गुजरातमध्ये काँग्रेसला ना अध्यक्ष ना प्रभारी, केवळ ३ पदाधिकाऱ्यांवर पक्षाचं काम सुरूय…

गुजरातमध्ये एकूण १८२ विधानसभेच्या जागा आहेत. आगामी काहीच महिन्यात इथं निवडणूका याआधी जेव्हा २०१७ मध्ये निवडणुका झाल्या होत्या तेव्हा यातील ९९ जागा भाजपने जिंकल्या होत्या. तर काँग्रेसच्या खात्यात ७७ जागा गेल्या होत्या. तर ६ जागा इतर पक्षांनी आणि अपक्षांनी जिंकल्या होत्या.

याच निकालानंतर राहुल गांधी म्हणाले होते कि, गुजरातमध्ये पक्षाची ताकद आता वाढली आहे. संघटना इतकी मजबूत झाली आहे कि, भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत अगदी कसा तरी वाचला आहे. 

मात्र त्यानंतरच्या दिवसांमध्ये पक्षाचा आलेख घसरत गेला. दरम्यानच्या काळात काँग्रेसच्या तब्बल १२ आमदारांनी पक्षाला रामराम केला, आणि इथं झालेल्या पोटनिवडणुकांवर भाजपने विजय मिळवला. सध्या गुजरातमध्ये भाजप जवळ ११२ आमदार आहेत, तर काँग्रेसजवळ ६५. स्थानिक स्वराज्य संस्थांवर देखील काँग्रेसला विशेष चमक दाखवता आली नव्हती.

सध्या हा आलेख इतका खाली आला आहे मागच्या ६ महिन्यांपासून गुजरात काँग्रेसला केवळ ३ लोक चालवत आहेत. इथे काँग्रेसला ना प्रदेशाध्यक्ष आहे ना प्रभारी.

मागच्या ६ महिन्यांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद रिकामे आहे. गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित चावडा आणि विरोधी पक्ष नेते परेश धानाणी यांनी राजीनामा दिला आहे. मात्र मागच्या ६ महिन्यापासून या पदांवर देखील कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचे अनेक जेष्ठ नेते नाराज आहेत.

सध्या हार्दिक पटेल, करसनदास सोनेरी आणि डॉ. तुषार चौधरी यांच्यावर प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. 

गुजरात काँग्रेसच्या कार्यकारणीमध्ये एका प्रदेशाध्यक्षांशिवाय ३ कार्यकारी अध्यक्ष, १८ उपाध्यक्ष, ४० महामंत्री, १ कोषाध्यक्ष, १५८ मंत्री, ६ मंत्री (प्रोटोकॉल) आणि ९ प्रवक्ते अशा पदांची तरतूद आहे. मात्र मागच्या ६ महिन्यांपासून यातील २३३ पद रिकामी आहेत.

सोबतच दिवंगत खासदार राजीव सातव यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी होती. मात्र त्यांच्या निधनानंतर या पदावर देखील कोणाची नियुक्ती झालेली नाही. राज्यातील जेष्ठ नेते अहमद पटेल यांचं देखील निधन झालं आहे.

काँग्रेसच्या या अवस्थेबद्दल राज्य काँग्रेसचे एक जेष्ठ नेते टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगतात,

मी आतापर्यंत केंद्रीय नेतृत्वाचे राज्याच्या काँग्रेसकडे एवढे दुर्लक्ष बघितले नव्हते. राजीव सातव यांच्या निधनानंतर अजूनही त्यांच्या जागी कोणाला नियुक्त करण्यात आलेले नाही. सोबतच प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यांची नियुक्ती अनेक दिवसांपासून रखडली आहे. पक्षाच्या केडर उत्साह आणणे गरजेचे आहे.

काँग्रेसच्या अगदी विरुद्ध स्थिती भाजपची आहे…

भाजपच्या कार्यकारणीमध्ये सध्या १६० पदाधिकारी आहेत. सोबतच राज्यात वॉर्ड प्रमुखांपर्यंत एक- एक पद भरण्यात आलेले आहे. भाजपमध्ये ४० मुख्य प्रदेश पदाधिकारी आहेत. यात १ प्रदेशाध्यक्ष, १० प्रदेश उपाध्यक्ष, १३ प्रदेश महामंत्री, ८ प्रदेश मंत्री, २ प्रदेश कोषाध्यक्ष, १ प्रदेश मुख्य प्रवक्ता, २ मीडिया प्रभारी आणि ३ प्रदेश संयोजक यांचा समावेश आहे.

या मुख्य प्रदेश पदाधिकाऱ्यांशिवाय ४० प्रदेश कार्यसमिती सदस्य आणि ४० विशेष आमंत्रित सदस्य आहेत. 

भाजपच्या संविधानानुसार राज्यात प्रमुख पदांशिवाय भारतीय जनता युवा मोर्चा, महिला मोर्चा, मागासवर्गीय मोर्चा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मोर्चा, अल्पसंख्यक मोर्चा अशा पदांपासून वॉर्ड प्रमुखांपर्यंत प्रत्येक पद भरण्यात आलेले आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.