धूलीवंदनाला खेळली जाणारी ऍक्शन आणि मारधाडसे भरपूर ‘गुद्दलपेंडी’ !

संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं. मैदानामध्ये दोरीच्या दोन्ही बाजुंला स्पर्धक. व्हिसल वाजताच एका हाताने दोर पकडून तर दुस-या हाताने प्रतिस्पर्ध्यांना ठोसे लावणे सुरू. मैदानात फक्त थरार. प्रेक्षकांचा जल्लोष शिगेला. कोण दोर सोडेल याची उत्कंठा शिगेला. अखेर एक स्पर्धक दोर सोडतो आणि पराभव स्वीकार करतो.

हा रोमांचक आणि थरारक खेळ आहे गुद्दलपेंडी. जो केवळ धुलीवंदनालाचं खेळला जातो आणि महाराष्ट्रात फक्त एकाच ठिकाणी खेळला जातो. ते गाव म्हणजे वणी.

वणी एक यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाणं. लोकनायक बापुची अणेंचं गावं व साहित्यिक राम शेवाळकर यांची कर्मभूमी म्हणूनही वणीची ओळख आहे. इथे असलेल्या कोळसाखाणीमुळे ब्लॅक डायमंड सिटी यासोबतच या शहराची आणखी एक ओळख म्हणजे गुद्दलपेंडी. हा खेळ ना कुठल्या धर्माचा ना कुठल्या जातीचा, ना कुठल्या प्रांताचा तर हा फक्त आणि फक्त वणीकरांचा खेळ आहे. जो इतरत्र कुठेही खेळला जात नाही.

गुद्दल म्हणजे ठोसे व या ठोसे मारण्याचा खेळ म्हणजे गुद्दलपेंडी. यात कोणते बक्षीस नसते तर साहस, मनोरंजन आणि वैर मिटवण्यासाठी हा खेळ खेळला जातो. हा खेळ नेमका कधी पासून सुरू झाला याची निश्चित माहिती नाही. पण सुमारे 70-80 वर्षांचे बुजुर्ग त्याच्या लहाणपणापासून हा खेळ पाहत असल्याचे सांगतात. त्यावरून सुमारे 100 वर्षांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा असल्याचा अंदाज लावला जातो. वणीतील काही प्रतिष्ठीत व्यक्तींनी, आखाडा प्रेमींनी एकत्र येऊन हा अनोखा खेळ सुरू केल्याचे बोलले जाते. मात्र या खेळाची परंपरा पुढे

चालवण्यात स्थानिक नृसिंह आखाड्याचा सिंहाचा वाटा आहे. याला स्थानिक शिवाजी आखाडा व इतर आखाड्यांचेही सहकार्य असते.

धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी नाड्याची (दोर) पूजा करण्यासाठी आखाड्याचे व स्थानिक मल्ल एकत्र येतात. त्यानंतर रंगनाथ स्वामी मंदिरात नाड्याची पूजा केली जाते. पुजेनंतर या नाड्याची शहरात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत तलवारबाजी, लाठीकाठी इत्यादी मर्दाणी खेळांचाही समावेश असते. मिरवणुकीत या नाड्याचे दर्शन घेण्याचे आवाहन केले जाते.

वणीच्या दक्षिण दिशेला प्राचीन असे रंगनाथ स्वामीचे मंदिर आहे. या मंदिरासमोरच्या यात्रा मैदानावर गुद्दलपेंडीची तयारी केली जाते. अनेकदा गुद्दलपेंडीची ठिकाणं बदलली देखील आहे. मैदानावर तीस ते चाळीस फुटावर दोन खांब गाडले जाते. जसे खोखो खेळामध्ये असते अगदी तसेच. त्या खांबाला जमिनीच्या तीन ते चार फुटाच्या अंतरावर मिरवणुकीत फिरवलेला दोर बांधला जातो.

अंधार झाला की या खेळाला सुरुवात होते. नाडा बांधल्यानंतर खेळाडू मैदानात उतरतो व नाड्याच्या एका बाजूला जाऊन दुस-या प्रतिस्पर्धीला आव्हान देतो. दुसरा स्पर्धक आव्हान स्वीकारून मैदानात उतरतो आणि सुरूवात होते गुद्दलपेंडीला.

