मर्यादेच्या जोखडात बांधलेल्या मुलींसाठी ‘गुलाबाई’ हा एक मुक्त होण्याचा उत्सव असतो.

खान्देश हा प्रांत तसा बऱ्याच विविधतेने नटलेला. ही विविधता खान्देशला भारताच्या इतर भागापासून वेगळं बनवते. खान्देश प्रांतात असलेले वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ, सण उत्सव, यात्रा आणि परंपरा या गोष्टी खान्देशचा  वेगळेपणा दाखवून देतात. खान्देशमध्ये अशीच एक वेगळी परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे, परंतु मागील काही वर्षांपासून ती परंपरा नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. ती परंपरा म्हणजे ‘गौरी गुलाबाई’ची !

‘गुलाबाई’ म्हणजे देवी पार्वतीचे एक रूप, गणेश  विसर्जन  झाल्यावर दुसऱ्या दिवशी गुलाबाईची प्राण प्रतिष्ठापना केली जाते. यात एक गुलाबाई आणि एक गुलोजी यांची प्रतिकृती असते. खान्देशात काही ठिकाणी यांना “भुलाबाई” आणि “भूलोजी” देखील म्हटले जाते. ही गुलाबाई कोजागिरी पौर्णिमेपर्यंत खान्देशी घराची निवासी असते.

परंपरेमागची आख्यायिका.

एकदा देवी पार्वतीने महादेवाजवळ इच्छा प्रकट केली की तिला देखील पृथ्वीवरील इतर स्त्रियांप्रमाणे माहेरी जाण्याचा मोह झाला आहे. त्यावर महादेव म्हणाले, ‘ते कसं शक्य आहे?’

देवी पार्वतीने यासाठी हट्टच धरला. मग महादेवाने देवी पार्वतीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर अवतरीत व्हायचं ठरवलं.  त्यानंतर महादेव आणि पार्वती रूप बदलून पृथ्वीवरील एका व्यक्तीच्या घरात राहिले. ते ज्या व्यक्तीच्या घरात राहत होते, त्या व्यक्तीची मुलगी आणि जावई एका अपघातात मृत्युमुखी पडले होते.

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महादेव आणि पार्वती यांनी आपल्या खऱ्या रुपात त्या जोडप्याला दर्शन दिलं आणि त्यांची मुलगी व जावई मृत्यूमुखी पडल्याची बातमी सांगितली. तसेच त्या कुटुंबाला वरदान दिलं की ते नेहमी या कालावधी दरम्यान ‘गुलाबाई’ आणि ‘गुलोजी’ या त्यांच्या मृत मुलगी व जावयाच्या रुपात त्यांना भेटायला येत राहतील. अश्याप्रकारे तेव्हापासून घरोघरी ‘गुलाबाई’ची स्थापना केली जाते.

खान्देशी संस्कृतीचं आणि समानतेच्या विचारांचं प्रतीक.

‘गुलाबाई’ साजरा करण्यामागे जरी ही दंतकथा सांगितली जात असली तरी अनेकजन ‘गुलाबाई’ला खान्देशी संस्कृतीचं आणि समानतेच्या विचारांचं प्रतीक मानतात. गणेशोत्सवादरम्यान मुलं गणपती उत्सव साजरा करणे, आरास रचणे, गणपती पूजा करणे,विसर्जन करणे या सगळ्या गोष्टीत गुंतलेले असायचे. ज्या गोष्टींमध्ये मुलींना सहभाग घेता येत नव्हता. त्यामुळे खास मुलींसाठी म्हणून ‘गुलाबाई’चा सण साजरा करण्यात येऊ लागला.

हे ही वाचा –

गुलाबाईच्या काळात रोज संध्याकाळी मुली-स्त्रिया एकमेकांच्या घरी जाऊन ‘गुलाबाई’चं गीत म्हणत टिपऱ्या खेळतात. खान्देशी ग्रामीण मराठी भाषेत असणारी ‘गुलाबाई’ची ही गीतं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतात. ही गीतं गाताना खेळल्या जाणाऱ्या टिपऱ्या या बहुतेक खान्देशावर पडलेल्या गुजराती संस्कृतीच्या प्रभावातून आलेल्या असाव्यात.

मुली गुलाबाईचे विविध खेळ खेळतात. त्यातला ‘गुलाबाईचा प्रसाद ओळखण्या’चा खेळ तर अतिशय लोकप्रिय आहे. या खेळात देखील एक विशिष्ट गीत गायले जाते आणि जो कोणी ‘खाऊ’ अर्थात ‘प्रसाद’ काय हे ओळखेल त्याला सर्वात आधी प्रसाद मिळतो, नाहीतर त्या मुलीकडे जाऊन गुलाबाईची आरती करावी लागते. अर्थातच यानिमित्ताने मुली एकमेकिंच्या घरी जातात, त्यामुळे त्यांच्या मैत्रीची आणि परस्पर सहकार्याची भावना तयार होते.

स्त्री मुक्तीचा उत्सव नामशेष होण्याची भीती.

मर्यादेच्या जोखडात बांधलेल्या मुलींसाठी ‘गुलाबाई’ हा एक मुक्त होण्याचा उत्सव असतो. या उत्सवादरम्यान मुली मोकळेपणाने वावरू शकतात. गाणे गाऊ शकतात. आनंद साजरा करू शकतात. अर्थात आजच्या स्त्री मुक्तीच्या काळात जरी हे कालबाह्य वाटत असलं तरी एक काळ असा होताच की जेव्हा हा सण मुलींसाठी एक वेगळाच आनंद घेऊन यायचा.

सद्यस्थितीत वाढत्या शहरीकरणामुळे आणि ओस पडत चाललेल्या खेड्यांमुळे हा सण नष्ट होत चालला आहे. त्यामुळे गुलाबाईच्या गाण्यातून ग्रामीण संस्कृतीचा वर्षानुवर्षे जिवंत ठेवण्यात आलेला आत्मा हरवेल की काय असं वाटतंय. त्यामुळे हा उत्सव असाच झपाट्याने हद्दपार होत राहिला तर भविष्यात एक दिवस असा येईल की गुलाबाई माहेरी येणं बंद करेल. ते स्त्रीला मुक्त करणारे गाणे, टिपऱ्यांचे आवाज फक्तं आठवणीत उरतील. कदाचित ती ग्रामीण संस्कृतीच्या शेवटाची सुरुवात असेल.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.