गॅरेजमध्ये काम करणाऱ्या गुलजारांना पुस्तकाच्या थप्पीमुळे बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला

बॉलिवूडचा आत्मा म्हणजे यातली मेलडीयस गाणी आणि त्याला मिळणार भव्यदिव्य स्वरूप. ९० च्या दशकात जी गाणी बनली त्यानंतर तसा काळ परत येणार नाही अशी व्यवस्था आजच्या संगीतकारांनी करून ठेवलीय. ८०-९० च्या दशकातल्या गाण्यांचा असा काळ होता कि तेव्हा गाण्यातल्या शब्दाशब्दाला वजन होतं. अनेक महान गीतकार याच काळात पुढे आले. त्यातलंच एक नाव म्हणजे गुलजार.

आजही जर कधी सोशल मीडियावर शेर शायरीच्या पेजवर भटकंती केली तर प्रत्येक ठिकाणी गुलजार हे नाव दिसतं म्हणजे दिसतंच. कित्येक सिनेमांना गुलजारांचे शब्द लाभले आहेत आणि ती गाणी सुपरहिट झाली आहेत. अगदी मोगलीचं

जंगल जंगल बात चली है पता चला है, चड्डी पेहनके फुल खिला है, फुल खिला है

हे आन सुद्धा गुलजारांनीच लिहिलं होतं.

बॉलीवुडमध्ये  गुलजारांना ब्रेक कसा मिळाला त्याबद्दलचा हा किस्सा. या घटनेमुळे बॉलीवूडला एक दिग्गज गीतकार तर लाभलाच शिवाय एक महान दिग्दर्शकसुद्धा मिळाला. तर जाणून घेऊया हा किस्सा. 

१८ ऑगस्ट १९३४ रोजी गुलजारांचा जन्म झाला तो पंजाबमध्ये. गुलजारांचं मूळ नाव संपूर्णसिंह कार्ला होतं. गुलजारांचं बालपण मोठ्या हलाखीत गेलं. फाळणीचा मोठा आघात गुलजार यांच्या मनावर झाला. कामाच्या शोधात ते मुंबईत आले. मुंबईसारखं मोठं शहर त्यांना मानवेल कि नाही अशी गत झाली होती. पण पोटापाण्याच्या सोयीसाठी ते काम शोधू लागले.

मुंबईतच एका गॅरेजमध्ये गुलजारांना काम मिळालं ते मॅकॅनिकचं. गॅरेजमध्ये काम करण्यात त्यांचं मन रमत गेलं. ज्या ज्या वेळी गॅरेजमध्ये काम नसायचं तेव्हा गुलजार कविता आणि शेर शायरी करत बसायचे. वाचनाचं अफाट वेड त्यांना होतं. रिकाम्या वेळात कवितांचा छंद गुलजारांना वेगळ्या विश्वात घेऊन जाई. 

गॅरेजच्या जवळच एक पुस्तकाचं दुकान होतं. या पुस्तकाच्या दुकानात आठ आण्यात दोन पुस्तकं वाचायला भाड्यावर मिळायची. हि स्कीम गुलजारांना भयंकर आवडली. इथून त्यांचा वाचनाचा व्यासंग आणि चटक वाढतच गेली. यानंतर एक अनपेक्षित घटना घडली जी गुलजारांचं करियर सेट करून गेली.

एके दिवशी प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक विमल रॉय यांची  गाडी खराब झालेली. योगायोगाने ते गुलजार ज्या गॅरेजमध्ये काम करत होते त्या गॅरेजमध्ये आले. गुलजार मन लावून काम करत होते. अचानक विमल रॉय यांचं लक्ष बाजूच्या पुस्तकाच्या थप्पीवर गेलं. त्यांना आश्चर्य वाटलं कि गॅरेजमध्ये इतकी पुस्तकं कोण वाचतं ?

त्यांनी गुलजारांना विचारलं कि हे पुस्तक कोण वाचतं ? गुलजार म्हणाले मी वाचतो. विमल रॉय हे गुलजारच्या बुद्धिमत्तेवर प्रभावित झाले. त्यांनी गुलजारांना सांगितलं कि उद्या पासून गॅरेजमध्ये काम करायचं नाही. माझ्या ऑफिसवर ये आपण बोलू.

१९६३ साली बंदिनी नावाचा सिनेमा आला. या सिनेमातली सगळी गाणी शैलेंद्र यांनी लिहिलेली होती फक्त यातलं एक गाणं गुलजारांनी लिहिलेलं होतं. गुलजारांनी लिहिलेलं पहिलं गाणं होतं मोरा गोरा अंग लेइ ले, मोहे श्याम रंग देइ दे. हे गाणं तेव्हा भरपूर गाजलं.

या एका घटनेने गुलजार बॉलिवूडमध्ये हिट झाले. पुढे गुलजारांनी हजारो गाणी लिहिली, सिनेमे दिग्दर्शित केले. आजही गुलजारांच्या शब्दांची जादू कायम आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.