खंडोबा आणि धनगर संस्कृतीचा इतिहास समोर आणला तो जर्मनीच्या गुंथर सोंथायमरने

जेजुरीचा खंडोबा आणि पंढरपूरचा विठोबा हे मराठी मनाचे लोकदैवत. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त इथे गोळा होतात. असाच एक भक्त होता जो थेट जर्मनीतून जेजुरीला यायचा. तो देवांचा भक्त होता अस नाही तो मराठी भाषेचा भक्त होता. इथल्या अस्सल मातीतल्या संस्कृतीचा भक्त होता.

त्याच नाव गुंथर सोंथायमर.

१९३४ साली दक्षिण जर्मनीमध्ये त्यांचा जन्म झाला. वडील एका शाळेत हेडमास्तर होते. घरची परिस्थिती उत्तम होती. हा हिटलरच्या नाझी राजवटीचा काळ होता. त्याच्याच अतिमहत्वाकांक्षी धोरणामुळे दुसऱ्या महायुद्धास तोंड फुटले. अख्खा युरोप हादरून गेला. गुंथर सोंथायमरची फॅमिली त्याच्या आईच्या गावी शिफ्ट झाली. गुंथरचं शिक्षण तिथेच झालं.

शाळेत असतानाच गुंथर भारतीय तत्वज्ञानाकडे आकर्षित झाला होता.

इंडोजर्मन सोसायटीचे त्याने सदस्यत्व घेतले. त्याला यातच शिक्षण घ्यायचे होते मात्र त्याच्या वडिलांनी या डिग्रीला पुढे नोकरी मिळणार नाही अस सांगत त्याला कायद्याच शिक्षण घ्यायला लावल. गुंथरनी मात्र भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास सुरूच ठेवला. सोबतच संस्कृत आणि हिंदी भाषेचा देखील अभ्यास केला.

जेव्हा जर्मनीतील लॉ च शिक्षण पूर्ण झाल्यावर मात्र त्यांनी भारतात जाण्याचा निर्णय घेतला. जर्मन अ‍ॅकॅडमिक एक्सचेंज सर्व्हिस (डीएएडी) च्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. त्यात त्यांची निवड झाली.

जून १९५८ ला ते पुण्याला आले. हाच त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला.

इथल्या लॉ कॉलेजचे प्राचार्य जी.व्ही पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू कायदा, अँग्लो-हिंदू कायदा आणि आधुनिक हिंदू कायदा इतिहासाचा अभ्यास केला. प्राध्यापक व्ही. एम. बेडेकर यांच्यासमवेत त्यांनी संस्कृत कायद्याचे ग्रंथ वाचले. याच काळात त्यांनी संस्कृत हिंदी सोबतच मराठीच ज्ञान आणखी वाढविण्यासाठी स्वत: ला झोकून दिले.

तेव्हा त्यांच्या लक्षात आलं जर भारतातल्या समाजाचा खरा अभ्यास करायचा झाला तर इथल्या लोकसंस्कृती, लोकभाषा यावर भर दिला पाहिजे आणि हे ज्ञान पुस्तकातून मिळणार नाही.

तिथून त्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरण्यास सुरवात केली.

डॉ.डी.डी.कोसंबी यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं होतं .खेडोपाड्यात मिळेल तिथून माहिती ते दोघे गोळा करत होते. हा गोरा माणूस मराठीत बोलतोय, आपल्या देवाची माहिती घेतोय याची लोकांना गंमत वाटायची. ते त्यांच्याशी गप्पा मारायचे.

 ते त्यांचे लाडके गुंथरराव किंवा गुंथर साहेब बनले.

जवळपास चाळीस वर्ष गुंथरसाहेब वर्षातले सहा महिने जर्मनीत तर सहा महिने पुण्यात असायचे. त्यांनी पंढरीची वारी सुद्धा कधी चुकवली नाही. वारकरी परंपराचा अभ्यास केला. इथले विरगळ, गावाबाहेरची पडलेली मंदिरे, संरक्षण देवता यांचे संशोधन केले.  महाराष्ट्रातील मौखिक साधने,परंपरा,चाली रिती यांचाही सखोल अभ्यास करुन अनेक शोधनिबंध लिहीले .

