खेकड्यांमुळे धरण फुटतं का ते माहित नाही, पण खेकड्यामुळे एक बाई कोट्याधीश मात्र झालीय. 

गुणाबाई सुतार. काहीजण त्यांना “गुंडाबाई” देखील म्हणतात. गुंडाबाई या नावात आलेल्या परिस्थितीसोबत दोन हात करण्याची ताकद दिसते. काहीजण त्यांना “खेकडेवाल्या मावशी” म्हणतात. मुंबईच्या वाशीत राहणाऱ्या या मावशी. आजवर अनेकांनी त्यांची सक्सेस स्टोरी मांडली.

मावशी खेकड्यांपासून एका वर्षात पाच कोटी मिळवतात म्हणून प्रत्येकांन आश्चर्य व्यक्त केलं. 

काही दिवसांपुर्वी तिवरे धरण फुटल्यानंतर खेकड्यांमुळे धरण फुटल्याचं राज्यातील मंत्रीमहोदयांनी सांगितलं. ऐन पावसाळ्यात खेकडे बदनाम झाले. खेकडे बोलू शकत नसल्यामुळेच हा डाव रचण्यात आला असावा. पण खेकडे बोलत असते तर त्यांनी गुणाबाईंच नाव मात्र घेतलं असत. कारण महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्यामधल्या निम्या खेकड्यांनी गुणाबाईंच तोंड पाहिलेलच असतय. 

गुणाबाईंच सासर आणि माहेर एकाच गावात. वडिल मासेमारीचा व्यवसाय करायचे. लहानपणी त्या वडिलांसोबत याच व्यवसायात हातभार लावायच्या. व्यवसाय म्हणजे काय तर वाशीच्या खाडीत मासेमारी करायची आणि सापडलेले मासे दादरला येवून विकायचे. गुणाबाईंच लग्न झालं. त्यांचा नवरा देखील मासेमारीतच. लहानपणापासून असणारी सवय मोडली नाही की रस्ता मोडला नाही. तोच रस्ता आणि तोच व्यवसाय. 

चार पैसै जास्त मिळतील म्हणून दारोदार जावून मासे विकायचे, खेकडे विकायचे असा व्यवसाय. लग्न झाल्यानंतर आपल्या माश्यांना, खेकड्यांना चांगला दर मिळाला पाहीजे असा विचार मनात आला. गावातल्या बायकांना एकत्र केलं आणि खेकड्यांची किंमत जास्त मिळावी म्हणून प्रयत्न करु लागल्या. याच दरम्यान त्यांची ओळख मद्रासच्या एका व्यापाऱ्याशी झाली. चांगला दर मिळत असल्याने त्या खेकडे मद्रासला पाठवू लागल्या. 

तो काळ होता १९९० चा.

या काळात वाशीच्या खाडीतून पकडलेले मासे मद्रासला जात होते. चांगले पैसे मिळत होते. दरम्यानच्या काळात गुणाबाईंच्या पतीचे निधन झाले. पदरात पाच मुलं होती. त्यांचा संभाळ करत त्यांनी खेकड्यांच्या विक्रीचा व्यवसाय चालू होता. बाहेरच्या राज्यात माल जात असल्याने गुणाबाईंच स्वत:च अस एक नेटवर्क झालं होतं. खेकडा एक्स्पोर्ट करण्याचा तो छोटासा प्रयत्न होता.

गावाला एकत्र घेवून सगळं करायचा हा त्यांचा पिंड. त्यांनी जो येईल त्यांना खेकड्यांच्या शेतीपासून ते मार्केटबद्दल माहिती देण्यास सुरवात केली. लोकांनी देखील त्यांच पाहून या नव्या व्यवसायात पाय रोवले. इथपर्यन्त ठिक होत पण त्यांनीच गुणाबाईंचे कॉन्टॅक्ट तोडण्याचे प्रयत्न केले. त्यांच्यापेक्षा स्वस्त:त खेकड्यांचा पुरवठा करुन दर पाडण्याच काम केलं. अशा अनेक गोष्टींमुळे गुणाबाईंचे प्रयत्न व्यर्थ जात होते. 

