दारात गुलाबी पाण्याची बाटली ठेवली की कुत्री येत नाहीत, खरय का भिडू..!

चंद्रयानाचा संपर्क हुकला. 370 कलम रद्द केल्यामुळे गेला महिनाभर जोरदार वादळ उठल. महाराष्ट्रात मागचा महिना पूरानं गाजवला. आत्ता इलेक्शन येणार म्हणून नेतेमंडळी नटून बसलेत. काल परवा किल्ले भाड्याने देण्याच्या कल्पनेने हाहाकार माजला.

इतकं सगळं आजूबाजूला चालत असताना एका भिडूने विचारलं,

ते नव्हं पण ते गुलाबी पाण्याची बाटली भरून ठेवली की कुत्री खरच पळून जातेत काय? 

खरच. जग चंद्रावर आणि ह्यो मंगळावर अशातला हा प्रकार. साहजिक आहे म्हणा. मुलभूत प्रश्न कोणते याकडं पहिला लक्ष दिलं पाहीजे. म्हणजे कसं तर तिकडे आत्ता काश्मिरमधली जमीन जरी विकत घेता येत असली तरी इथं आपल्या दारात कुत्र रोज हागून जात त्याला काय करायचं हा प्रश्न अजेंड्यावर असला पाहीजेच. 

भिडूचा प्रश्न प्रामाणिक होता. त्यात हल्ली हे गुलाबी बाटलीची दहशत चांगलीच जोर पकडतेय हे पण खरं.

गुलाबी पाण्याची बाटली दारात ठेवायची आणि हे चुटकी वाजवल्यासारखी कुत्री गायब होतात हे यामागचं लॉजिक. आत्ता बोलभिडूने पण वचन दिलय, लोकांच्या मुलभूत समस्येला हात घालायला. अहो हात घालायचं ठिकय पण डायरेक्ट असले प्रश्न मांडायचे म्हणजे अती झालं. पण कसय प्रश्न फाट्यावर मारून चालणार नाहीत. वाचक देव असतात अस आमच्या संपादकांनी पहिल्याच भेटीत सांगितलेल. मग देवाच ऐकायला पाहीजे. त्यांनी प्रश्न विचारले तर उत्तर द्यायला पाहिजे. 

तर मुद्दा क्रमांक एक. 

गुलाबी बाटली नक्की काय असते. 

काय करतात तर आपली बिसलेरीची पाण्याची रिकामी बाटली घेतात. त्यात पाणी भरतात. त्यात कुंकू टाकायचं. खर तर लाल रंग यायला पाहीजे पण कुंकू कमी असलं की गुलाबी कलरच पाणी दिसतं. कुंकासोबतच काहीजण कलर पण टाकतात. या ठिकाणी पाण्यात कुठला पदार्थ टाकलाय ते महत्वाच नसतं तर पाण्याला गुलाबी, लाल कलर येणं महत्वाचं असतं. काहीही टाकून पाण्याला गुलाबी, लाल कलर आणला जातो. मग ती पाण्याची बाटली ज्या ठिकाणी कुत्र्याची समस्या आहे अशा ठिकाणी ठेवली जाते.

यामुळे काय होतं तर म्हणे कुत्री त्या बाटलीला पाहून पळून जातात. कुत्र्यांनी ती गोष्ट संशयास्पद वाटते. या ठिकाणी एक मुद्दा लॉजिक लावून विचारू वाटतो तो म्हणजे कुत्र्यांना संशयास्पद वाटतं हे आपल्याला कस कळतं. अहो कुत्र हळूनच मागणं येवून कधी बोX धरेल याचा नेम नसतो. अशा वेळी कुत्र्याच्या मनात गोंधळ उडाला आहे असा दावा करणारे लोक महान असावेत. 

असो, तर पहिल्या मुद्यात प्रकार काय आहे आपणास कळला असेल, आत्ता मुद्दा क्रमांक दोन,

असल्या प्रकारांना सुरवात कुठून झाली. 

मोठमोठ्या शोधांप्रमाणे या शोधाचे जनक देखील अज्ञात राहिले हे फॅड नक्की कुठ जन्मल हे काहीच सांगता येत नाही. पण दक्षिण भारतात याचा जोर बघता, या गोष्टीची मुळ संकल्पना दक्षिण भारताची असा दावा ठोकला जातो. कर्नाटकातल्या काही भागात माकडांचा होणारा त्रास पाहून गुलाबी रंगाच्या बाटल्या दारात, घरांवर, झाडांवर बांधण्यात आल्या. जो न्याय माकडांना तोच कुत्र्यांना या न्यायाने हा उपाय कुत्र्यांवर करण्यास सुरवात झाली. 

हळुहळु हे लोण महाराष्ट्रात देखील पसरलं. आज कोल्हापूर, सांगली, सोलापूर सह पुण्याच्या काही घरांबाहेर तुम्हाला अशा गुलाबी बाटल्या दिसतील. 

आत्ता हे कितपण खरं आहे. 

