माजी मंत्र्याच्या एका आंदोलनामुळे संपूर्ण विधानसभा जळून खाक झाली असती…

६ डिसेंबर २००५. सकाळचे ११ वाजले असतील. महाराष्ट्राच्या विधिमंडळात नेहमीची लगबग सुरु होती. सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरु होता. सत्ताधारी व विरोधक यांच्यातील खडाजंगी सुरु झाली होती. काही आमदार अजून येत होते. तिकडे विधानसभा अध्यक्ष हेडमास्तर प्रमाणे सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते.

एकूण काय नेहमीचं वातावरण होतं.

साधारण पावणे बारा वाजत आले असतील. शिवसेनेचे आमदार गुलाबराव गावंडे काही तरी बोलण्यासाठी उभे राहिले. विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर त्यांना जागेवर बसा तुमचा नंबर आला कि बोला असे सांगू लागले. पण गुलाबराव गावंडे मात्र ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.

तस बघितलं तर सेनेचे आमदार कायमच आक्रमक असतात. पण त्या दिवशी गुलाबराव गावंडे यांचा नूरच वेगळा होता. 

विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातले नेते. एकेकाळी सायकलचे पंक्चर काढणारा हा तरुण बाळासाहेबांच्या प्रेमात पडला आणि राजकारणात आला. कोणताही राजकीय वारसा नसलेल्या तळागाळातल्या युवकांना बाळासाहेब ठाकरेंनी पदे दिली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेनेला पोहचण्यात याच तरुणांनी सिंहाचा वाटा होता.

गुलाबराव गावंडे यांना बाळासाहेबांनी आमदारकी दिली पुढे त्यांना राज्यमंत्री देखील केलं. विदर्भाच्या शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी यासाठी गुलाबराव गावन्डे आक्रमक असायचे. 

१९९९ नंतर आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात विदर्भातील शेतकऱ्यांची आत्महत्या वाढली आहे यावरून त्यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. सावकार शेतकऱ्यांना छळतात आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येते असं त्यांचं म्हणणं असायच. यालास सरकारची निष्क्रियता देखील कारणीभूत आहे असं त्यांचं म्हणणं असायचं. 

शिवसेनेच्या आमदारांना विधानसभेत बोलण्याची संधी दिली जात नाही असा त्यांचा आरोप असायचा.

त्या दिवशी देखील असच झालं. बाबासाहेब कुपेकरांनी घोषणाबाजी करणाऱ्या गुलाबराव गावंडे यांना खाली बसायचे आदेश दिले. सभागृहाच्या संकेताप्रमाणे कोणत्याही सदस्याला बोलण्यालापूर्वी अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. अध्यक्षांनी परवानगी दिली तरच सदस्याला बोलण्याची परवानगी मिळते. अन्यथा त्याला बोलता येत नाही. सभागृह अध्यक्षांचे आपल्याकडे लक्ष नसल्याने गुलाबरावांचा पारा चढला..

 धिप्पाड शरीर, अंगावर भगवे उपरणे, दाढी अशा वेशातले गुलाबराव गावंडे घोषणा देत देत सभापतींच्या समोरच्या वेलमध्ये आले. 

तिथे त्यांनी शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नी आत्मदहन करू अशी घोषणा केली.

विधानसभेत हे काही नवीन नाही. नेहमीचा गोंधळ असेल असच सगळ्यांना वाटत होतं. पण अचानक गुलाबराव गावंडे यांनी आपल्या खिशातून दोन बाटल्या बाहेकर काढल्या. एक छोटी बॉटल होती तर दुसरी बिसलेरीची बॉटल होती. छोट्या बॉटल मध्ये कीटकनाशक होते तर दुसऱ्या बॉटलमध्ये पेट्रोल.

गुलाबरावांनी कीटकनाशकाची बॉटल तोंडाला लावली आणि दुसऱ्याच क्षणी अंगावर पेट्रोल ओतून घेण्यास सुरवात केली. सगळे सभागृह स्तब्ध झाले. कोणालाच काही कळेना. गुलाबराव गावंडे यांनी जेव्हा लायटर बाहेर काढला तेव्हा मात्र गडबड उडाली. विरोधी बाके आणि सत्ताधारी दोन्हीकडून आमदारांनी गावंडे यांच्याकडे धाव घेतली.

मुख्यमंत्री विलासराव देशमुख, छगन भुजबळ यांनी देखील गुलाबराव गावंडे यांना अडवण्याचा प्रयत्न केला. संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तर त्यांना पकडलंच. पण संतापाच्या भरात असलेले गुलाबराव गावंडे मला सोडा अन्यथा सगळं सभागृह पेटवून देऊ अशा घोषणा करत होते असं म्हटलं गेलं. गावंडे कोणाला आवरतील असं वाटत नव्हतं.

अखेर सभागृहातील कर्मचारी धावून आले. त्यांनी गावंडे यांच्याकडे पेट्रोलची बाटली आणि लायटर काढून घेतला आणि त्यांना सभागृहाच्या बाहेर नेलं. पण या सगळ्या धामधुमीत विलसर्व देशमुखांच्या आणि हर्षवर्धन पाटलांच्या अंगावर पेट्रोल सांडलं होतं. सभागृहात देखील बऱ्याच ठिकाणी पेट्रोलचे शिंतोडे उडाले होते. बाबासाहेब कुपेकरांनी सभागृह स्थगित केलं. 

गुलाबरावांनी कीटकनाशक आणि पेट्रोलची बाटली सुरक्षाव्यवस्थेला चकमा देऊन विधानभवनात आणलीच कशी हा प्रश्न अनेकांना पडला होता.

असं म्हणतात की गुलाबराव गावंडे यांच्या त्या आततायीपणाने संपूर्ण विधानसभा जळून खाक झाली असती. इतर सदस्यांच्या सावधपणामुळे एक अपघात होता होता वाचला होता.

हे ही वाच भिडू.

  

 

 

  

 

Leave A Reply

Your email address will not be published.