गुलशन कुमार म्हणाले, पैसे वैष्णोदेवीच्या अन्नछत्रावर खर्च करेल पण तुम्हाला दमडी देणार नाही

बॉलीवुडवरचा सर्वात भीषण हल्ला म्हणजे गुलशन कुमार यांची हत्या. दिवसाढवळ्या खंडणीसाठी अंडरवर्ल्डने टी सिरीजच्या गुलशन कुमार यांची हत्या घडवून आणली.

गुलशन कुमार हा माणूस शुन्यातून उभा राहिलेला.

भल्याभल्या प्रस्थापित धेंड्यांना बाजूला काढून या माणसाने स्वत:च अस्तित्व मुंबईमध्ये तयार केलं होतं. गुलशन कुमार हे धार्मिक होते. वैष्णोदेवी सह साईबाबा, शनीदेव, अमरनाथ अशा देवांवर त्यांची श्रद्धा होती. तर मुंबईच अंडरवर्ल्ड मुस्लीमधार्जीन्या गटांमध्ये मोडत होतं.

गुलशन कुमार यांची हत्या नेमकी कशी झाली याचं विस्तृत वर्णन डोंगरी टू दुबई या पुस्तकात करण्यात आलेलं आहे.

गुलशन कुमार यांनी नोयडा मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी सुपर कॅसेट नावाची कंपनी सुरू केली. एक एक करत ते यशाचं शिखर चढत गेले. सोनू निगम, अनुराधा पौडवाल, कुमार सानू अशा गायकांना त्यांनी संधी दिली. त्यांनी टि सिरीज नावाची कंपनी काढली.

हळुहळु संगीत उद्योगातला एक मातब्बर पहिलवान म्हणून गुलशन कुमार यांच नाव होवू लागलं. त्याच सोबत त्यांनी हिंदू धर्मीयांच्या देवतांच्या गाण्याचे कॅसेट काढण्यास देखील सुरवात केली होती. ते वैष्णोदेवीला मोफत अन्नछत्र राबवत होते.

एक वेळ अशी आली की १९९२-९३ मध्ये सर्वाधिक कर भरणारे उद्योजक म्हणून त्यांची नोंद घेतली गेली.

तर दूसरीकडे अबु सालेमला आपलं वर्चस्व सिद्ध करायचं होतं. तो पैशाचे वेगवेगळे पर्याय शोधत होता. यासाठी बॉलिवूडवर राज्य करण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता. त्यातूनच त्याने सुभाष घई आणि राजन राय यांच्यावर हल्ला घडवून आणला होता.

५ ऑगस्ट १९९७ रोजी राजीव नायरवर हल्ला झाल्यानंतर इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकाराने अबु सालेमला फोन केला होता. हे दोन्ही हल्ले अयशस्वी झाले होते.

त्याबाबात फोनवर बोलताना सालेम म्हणाला की,

हे सुभाष घई आणि राजन राय यांना मारायचे नव्हते फक्त भिती दाखवायची होती. खरा धमका तर पुढच्या काही दिवसात होणार आहे.

या पत्रकाराला अजून कोणत्यातरी बॉलिवूड सेलिब्रेटीवर हल्ला होणार असल्याची टिप मिळाली होती. त्याने धावत पळत जावून ही माहिती तत्कालीन क्राईम ब्रॅन्चचे प्रमुख असणाऱ्या रणजीत सिंग शर्मा यांना सांगितली.

रणजीत सिंग शर्मा यांनी सालेम हल्ला करु शकेल अशा संभाव्य लोकांची यादी काढली व त्यांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली.

मात्र या यादीत गुलशन कुमार यांचे नाव नव्हते. पोलीसांच्या यादीतून गुलशन कुमार हुकले.

इकडे गुलशन कुमार यांना अबु सालेमच्या धमक्यांचे फोन येत होते. पण ते या धमक्यांना भीक घालत नव्हते. त्यांनी या धमक्यांची तक्रार देखील दाखल केली नव्हती.

पुढे गुलशन कुमार यांच्या खुनाचा तपास करताना फोन रेकॉर्डिंगमध्ये पोलीसांना सालेम आणि गुलशन कुमार यांचे संभाषण मिळाले. यामध्ये गुलशन कुमार सालेमला म्हणतात,

तुला खंडणी देण्यापेक्षा मी वैष्णोदेवी येथे अन्नछत्र चालवण्यासाठी पैसे देवू शकतो. पण तुम्हाला पैसे देणार नाही.