जेजुरीच्या खंडोबाच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे धागे आंध्र कर्नाटक पर्यंत पसरलेलं त्यांच्या लक्षात आलं. तिथल्या पशुपालक समाजाचा अभ्यास करून त्यांनी विठोबा, म्स्कोबा आणि खंडोबा हा प्रबंध हिंडेनबर्ग विद्यापिठात सादर केला.

महाराष्ट्रातल्या मातीतल्या देवांना त्यांनी जगाच्या पातळीवर ओळख मिळवून दिली. अनेक धार्मिक ग्रंथाना त्यांनी जर्मन भाषेत रुपांतरीत केलं. धनगरी लोकगीतांना त्यांनी तिथल्या पाड्यातून बाहेर काढले.

धनगर समाज आणि त्यांची दैवते हा त्यांच्या जिव्हाळ्याचा भाग बनला होता. 

माणदेशातील दुष्काळी पट्ट्यातील धनगरी पाड्यावर जाऊन तिथल्या लोकांचे जीवन त्यांनी चित्रित केले. त्यांच्या चालीरीती, त्यांच्या ओव्या त्यांचे प्रश्न, त्यांचे उत्सव यावर एक सुंदर फिल्म देखील बनवली.

फक्त हाच विषय नाही तर जेजुरीच्या खंडोबावर, तिथल्या परंपरा, इतिहास , पंढरपूरची वारी, पालखी सोहळायावर देखील त्यानी फिल्म्स बनवल्या. जर्मनीमध्ये त्या रिलीज देखील झाल्या. आजही इंटरनेटवर त्या उपलब्ध आहेत.

या फिल्ममुळे त्यांचे संशोधन फक्त अभ्यासकांपुरतेच नाही तर सर्वसामान्य लोकांपर्यत देखील पोहचू शकले. 

जेजुरी मध्येच त्यांनी बराच काळ घालवला. तिथे त्यांना सरपंच म्हणून ओळखत.  तिथल्या  जुन्या मूर्ती (धातूंच्या), पारंपरिक गाणी, हस्तलिखिते या सर्वांचा एक उत्तम संग्रह त्यांच्याकडे निर्माण झाला होता. पुढे जेजुरीमध्ये  या सगळ्याच डॉ. सोन्थायमर वस्तुसंग्रहालय काढण्याची योजना होती. पण ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही.

दुर्दैवाने त्यांचे १९९२ साली जर्मनीत राहत्या घरात हृद्यविकाराने निधन झाले. वयाच्या अवघ्या ५८व्या वर्षी या वारकऱ्याला आपली वारी अर्ध्यावर टाकून द्यावी लागली.

पण त्यांची शेवटची इच्छा देखील मराठी मातीत मिसळून जाण्याची होती.

त्यांनी मृत्यूनंतर आपल्या कलेवराचे दहन करावे आणि रक्षा जेजुरीला कर्‍हेच्या पात्रात टाकावी, असे लिहून ठेवले होते. त्यानुसार त्यांच्या अस्थी  भारतात आणल्या गेल्या.

61561371 10157110214163605 8579546758328090624 n

जेजुरीकरांनी गडाच्या पायथ्याला त्यांची पालखीतून धनगरी ढोल वाजवत मिरवणूक काढली आणि आपल्या लाडक्या गुंथरोबाचे कर्‍हा नदीत अस्थिविसर्जन केले.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. प्रियाल घांग्रेकर says

    गुंथर सोनथायमर,
    हिंदुस्थान आणि हिंदुस्थानी परंपरांच्या अभ्यासासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिलेला ध्येयवेडा संशोधक. विशेषतः महाराष्ट्राबद्दल, मराठी मुलखाबद्दल आणि मराठी माणुस आणि वारकरी संप्रदाय यांचे विषयी त्यांना अपार आत्मियता, प्रैम होते. अश्या या महान संशोधकास विनम्र अभिवादन. धन्यवाद. 🌹🙏

Leave A Reply

Your email address will not be published.