वारीच्या खोगीर, बॅग, सुटकेस इत्यादी गोष्टींचा समावेश होता. त्याचा बिजनेस चांगला चालू लागला.

आपल्या छोट्याशा दुकानातून सुरू केलेला व्यवसाय त्या पोराने 1937 मध्ये कारखान्यात बदलला. यातूनच स्पष्ट झालं की त्या मुलाने विक्रीस काढलेल्या वस्तूंची बाहेरच्या जगात मोठी मागणी आहे. कारखान्याच्या मदतीने त्याने हँडबॅग, रिटीक्युलस आणि ग्लव्ह्ज बनवायला सुरवात केली.

त्या मुलाने कठोर मेहनत घेतली आणि आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला. त्याच्या ब्रँडला लोकांनी गुची ब्रँड असं नाव दिलं आणि तो पोरगा होता गॉसियो गुची.

आता ब्रँड चांगला बनू लागला होता की मोठं संकट आलं. 1935 साली इटलीचा हुकूमशहा मुसोलिनीचं राज्य सुरू होतं. त्याच्या राजवटीत लेदर मिळवणं अवघड होऊन बसलं होतं पण याही अडचणींवर गॉसियो गुचीकडे उपाय होता त्याने प्रॉडक्टमध्ये लेदर ऐवजी सिल्क वापरायला सुरवात केली. लोकांमध्ये ते अजूनच जास्त लोकप्रिय झालं.

छोट्या दुकानातून मोठ्या व्यवसायात ट्रान्सफर करणाऱ्या गॉसियो गुची यांचं १९५३ साली निधन झालं पण त्यांच्या मुलाने सगळा बिझनेस यशस्वीपणे पेलला. त्याने आपला फॅशन ब्रँड हॉलिवूडमध्ये पोहचवला. एक काळ तर असा आला की गुची ब्रँडच्या जीन्सने गिनीज बुक रेकॉर्ड केला होता. असं म्हणतात की गुची ब्रँडच्या जिनियस जीन्सने जगातली सगळ्यात महागडी जीन्स असण्याचा बहुमान मिळवला होता. पुढे हे रेकॉर्ड लिवाइस जीन्सने तोडलं.

पण गॉसियो गुचीने मेहनतीच्या जोरावर जगातला मोठा ब्रँड तयार केला आणि अजूनही तो ब्रँड टॉपलाच आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.