याच दरम्यान गुणाबाईंच्या मोठ्या मुलांच अकस्मित निधन झालं. लहान मुलगा सुभाषला हाताखाली घेवून त्या काम करु लागल्या. बायकांचे गट केले. एकत्रितपणे कोळंबी साफ करण्याच कॉन्ट्रक्ट घेवू लागल्या. दरम्यानच्या काळात खेकडे आणि चिंबोरी पुरवण्याच काम चालूच होतं. वेगवेगळ्या व्यापाऱ्यांशी संपर्क यायचा. खेकडे पाहून काम कायमच व्हायचं.

लहान मुलगा सुभाष देखील त्यांच्यासोबत काम करु लागला. व्यवसायात जम बसू लागला. सिंगापूर, मलेशिया पासून ते थेट युरोपमध्ये मुंबईचे खेकडे जावू लागले. तेव्हा मुलगा सुभाषच्या मदतीने त्यांनी २०१३ साली लालचंद एन्टरप्रायझेस नावाची खेकडे एक्सपोर्ट करण्यासाठी कंपनी सुरू केली. 

स्वत:ची कंपनी सुरू करायची, माल निर्यात करायचा तर मरीन प्रॉडक्ट रेग्युरेलटरी अॅथोरिटीचे नियम कडक असतात. आवश्यक ती स्वच्छता व नियम पाळावे लागतात. गुणाबाईंनी आपल्या घराच्या शेजारी खेकडे साफ करण्यासाठी एक युनिट बसवलं.

आणि सुरू झाला प्रवास लालचंद एन्टरप्रायझेसचा. 

यापुर्वी तयार नसणारे कच्चे खेकडे व्यापाऱ्यांना दिले जातं. तिथे खेकडे वाढवून ते निर्यात केले जातं. पण गुणाबाईंनी खेकड्यांच पालन स्वत: करायचं ठरवलं. भरती ओहोटीच्या काळात भरला जाईल असा घराशेजारीच तलाव तयार झाला. १०० ग्रॅमचा कच्चा खेकडा तीन तीन किलोंचा होवू लागला.

किलोला ३० डॉलरचा भाव मिळू लागला आणि कंपनीचा टर्नओव्हर कोटींच्या घरात गेला. 

रात्री अपरात्री भरती ओहोटीचा खेळ पाहून खेकडे पकडावे लागत. गुणाबाईंचा अभ्यास असा की खेकडा हातात घेण्याअगोदर खेकडा भरलेला आहे की नाही ते त्या ओळखतात. दिवसाचे सतरा सतरा तास त्या काम करु लागल्या.

कंपनी चालू झाल्यानंतर साठ मुलांना चैन्नईला ट्रेनिंगला पाठवण्याची जबाबदारी त्यांनी संभाळली. दरवर्षी त्या १०० टन खेकडे परदेशात पाठवतात. 

आज गुणाबाईंबद्दल सांगायच झालं तर खेकड्यातून त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या २०० हून अधिक जणांना रोजगार देतात. कोटींत कंपनी कमवते पण त्याहून चांगल म्हणजे वाईट अनुभव येवून देखील दूसऱ्यांनी हा व्यवसाय करावा म्हणून ते मार्गदर्शन करतात. निस्वार्थी वृत्तीमुळेच आगरी गौरव का किताब त्यांना दिला आहे. खेकडा पालन करण्यासंबधित आत्ता ट्रेनिंग स्कुल काढण्याचा देखील त्यांचा विचार आहे. 

आज मुंबईचे खेकडे परदेशात जातात.लोकांना चांगले पैसे मिळतात. हे सगळ गुणाबाईंमुळे झालं. त्यांच वय ६७ च्या घरात आहे. तरिही त्याचं जिद्दीने त्या या व्यवसायात तळ ठोकून आहेत.

थोडक्यात काय तर, खेकड्यामुळे धरण फुटत का ते सांगू शकत नाही पण खेकड्यामुळे कोट्यावधी होवू शकतं हे नक्की.   

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.