राखी म्हणजे गुलजार साहेबांची अधुरी राहिलेली कविता..

मुझे शौक था कि मिलुँ तुझे
मुझे खौफ भी था कि कहूंगा क्या
तेरे सामने से निकल गया
बडा सहमा सहमा, डरा डरा |

गुलजार साबने लिहिलेली हि शायरी त्यांचं आणि त्यांची पत्नी राखीचं नातं दर्शवणारी आहे. गेली अनेक दशकं हिंदी सिनेजगतात स्वतःच्या गाण्यांनी आणि शेरोशायरींनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कवी-गीतकार म्हणजे गुलजार. गुलजारजींच्या कविता वाचुन, त्यांनी लिहिलेली गाणी ऐकुन एक संपुर्ण पिढी घडली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरु नये.

नव्या पिढीला सुद्धा या माणसाबद्दल तितकंच कुतुहल. कारण जो माणुस ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ सारखं हळुवार प्रेमगीत लिहितो तोच माणुस ‘बिडी जो लई ले’ या आयटम साँग गाण्याच्या प्रकारात सुद्धा तितकाच बिनधास्तपणे वावरतो.

आज गुलजार साबचा वाढदिवस. यानिमित्ताने, एकमेकांपासुन विभक्त राहत असले तरीही पत्नी राखीसोबत गुलजारजींचं नातं नेमकं कसं आहे, हे जाणुन घेऊ.

एकीकडे बाॅलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री म्हणुन राखी प्रसिद्धीच्या शिखरावर होती. तर दुसरीकडे प्रतिभावंत कवी आणि गीतकार म्हणुन गुलजार साबची रसिकांच्या मनात ओळख होती. एका बाॅलिवूड पार्टीत दोघांची ओळख झाली आणि पाहताक्षणी गुलजार राखीच्या प्रेमात पडले. आपआपल्या क्षेत्रात मशहूर असलेल्या या दोघांनीही १५ मे १९७३ रोजी एकमेकांशी विवाह केला.

लग्नाच्या आधीच गुलजार साबने राखीला सांगीतलं होतं की,

‘लग्न झाल्यानंतर तु सिनेमात काम करणार नाहीस.’

राखीला सुद्धा गुलजार साबचं हे म्हणणं मान्य होतं.

गुलजारजींचं म्हणणं मान्य असलं तरी राखी हाडाची अभिनेत्री. सिनेमांमध्ये काम करण्याची प्रबळ इच्छा तिला होती. त्या काळात कवी-गीतकाराच्या पलीकडे एक दिग्दर्शक म्हणुनही गुलजार नाव कमावत होते. सिनेमांमध्ये काम न करण्याचा शब्द जरी राखीने दिला असला तरी ‘गुलजार दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमांमध्ये छोटी-मोठी भुमिका मिळलेच’, अशी तिची अपेक्षा होती.

गुलजार खुपदा सिनेमांची गाणी आणि इतर कामांसाठी घराबाहेरच असायचे. त्यामुळे राखीच्या मनाला ‘दिवसभर घरात बसुन काय करायचं?’ हा प्रश्न सतावत होता.

स्वतःच्या काव्यातुन प्रेम, विरहाचं वर्णन करणारे गुलजार तत्वांशी एकनिष्ठ होते. ‘राखी लग्नानंतर सिनेमात काम करणार नाही’ हे त्यांनी पक्क ठरवलं होतं. या निर्णयामागे गुलजार साबची काही व्ययक्तिक कारणं असतील.

गुलजारांनी स्वतः अनेक सिनेमे दिग्दर्शित केले पण त्या सिनेमांमध्ये त्यांनी राखीऐवजी शर्मिला टागोर, सुचित्रा सेन यांसारख्या नायिकांना घेणं पसंत केलं.

जेव्हा माणसाला काहीच काम नसतं तेव्हा त्याचा वेळ जाता जात नाही. घरी बसुन बसुन राखीला वैताग आला होता. तिला काही सिनेमांच्या ऑफर्स आल्या होत्या, पण गुलजारजींना दिलेल्या शब्दामुळे तिने ऑफर्स नाकारल्या. ज्या व्यक्तीला सतत कामाची सवय असते, तिला काहीच काम न करता दिवस घालवणं आवडत नाही. राखीचं तेच होत होतं.