काही दिवसात गुलशन कुमार यांचा सुरक्षारक्षक आजारी असल्याने त्यांच्यासोबत नसल्याची माहिती सालेमला मिळाली. याच संधीचा फायदा घ्यायचा त्याने ठरवले.

सालेमने आपल्या शार्पशुटरना सांगितले की गुलशन कुमार जेव्हा दर्शनासाठी जातो तीच संधी साधून त्यावर हल्ला करा.

सालेमने असही सांगितल होतं की, गुलशन कुमारची हत्या कराल तेव्हा त्याचा तडफडतानाचा आवाज मला ऐकायचा आहे. त्यासाठी त्याने आपल्या शुटरकडे एक मोबाईल देखील पोहच केला होता.

तो दिवस होता १२ ऑगस्ट १९९७ चा.

या दिवशी गुलशन कुमार ठरल्याप्रमाणे अंधेरीतल्या जीतेश्वर महादेव मंदीरात दर्शनासाठी गेले. गुलशन कुमार देवदर्शन करुन मंदिरातून बाहेर पडताच त्यांच्यावर जोरदार गोळ्यांचा वर्षाव सुरू करण्यात आला.

रक्तबंबाळ अवस्थेत आपला जीव वाचवण्यासाठी गुलशन कुमार तिथेच असणाऱ्या सार्वजनिक मुतारीच्या आडोश्याला गेले. मात्र मारेकरी तिथेही पोहचल्यानंतर शेजारी असणाऱ्या झोपडीवजा घरात ते शिरले.

मारेकरी आत आले. ते फोनवरून सालेमला गुलशन कुमार यांच्यावर होत असणारा हल्ला ऐकवत होते. गुलशन कुमार यांच तडफडणं ऐकून सालेम खूष होत होता. हे थरारनाट्य सुमार १५ ते २० मिनीट चालले. गुलशन कुमार गेल्याची खात्री करुनच ते मारेकरी तिथून निसटले.

या घटनेनंतर बॉलिवूडला एकच हादरा बसला. क्राईम ब्रॅण्चवरती प्रश्नांची सरबत्ती सुरु करण्यात आली.

क्राईम ब्रॅण्चने मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. अबु सालेमने हा हल्ला घडवून आणला असला तरी तो कोणाच्या सांगण्यावरून केला याचा शोध घेणं महत्वाच ठरणार होतं.

या भानगडीत हत्येशी संबधित नसणाऱ्या जावेद फावडाचा एन्काऊंटर करण्यात आला. पुढे हा जावेद फावडा हवा असणारा व्यक्ती नसून चकमकीत एक भाजीविक्रेता ठार झाल्याचा आरोप करण्यात आला. गुलशन कुमार यांच्या हत्येच्या चौकशीत पोलीसांना आवश्यक ती गती घेता न आल्याने त्यांच्यावर चौहोबाजूंनी टिका होवू लागली.

बाळासाहेब ठाकरे यांनी देखील पोलीस प्रमुखांचे शेतातील बुजगावण्याप्रमाणे व्यंगचित्र काढून आपला राग जाहीर केला.

यानंतर शर्मा यांनी घटनेचा तपास आपल्या पद्धतीने चालू केला. अबु सालेमने संगीत धमाल रजनी नावाचा एक कार्यक्रम दुबई येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील मोठ्या हस्ती उपस्थित असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.

या आधारावर शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये शर्मा म्हणाले,

आमच्या तपासामध्ये गुलशन कुमार यांच्या खूनाच्या पार्श्वभूमीवर काही अनपेक्षित, हादरवून टाकणारी माहिती आमच्या हाती आली आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक नदीम सैफी याने गुलशन कुमार यांची हत्या करण्याची सुपारी दिली होती. हा कट दुबईतील एम्पायर हॉटेलमध्ये रचण्यात आला होता व त्यावेळी इथे बॉलिवूडच्या बडे लोक इथे उपस्थित होते.

या आधारावर पोलीसांनी पुढे शाहरूख खान, सलमान खान, जॅकी श्रॉफ इत्यादींची कसून चौकशी देखील केली.

संदर्भ : डोंगरी टू दुबई

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.