गुजराती भिडू एवढे श्रीमंत कसे? काय आहे त्यांच्या बिझनेसचं सिक्रेट ?

गुजरात. भारतातील एक उद्योग संपन्न राज्य. देशातील मोठ-मोठ्या उद्योगपतींची नावे काढली तर त्यातील १० पैकी ८ गुजरातची असतात. इथल्या माणसाच्या मुळात रक्तातच बिझनेस आणि स्टार्टअपचा किडा आहे. तो म्हणतो कोणत्या तरी कंपनीत मिडलक्लास मॅनेजर होण्यापेक्षा एक दुकान टाकून स्वतःचा बिझनेस वाढवेन. आज याच तत्वावर गुजरातमध्ये अनेक व्यापारी तयार झाले.

त्याला बाळकडू देतानाच “जीवन में कैक मोटू करवू छे” शिकवले जाते.

आज देशाच्या एक चतुर्थांश कापूस गुजरात निर्यात करतो. दूधच्या बाबतीतही तेच. देशातील १० पैकी ८ हिरे सुरतमध्ये पॉलिश केले जातात. पेट्रोलियम पदार्थांच्या बाबतीत देशाच्या तुलनेत एकट्या गुजरातमध्ये ३५ टक्के उत्पादन होते. तर २७ टक्के औषधांचे निर्माण या राज्यात होते. आज देशाच्या पाच टक्के लोकसंख्या असणाऱ्या राज्याचे लोक जर चाळीस टक्के निर्यातीचा वाटा उचलतात.

या सगळ्याला कारणीभूत आहे ते म्हणजे गुजराती माणसाची व्यापार केंद्रीत नजर.

त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये बिझनेस दिसू शकतो. इथले लोक रेल्वेत ही टक्क्यांच्याच गप्पा मारतात

काय कारणे आहेत गुजराती माणसाच्या उद्योगांची आणि श्रीमंतीची ?

गुजराती स्टार्टअप :

देशभर स्टार्टअपची आयडिया अलिकडे आली. पण गुजरातला स्टार्टअपची आयडिया खूप जुनी आहे. याच कारण म्हणजे समुद्र किनारा. गुजरातला कच्छच्या लखपत बंदरापासून दक्षिणेकडच्या उंबरगावपर्यंत सुमारे १,६०० किमी समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे पुर्वीपासून मालाची ने-आण करणे, स्वस्त दरात माल खरेदी करुन नफ्याच्या दरात विकणे हे चालत आले आहे.

यातुनच स्वतःच्या उद्योग कंपन्या चालू झाल्या. सोबतच मासेमारीचा व्यवसाय हा देखील इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. यात तब्बल ५१ मासेमारीची बंदरे आहेत.

डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर

गुजराती माणसाचे हे एक धंद्यासाठी आवश्यक असणारे वैशिष्ट्य. यांच्या दुकानात आपण एखादी साधी जरी वस्तु घ्यायला गेलो तरी ती वस्तु आपल्यासाठी किती महत्वाची हे आपण ती वस्तु घेईपर्यंत न थकता गोड बोलून सांगतात. तसेच आपण किती ही प्रश्न विचारले तरी त्याची न चिडता उत्तरे देतात.

कॉस्ट ऑप्टिमायझेशन :

कॉस्ट ऑप्टिमायझेशन अर्थात एखादी वस्तु कमी किमतीमध्ये मागण्याला गुजराती माणसं अजिबात लाजत नाहीत. उलट ते “मोटा भाई कुछ तो कम करलो” असं गोड बोलून ती वस्तु आपल्याकडून १० रुपये का होईना पण कमी करुन घेतातच.

यामुळे छोटे छोटे सेव्हिंग्जची सवय लागते. यालाच आपण आपल्या भाषेत तुच्छतेने कंजुस पणा म्हणतो. पण हिच गोष्ट संस्कार म्हणून तिथे रुजवली जाते.

खर्च कमी, गुंतवणूक जास्त :

पैसे ‘जमा’ करण्याच्या बाबतीत गुजराती व्यापारी आघाडीवर आहेत. व्यापारी लोकांच्या नफेखोरी बद्दल रिकामे लोक कितीही टीका करत असले, तरी योग्य नफा घेवून काम करणे यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. आपण उभारलेल्या धंद्यातून पैसा कमावणे, कमावलेला पैसा जमवणे आणि जमवलेला पैसा वाढवत नेणे हे गुजरातींच्या श्रीमंतीचे रहस्य आहे.