मल्ल एका हाताने नाडा पकडून ठेवतो तर दुस-या बाजूने प्रतिस्पर्ध्यावर ठोशाने प्रहार करतो. खेळताना नियम असा आहे की ठोसा लगावताना नाड्याला स्पर्धकाचा स्पर्श असणे गरजेचे आहे. सहसा एका हाताने नाडा धरून दुस-या हाताने ठोसा लगावला जातो. तर कुणी नाडा पोटाला धरून ठेवतो व दोन्ही हाताने प्रतिस्पर्ध्यांवर प्रहार करतो.

ठोसे लगावताना नाड्याच्या खालून ठोसे लगावण्याची मनाई आहे. धरलेला नाडा सोडला किंवा नाड्याचा स्पर्श सुटला की तो स्पर्धक बाद ठरतो व दुस-या स्पर्धकाला विजयी घोषीत केले जाते. ही लढत दोन ते पाच मिनिटांपर्यंत चालते. विजयी व पराभूत झालेला स्पर्धक एकमेकांची गळाभेट घेतात आणि ती लढत तिथे संपते.

एकाच वेळी सुमारे पाच ते दहा जोड्या यात सहभागी होतात. तिन तासात शेकडो लढती यात होतात. खेळात वयोमानाची मर्यादा नाही. मुख्य म्हणजे मल्लचं सहभागी होतात असे नाही. तर सर्वसामान्यही यात त्यांच्या तोडीच्या अशा प्रतिस्पर्ध्यासोबत एक हौस म्हणून लढतात. पाच वर्षांच्या चिमुकल्यापासून 60 वर्षांच्या वृद्ध ही या स्पर्धक यात भाग घेतात. पाच वर्षांच्या मुलाने आव्हान दिल्यावर त्याच वयाचा मुलगा त्याचे आवाहन स्विकारतो. तर एका वृद्धाचे आवाहन दुसरा वृद्ध स्विकारतो.

कायमचे वैर संपवणारा खेळ

हा खेळ तसा मारधाड आणि ऍक्शनचे भरपूर आहे. मारामारीत बदले की आग वगैरे ही आहे. पण हा जरी मारधाड करण्याचा खेळ असला तरी याचा उद्देश मात्र वैर संपवणे आहे. पूर्वी एकमेकांशी वैर असले की ते लोक गुद्दलपेंडीत लढायचे. ठोसे लगावून एकमेंकांवरचा पूर्ण राग काढायचे. जसा चित्रपटात मारधाड नंतर शेवट गोड होतो, तसाच या खेळात लढत संपली की गळाभेट घेऊन लढतीसोबतच वैरही संपवलं जातं.

हा थरारक खेळ जेवढा मल्ल अनुभवतात तेवढाच थरार प्रेक्षकही अनुभवतात. मध्ये खेळ मंदावताना वाटला की थोडा ब्रेक घेऊन या खेळातील ‘हुल्लडबाजी’ या प्रकाराला सुरूवात व्हायची. हुल्लडबाजीमध्ये सर्वसामान्य प्रेक्षकही सहभागी होऊन एकमेकांना ठोसे लगावण्याचा कार्यक्रम करायचे. यात नाड्याला स्पर्शाचा नियम वगैरे थोडा बाजूला जायचा. पाच मिनिट ही हुल्लडबाजी रंगली की पुन्हा मुख्य गुद्दलपेंडीला सुरुवात व्हायची.

फक्त हा खेळ पाहायला आणि खेळायला दूरदूरून मल्ल आणि प्रेक्षक यायचे, अशी या खेळाची प्रतिष्ठा होती. महत्त्वाचं म्हणजे हा खेळ केवळ मल्लच नाही तर सर्वसामान्यही एक हौस म्हणून खेळतो. या खेळामध्ये गावातील प्रतिष्ठीत लोकही सहभागी होतात. अगदी खेळ भावनेतून आणि खिलाडू वृत्तीतून हा खेळ खेळला जातो. बरेचदा यात स्पर्धकांच्या तोंडातून रक्त येते किंवा तो जखमी होतो. अशा वेळी मैदानाशेजारी असलेल्या पीर बाबाच्या दर्ग्यामध्ये नेऊन तिथे त्याच्या उपचार केला जातो.

