सरकार कोणतंही असो गुजराल यांनी ठरवलेलं परराष्ट्र धोरण आजही पाळलं जातं

जर भारत देश आपल्या शेजारील देशांसोबतचा वाद मिटवून त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासत नाही तोपर्यंत भारत जागतिक राजकारणात देशाला मानाचे स्थान प्राप्त होणार नाही. हे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे धोरण होते…..

आत्ताचं बोलायचं झालं तर मोदींची देखील अशीच काहीशी भूमिका आहे मात्र फरक इतकाच कि, जेंव्हा हि भूमिका गुजराल यांनी मांडली तेंव्हा त्यांच्यावर टीका झाली, आणि आत्ता मोदी यांचे कौतुक होतेय !!

२०१४ ला मोदी सरकार सत्तेत आले आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींनी शेजारील राष्ट्रांसोबतच्या संबंधांवर विशेष भर दिला हे आपण पाहिले. मोदी सरकारचे या बाबतीत कौतुकही झाले. परंतु आपल्यापैकी बर्‍याच जणांना हे माहिती नसेल की त्याआधी साधारण २५ वर्षांपूर्वी १९९६ साली देवेगौडा सरकारमध्ये इंद्रकुमार गुजराल हे परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी भारताच्या शेजारील राष्ट्रांशी असलेल्या संबंधांबद्दल एक सिद्धांत मांडला जो की पुढच्या सर्व प्रधानमंत्र्यांनी पाळला.

 गुजराल यांच्यानुसार जोपर्यंत भारत शेजारील देशांसोबतचा वाद मिटवून त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासत नाही तोपर्यंत भारताला जागतिक राजकारणात  मानाचे स्थान प्राप्त होणार नाही. गुजराल यांनी मांडलेल्या या सिद्धांतालाच गुजराल सिद्धांत म्हटले जाते.

 

 गुजराल सिद्धांताचे काही महत्वाचे मुद्दे

भारताला आपले शेजारील राष्ट्र मालदीव, बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका यांच्यासोबत विश्वसनीय संबंध बनवावे लागतील. यांच्याशी असलेल्या विवादांना संवादाद्वारे सोडण्यावर भर द्यावा लागेल. या राष्ट्रांना केलेल्या मदतीच्या बदल्यात त्वरित अपेक्षा न ठेवता काम करावे लागेल. सोबतच कुठल्याही नैसर्गिक राजकीय आणि आर्थिक संकटात मदत करावी लागेल.

कदाचित हेच कारण आहे की भारताला आपण भूकंपासारख्या स्थितीत शेजारी राष्ट्रांना मदत करताना पाहिले आहे.

  • कोणत्याही देशाने एकमेकांच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करू नये.
  •  दक्षिण आशियातील कोणताही देश आपल्या देशातील जमिनीचा वापर दुसर्‍या देशाच्या विरोधातील कारवाईसाठी होऊ देणार नाही.
  •  दक्षिण आशियातील सर्व देश आपापसातील वाद हे शांततेच्या मार्गाने सोडवतील.
  •  या क्षेत्रातील सर्व देश एकमेकांच्या सार्वभौमत्व व अखंडतेचे जतन करतील
  •  याप्रमाणे भारत हा मोठ्या भावाप्रमाणे नम्रतेने व्यवहार करत शेजारील राष्ट्रांशी शक्य तेवढं सौहार्दपूर्ण संबंधावर जोर देईल.
  •  गुजराल सिद्धांताची प्रासंगिकता आजही कायम असताना गुजरात सिद्धांताचा साधा उल्लेखही करणं गरजेचे समजले नाही ही खेदाची गोष्ट आहे.

 इंद्रकुमार गुजराल यांच्याविषयी

इंद्रकुमार गुजराल यांना भारतीय विदेश सेवेचा  प्रदीर्घ अनुभव होता. त्यांनी १९७६ ते १९८० रशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. विदेश सेवेचा अनुभव पाहता त्यांना देवेगौडा सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री करण्यात आले. त्यांच्या काळात भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुत्सद्देगिरी अधिक ठळक झाली. 

१९९६ साली परराष्ट्र मंत्री असताना अमेरिकेच्या दबावाला न जुमानता व्यापक आण्विक बंदी करार (CTBT)वर स्वाक्षरी करायचे भारताने नाकारले. यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्री या नात्याने त्यांनी जे विधान केले ते भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थान बळकट करणारे होते. त्यावेळी ते म्हटले होते  कि आण्विक अस्त्राच्या वापराबद्दल भारत ना आत्मसमर्पण करणार ना अमेरिकेच्या दबावाखाली येणार. पुढे ते म्हटले “माणसांप्रमाणेच जे राष्ट्र गुडघे टेकतात वा झुकत राहतात त्यांचा कधीही सन्मान होत नाही”. यावरून त्यांचा ठामपणा निर्देशीत होतो. पुढे गुजराल हे १९९७ साली भारताचे १२ वे प्रधानमंत्री झाले.

गुजराल हे नितांत सज्जन व सिद्धांतवादी व्यक्ती होते. स्वभावाने ते जेवढे शांत आणि संयत होते. विचाराने तेवढेच ते ठाम होते. आजचे सरकारे भलेही त्यांचा उल्लेख टाळत असतील परंतु शेजारनितीचा मोठा वारसा ते देशाला सोडून गेले आहेत.

हे हि वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.