याबद्दल जे असा प्रयोग करत आहेत अशा व्यक्तिंनाच विचारून खात्री करण्याच आम्ही ठरवलं म्हणून आम्ही  सांगली येथे राहणाऱ्या व्यंकटेश जोशी यांच्याशी संपर्क साधला. अगदी उत्साहात ते म्हणाले, १०० टक्के रिझल्ट येतोय. अगोदर रोज सकाळी घरापुढं कुत्र्यांनी रांगोळी काढलेली आहेच. पण जेव्हापासून बाटली ठेवली कुत्री तिकडं फिरकत पण नाहीत. असच उत्तर सोलापूरातल्या सुशिल कोळी यांनी दिलं. ते देखील म्हणाले की पाण्याची बाटली ठेवली की कुत्री येत नाहीत. विशेष म्हणजे ते म्हणाले मी एकदा साधं पाणी ठेवलं तर कुत्र त्या बाटलीवरच मुतून गेलं. पण गुलाबी कलरची बाटली ठेवली आणि कुत्र १० फूटावरूनच लांब पळालं. 

थोडक्यात जे हा प्रयोग करतेत ते १०० टक्के रामबाण उपाय असल्याची खात्री देत आहेत. पण दिसतं तस नसतं. काहीजण असही सांगतात की प्रयोग म्हणून आम्ही हा प्रकार केला तर कुत्री त्या बाटलीवरच मुतून जायला लागली. थोडक्यात सांगायच झालं तर कुत्र्यांनीच हा प्रकार फाट्यावर मारला. 

तर हा प्रकार शंभर टक्के खोटा आहे. आम्ही ज्या पशुवैद्यकिय डॉक्टरांना विचारलं त्यांनी सांगितलं की यामागे काहीही लॉजिक नाही. कुत्रे गुलाबी रंगाला भितात अस काहीही नाही. सरळ सांगायचं तर जीवशास्त्रीय भाषेत याला काहीही लॉजिक नाही. 

आत्ता प्रश्न पडला आहे की, लोक अस का वागत आहेत…! 

कधीकधी वाटतं सेम हाच प्रश्न कुत्र्यांना देखील पडला असेल. लोक अस का वागत आहेत. तर माणूस आणि कुत्र्यांमध्ये एक प्रकार कॉमन आहे. तो म्हणजे दोघही समाजशील प्राणी आहे. दोघही कळपात राहतात आणि कळपाप्रमाणे वागतात. म्हणजे चौकातल्या एका खांबावर एखादा कुत्रा मुतला तर गल्लीतली सगळी कुत्री तिथं जावून मुत्रविसर्जन करुन येतात. माणसाच देखील असच असत. एका माणसाने प्रयोग केल्यावर सारासार विचार न करता माणसं गुलाबी रंगाची बाटली ठेवून प्रयोग करतात.

दूसरी गोष्ट म्हणजे हा प्रकार करायला फक्त मोकळा वेळ लागतो. बाकी कोणताच खर्च यासाठी लागत नाही.  केंद्रशासनाची बेरोजगारीची आकडेवारी पाहता हा प्रकार स्वकरमणूक करण्यासाठी देखील उत्तम असल्याचं दिसून येत आहे त्यातूनच हे प्रकार वाढीस लागल्याच सांगण्यात येतय. 

तर आत्ता लास्टचा प्रश्न, 

आपण हा प्रकार करू शकता का…? 

मोकळा वेळ असेल तर नक्कीच हो. गुलाबी पाणी आणि बाटलीला काहीही खर्च येत नाही. त्यात ज्यांच्यावर प्रयोग करतोय ती येवून जावून मोकाट कुत्रीच. त्यांच्या अस्मिता दुखावतील म्हणून कोणीही मोर्चा काढू शकणार नाही. तुमच्याकडे रिकामा वेळ असेल आणि टाईमपास होत नसेल तर हा प्रयोग अवश्य करुन बघायला हवा.

आणि हो यामागे काय लॉजिक आहे अस विचारलं तर आपल्या अंगावर भटकी कुत्री सोडण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करु. 

हे हि वाच भिडू. 

2 Comments
  1. Chinmay says

    लहान असताना लाल रंग पाहीला की कूत्रा attack करतो अशी प्रथा प्रचलीत होती . आता याच रंगाला घाबरतो ही आहे ????????????????????

  2. Mahesh says

    नमस्कार टीम,

    तुमचे लेख नेहमीच खूप चांगले असतात.

    सध्या कोरोना बद्दल सामान्य लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे, काय करावं काय करू नये यासाठी खूप मेसेज येत असतात पण खर काय अन् खोटं काय हे देव जाणो.

    जर आपल्याला कोरोना चा उगम कुठे झाला, लक्षण काय असतात, कुठे संपर्क करावा, काय करावं हे सगळं एक नेहमीच्या स्टायल मध्ये लोकांपर्यंत पोहोचवता येईल का?

    महेश

Leave A Reply

Your email address will not be published.