अखेर राखीने लग्नानंतर ‘कभी कभी’, ‘त्रिशुल’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘दुसरा आदमी’, ‘जुर्माना’, ‘काला पत्थर’ असे एक से बडकर एक सिनेमे केले. विशेष म्हणजे लग्नानंतरही अभिनेत्री म्हणुन राखीची जादु कायम राहिली.

लग्नानंतर सिनेमात यशस्वी होत असलेल्या राखीचं गुलजार सोबतचं वैयक्तिक आयुष्य मात्र अपयशी ठरलं.

लग्नानंतर वर्षभरात गुलजार आणि राखीला मुलगी झाली. तिचं नाव मेघना. मेघना जन्माला आल्यानंतर काहीच दिवसांनी गुलजार आणि राखी १९७४ साली वेगळे झाले. असं म्हणतात, कोणत्याही घटस्फोटाच्या करारावर सही वगैरे न करता हि दोघं गेली अनेक वर्ष एकमेकांपासुन दूर राहत आहेत. दूर असली तरीही एकमेकांविषयीचं प्रेम कमी झालं नाही.

याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर, १९९० सालच्या फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यातला एक किस्सा आहे.

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री पुरस्कार प्रदान करण्यासाठी गुलजार साब रंगमंचावर आले. ‘आणि विजेती आहे’ अशी घोषणा झाली. गुलजारजींच्या हातात असलेल्या लिफाफ्यात विजेत्या अभिनेत्रीचं नाव दडलेलं होतं. लिफाफा उघडून विजेत्या अभिनेत्रीचं नाव बघताच गुलजारांच्या चेह-यावर हसु उमटलं. ‘

मी हे नाव एका वेगळ्या अंदाजात जाहीर करतो’,

असं गुलजारजींनी सांगीतलं. विजेत्या अभिनेत्रीचं नाव न उच्चारता, एक पती स्वतःच्या पत्नीला कशी हाक मारेल, अशा खास अंदाजात ‘अजी, सुनती हो!’ असं गुलजारजी म्हणाले. असं म्हणताच उपस्थित सर्वांमधुन हास्य आणि टाळ्यांचा संगम झाला. ते नाव होतं राखीचं.

‘राम लखन’ सिनेमासाठी राखीला त्या वर्षी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार गुलजारजींच्या हस्ते मिळाला.

एकमेकांपासुन वेगळे झाल्यावर १६ वर्षानंतर बहुदा प्रथमच हि जोडी जाहीर कार्यक्रमात एकत्र दिसली. फिल्मफेयरच्या इतिहासातील काही क्षण रसिकांच्या मनावर कोरले गेले आहेत. हा क्षण त्यापैकीच एक असावा.

गुलजार जरी राखीसोबत राहत नसले तरी राखीने बनवलेले खाद्यपदार्थ त्यांना आजही मनापासुन आवडतात. गुलजार साबना साड्यांबाबत बरीचशी माहिती आहे. त्यामुळे कुठे चांगली साडी नजरेत आल्यावर गुलजार ती साडी राखीसाठी खरेदी करतात. दोघांचे विचार काहीसे वेगळे असले तरीही एकमेकांच्या कामाचा दोघंही आदर ठेवतात.

आज दोघांची मुलगी मेघना सुद्धा बाॅलिवूडमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. ‘तलवार’, ‘राजी’, ‘छपाक’ यांसारख्या सिनेमातुन मेघनाने दिग्दर्शक म्हणुन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गुलजार साब आज ८५ वर्षांचे आहेत. गुलजारजींनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांची, त्यांनी लिहिलेल्या गाण्यांची, त्यांच्या लेखणीतुन कागदावर उमटलेल्या शेरो-शायरींची भुरळ आपल्या सर्वांच्या मनावर कायम राहील. गुलजार शेरो शायरीच्या पलीकडे एक माणुस किती सच्चा आहे, याची ओळख त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक ओळींमधुन होत असते. गुलजार लिहितात,

हाथ छूटे भी तो रिश्ते नही छोडा करते
वक्त की शाख से लम्हे नही तोडा करते

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.