स्थानिक पत्रकार श्रीवल्लभ सरमोकदम सांगतात ,

“बापूजी अणे, राम शेवाळकर सारखे व्यक्ती हा खेळ बघण्यासाठी यायचे. दिवंगत नगराध्यक्ष बाबुरावजी देशपांडे हे एक मल्ल होते. ते स्वतः लढतीत उतरायचे. त्याची दुस-या राजकीय प्रतिस्पर्ध्याशी मैत्रीपूर्ण लढत व्हायची. त्यामुळे प्रेक्षक या लढती चांगल्याच एन्जॉय करायचे. विदर्भच नाही तर महाराष्ट्रातूनही नामवंत मल्ल हा खेळ खेळण्यासाठी कधीकाळी येत. हा खेळ एक नाही, तर तीन तीन दिवस चालायचा असे जुणे लोक सांगतात “

व्यायाम शाळेचे माजी सदस्य बंडू निंदेकर सांगतात ,

“आम्ही लहाण असताना मार खाण्याची भीती वाटायची. मात्र हा खेळ असा होता की जिथे आम्ही स्वतःहून मार खायला जायचो. माझे वडिल स्वतः तिथे घेऊन जायचे. यातून हिम्मत मिळायची. आधी आखाड्यात खास गुद्दलपेंडीच्या डावपेचावर मार्गदर्शन दिलं जायचं. ज्येष्ठ मल्ल एक आठवडा आधी याची तयारी करून घ्यायचे. तशी लढत दोन तीन मिनीटे खूप झाली. मात्र एकदा माझी आणि माझे मित्र फारुक रंगरेज आमच्यात तब्बल 15 मिनिट लढत रंगल्याची आठवणही ते काढतात.”

गेल्या दहा पंधरा वर्षांत मात्र याचे स्वरूप पूर्ण पणे बदलले आहे. दोन तीन जोडी मध्ये होणा-या या खेळाची जागा हुल्लडबाजीने घेतली. काळाच्या ओघात सामाजिक, सांस्कृतिक बदलाचा या खेळावर प्रभाव पडला. खिलाडू वृत्ती लोप पावत असल्याने वैर मिटवणा-या या खेळाचा सूड घेण्यासाठी वापर होऊ लागला.त्याला मोहल्लावाद, धर्मवाद, राजकारण याची किड या खेळाला लागली. नियम तोडून खेळाडूंवर प्रहार करणे, एक खेळत असताना त्याला दुस-यांनी जाऊन मदत करणे असे प्रकार यात वाढले. त्यामुळे आज केवळ एक परंपरा म्हणून हा खेळ सुरू ठेवला जात आहे.

नृसिंह आखाडा, शिवाजी आखाडा ही परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे दहा बारा वर्षांपासून या खेळाचे आयोजन योग्यरित्या होत नाही. एकदा तर फक्त हुल्लडबाज प्रेक्षक येऊ नये म्हणून चक्क या खेळासाठी तिकीट ठेवण्यात आले होते.

मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही. हजारों प्रेक्षक आले आणि खेळाची जागा हुल्लडबाजीने घेतली. आधी आठवडाभर चालणारं नियोजन आता केवळ एक दिवसांवर आलं. प्रेक्षकांची व स्पर्धकांची हुल्लडबाजी, अपुरे नियोजन, अपुरा पोलीस बंदोबस्त, प्रतिष्ठीत लोकांनी पाठ फिरवणं. व्यसनी लोकांचा भरणा, केवळ पुरुष प्रेक्षक अशा विविध कारणांमुळे हा खेळ आता शेवटच्या ओव्हरपर्यंत आला आहे.

आजही वणी आणि परिसरात गुद्दलपेंडीची इतकी क्रेज आहे की हा शब्द बोलीभाषेतही आला. “एक पेंडीचा लावला तर सर्व अक्कल ठिकाण्यावर येईल” असे वाक्यही लोकांच्या रोजच्या जगण्यात येतात. या अनोख मर्दाणी खेळाची परंपरा टिकवणं गरजेचं आहे. यावर्षी आयोजकांनीही कोणती कसर ठेवायची नाही असा निश्चय करून आयोजन केलं आहे. यासाठी नृसिंह व्यायाम शाळा, शिवाजी व्यायाम शाळेचे सदस्य परिश्रम घेत आहे.

गुद्दलपेंडी म्हटलं की वणीकर भारावून जातो. त्याचे पावलं धुलीवंदनाला आपसूक जत्रा मैदानाकडे वळतात. आजुबाजूच्या खेड्यापाड्यातील लोकही फक्त हा खेळ बघायला येतात. जिंकण्या हरण्यासाठी तर सर्वच खेळतात मात्र वैर मिटवणारा हा खेळ इतर खेळापेक्षा अनोखा ठरतो. ही परंपरा टिकलीच पाहिजे आणि हे टिकवणे प्रत्येक वणीकरांचे कर्तव्यच आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.