अन्यथा १९९६ सालीच गुजरातमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता

‘मुंबई मां जलेबी ने फाफडा; उद्धव ठाकरे आपडा’, अशी टॅगलाइन देत शिवसेनेनं गुजराती भाषिकांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यावरून त्यांच्यावर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजराती भाषिकांना आकर्षित करण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत असल्याची टीका होत आहे.

पण आज आम्ही तुम्हाला असा एक किस्सा सांगणार आहे ज्यामध्ये गुजराती मतदार नाही तर अख्या गुजरातचा होणार मुख्यमंत्रीच स्वतःहून बाळासाहेब ठाकरेंकडे आले होते. त्यावेळी त्या भावी मुख्यमंत्र्यांनी,

“मला पक्षात घ्या मी गुजरातमध्ये ‘शिवसेने’चा मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतो”

असं सांगितलं होत, पण बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना स्पष्ट नकार दिला. अन्यथा त्याच वेळी गुजरातमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता.

किस्सा आहे १९९५-९६ सालचा.

गुजरात विधानसभेच्या निवडणुका जिंकून राज्यात भाजप सत्तेवर आला होता. त्या वेळी भाजपमध्ये आणि गुजराती जनतेमध्ये ‘बापू’ म्हणून ओळखले जाणारे शंकरसिंग वाघेला यांचं मोठं प्रस्थ होतं. अगदी जनसंघापासूनच भाजपच्या गुजरातमधील उभारणीत त्यांचं फार महत्वाचं योगदान राहिलं होतं.

त्यापूर्वी ३ वेळा खासदार राहिलेल्या वाघेला यांना १९९५ च्या निवडणुकीपूर्वी सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री पदावर आपलीच वर्णी लागणार याची खात्रीच होती. पण निकालानंतर मात्र दिल्लीतून झटपटरित्या सूत्रे हलवण्यात आली आणि भाजपचे दुसरे एक मोठे नेते केशुभाई पटेल यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली.

केशुभाई पटेल यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आल्याने वाघेला नाराज होते. केशूभाईंना मुख्यमंत्री करण्यात त्यावेळी नरेंद्र मोदींचा रोल खूप मोठा होता. (त्यावर आपण सविस्तर यापूर्वीच लिहिलं आहे.) तर नरेंद्र मोदींच्या याच वाढत्या प्रभावामुळे वाघेला मुख्य परिघाबाहेर जात होते.

त्यामुळे १९९५ साली वाघेला यांनी ४७ आमदारांच्या मदतीने भाजपाविरोधात बंड पुकारलं. हे बंड शांत करण्यासाठी केशुभाई पटेल यांच्याऐवजी सुरेश मेहता यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्यात आले. 

त्यानंतर केशूभाईंनी परत वाघेला यांच्या विरुद्ध कारवाया सुरु केल्या. अशातच १९९६ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोध्रा मतदारसंघातून लढताना वाघेला यांचा पराभव झाला. यातून वाघेला यांनी चिडून पुन्हा एकदा बंडखोरीचं अस्त्र बाहेर काढलं.

सप्टेंबर १९९६ मध्ये त्यांनी आपल्या ४६ आमदारांसह सुरेश मेहता यांच्या सरकारमधून आणि पक्षातून बाहेर पडले. सरकार अल्पमतांमध्ये आल्यानंतर राज्यपाल कृष्णपाल सिंग यांच्या शिफारशीवरून केंद्रातील देवेगौडा सरकारने सुरेश मेहतांचं सरकार बरखास्त केलं आणि गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

यानंतर वाघेला तडक मुंबईला आले आणि मातोश्री गाठलं. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपचं सरकार होत. वाघेला यांना वाटलं की यानंतर देखील भाजपविरुद्ध बाळासाहेब ठाकरे आपल्याला मदत करतील. त्याच संदर्भातून ते बाळासाहेबांना म्हणाले,

बालासाहब, आप मुझे शिवसेना मे प्रवेश दो, मैं शिवसेना का गुजरात का मुख्यमंत्री बनूंगा.

पण बाळासाहेबांनी ठणकावून सांगितले की,

आम्ही वाघ आहोत, वाघेला नहीं. मित्रपक्षाला सांभाळून घेण्याची माझी दानत आहे. त्याच्या विरोधात जाणार नाही.

बाळासाहेबांनी वाघेला यांना त्याक्षणी नकार कळवला.

त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय जनता पक्ष नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. आणि त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

वाघेला साधारणतः वर्षभर मुख्यमंत्री पदावर विराजमान राहिले. मात्र १९९७ मध्ये काँग्रेसने पाठींबा काढल्याने वर्षभराने त्यांचं सरकार देखील पडलं.

त्यानंतर त्यांच्या जागी दिलिप पारिख हे मुख्यमंत्री झाले. पण पारिख यांचेही सरकार फार काळ चालू शकले राहिले. अखेर १९९८ साली विधानसभेची निवडणूक घेण्यात आली आणि त्यानंतर भाजपा पुन्हा सत्तेमध्ये आला आणि केशुभाई पुन्हा मुख्यमंत्री झाले.

पुढे वाघेला काँग्रेसमध्ये गेले. तिथे काहीसे स्थिरावले. २०१३ साली त्यांच्याकडे विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आली. पण २०१७ मध्ये मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवरून त्यांचं काँग्रेससोबत बिनसलं आणि स्वतःचा जन विकल्प मोर्चा नावाचा पक्ष काढला.

२०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण जून २०२० मध्ये त्यांनी तो देखील पक्ष सोडला.

तर सांगायचं मुद्दा असा कि, बाळासाहेबांनी जर १९९६ मध्येच शंकरसिंग वाघेला यांना शिवसेनेत प्रवेश दिला असता तर त्याच वेळी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला असता.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.