उद्योगासाठी कोणताही धोका पत्करण्याची तयारी 

गुजराती माणसं धोका पत्करायला अजिबात घाबरत नाहीत. त्यांच्या मते ‘नो रिस्क, नो रिवॉर्ड’. व्यापारी वृत्तीचे गुजराती दोन हजार वर्षापासून धोका पत्करत आले आहेत. भडोच, सुरत, वेरावळ ही पुरातन बंदरे होय. इथून युरोपपर्यंत त्यांचा व्यापार होता. त्याकाळी गलबतातून सामान घेऊन ग्रीस किंवा मस्कतला जाणे हे धोका पत्करण्या सारखेच आहे,

प्रत्यक्ष अनुभवातुन शिकणे :

भारतीयांना आदर्श वाटणा-या अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये गुजराती विद्यार्थी नसतात. तितका वेळ ते पुस्तकी ज्ञान मिळवण्यात घालवत नाहीत. पण तिथे पास झालेल्यांना ते नोकरी देतात. पुष्कळ बचत करावी, प्रत्यक्ष अनुभव घ्यावा आणि जमलेले पैसे धंद्यात गुंतवावे हे त्यांचे ब्रीद असते.

स्थलांतराचा धोका :

गुजरातींची पैसे कमावण्यासाठी कुठेही स्थलांतर करण्याचा धोका पत्करण्याची तयारी असते. हिरे व्यापारी विनोद गौतम अठराव्या वर्षी पॅरिसला गेला. १९९५ साली गौतमने बेल्जीयम विमानतळावर लहानसे दुकान काढले. नंतर ७० ठिकाणी. आता जगभर १०० दुकाने आहेत.

२ जानेवारी २०१५ च्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वॄत्तानुसार १९० देशांपैकी १२९ देशात गुजराती आहेत. त्या देशांतील अर्थव्यवस्थांवर त्यांचा प्रचंड प्रभाव आहे.

युगांडामध्ये तत्कालिन हुकूमशाहा ‘इदी अमेन’ याने अति राष्ट्रवादातून गुजरातींना देशातून बाहेर काढले होते.

यानंतर काहीच वर्षांत युगांडाची अर्थव्यवस्था कोसळलेली जगाने पाहीली. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवनी यांना स्थलांतरित गुजरातींना परत बोलावण्यासाठी ब्रिटनमध्ये यावे लागले.

अमेरिकेत पंधरा सोळा लाख, इंग्लंडमध्ये सहा लाख, आफ्रिकेत तीन लाख, गुजराती आहेत. एकूण भारताबाहेर असलेल्यांपैकी तेहतीस टक्के छोटयाश्या गुजरातेतील आहेत. अमेरिकेतल्या मोटेल्सपैकी चाळीस टक्के पटेलांची आहेत. म्हणून त्यांना पोटेल्स असंही म्हणतात.

दैनंदिन गरजेच्या वस्तु बनविण्यावर भर :

गुजरातींच्या मते, ग्राहक जिवंत असेपर्यंत विक्रेता गरीब नसतो. कारण तो दैनंदिन वापरातील दहा रूपयाची वस्तूही पंधराला विकतो. या रोजच्या गरजेच्या वस्तू बनवतात, ते श्रीमंत होतातच. तिथे टुथपेस्ट, साबण, औषधे, तेल बनवणारे आणि विकणारे श्रीमंत आहेत.

काही आठवणारी नावे सांगायची तर, धीरूभाई अंबानी, त्यांची दोन्ही मुले मुकेश आणि अनिल, सनफार्मा औषध कंपनीचे दिलीप संघवी, दुसरे औषध बनवणारे टारेंट ग्रुपचे मेहता बंधू, कॅडिला औषध कंपनीचे पंकज पटेल, कोटक महेंद्र बँकवाले उदय कोटक, मोटारी रिक्षांसाठी गॅस वितरण करणारे गौतम अदाणी. ‘निरमा’ साबण कंपनीचे शंकरभाई पटेल. अलेम्बिक केमिकलचे अमीन. साराभाई कुटुंब हे सगळे गुजरातीच.

स्त्रियांचा हातभार :

गुजरातमधील स्त्रिया दुपारचा आराम करत नाही. आणंद खेडा सह इतर ठिकाणच्या गुजराती घरातील स्त्रिया दुपारचा थोडा वेळ मिळाला तरी पापड लाटत असतात. त्यामुळेच अगदी कमी भांडवलात सुरू केलेल्या ‘लिज्जत पापड’च्या उद्योगानं कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली आहेत.

कॅश व्यवहारांवर भर :

ज्या कॅशलेश इकोमॉमीसाठी मोदी धडपडतात, त्यांचेच गुजरात अजूनही कॅशलेस इकोनॉमीच्या पाठीमागे धावण्याचा प्रयत्न करत नाही. व्यापारात बक्कळ संपत्ती गोळा होते. पण बँकेद्वारे व्यवहार करणे टाळतात. ते कॅशवर जास्तीत जास्त भर देतात. बँकेद्वारे व्यवहार म्हणजे इन्कम टॅक्स खात्याला कळते. कोणतंही उत्पन्न लपवता येत नाही. पण कॅशच तसे नसते. त्यांची झाकली मूठ सव्वा लाखाची असते. त्यामुळे ते इन्कमटॅक्समधून पळवाटा शोधू शकतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.