मराठवाड्याच्या नांदेडला शिख धर्मपरंपरेत इतके महत्व का आहे?

नांदेड. महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेजवळचे गोदावरीच्या काठावर वसलेलं सुंदर शहर. पुर्वी निजामाच्या राज्यात होतं. हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील पोलिस कारवाईनंतर नवीन हैद्राबाद स्टेटमध्ये समावेश झाला आणि नंतर भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्रात आलं.

पण त्याशिवाय शीख धर्मीयांची दक्षिण काशी अशी नांदेडची खास ओळख जागतिक पातळीवर आहे.

सन १७०७. मुघल साम्राज्य एव्हाना कुमकवत व्हायला चालु झाले होते.औरंगजेबचा ही मृत्यु झाला होता. पण त्यापुर्वी त्याने आपल्या राज्याचा प्रचंड विस्तार केला. त्याच्या मृत्युनंतर मात्र मुगल साम्राज्याला सर्व बाजूंनी आव्हानांचा सामना करावा लागत होता. मराठे, शीख, राजपूत यांनी बंड केले.

इकडे औरंगजेबाच्या उत्तराधिकाऱ्यासाठी त्याच्या मुलांमध्ये वाद सुरु झाला. पुढे मोठा मुलगा मोहम्मद आजम शहा याने स्वत: ला सम्राट म्हणून घोषित केले.

कालांतराने बहादूर शाह प्रथम ऊर्फ शाह आलम याने त्याला लढाईत पराभूत केले आणि मुघल साम्राज्याचा सातवा शासक म्हणून गादीवर बसला.

पुढे बहादूर शाह फक्त पाच वर्षेच शासक राहिला परंतु त्यामध्ये ही शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरु, गुरु गोबिंद सिंह यांच्याशी त्याचा संबंध आला आणि गुरु गोबिंदसिंग यांचा नांदेडशी.

येथेच त्यांनी ७ ऑक्टोबर १७०८ रोजी अखेरचा श्वास घेतला.

शीख धर्म हा भक्तीमार्ग शिकवितो. गुरुनानकांना बाबरने कारागृहात डांबले. तरीही पहिल्या ९ धर्मगुरूंनी त्यांच्या उपदेशात केवळ भक्ती अन् प्रेम यांचाच संदेश दिला. पण मुघल शासक मात्र शीख धर्मावर अन्याय करतच होते. याविरोधात औरंगजेबाच्या काळापासून काही शीख सैनिक मुघलांशी लढा देवू लागले.

यात नववे शीख गुरु तेग बहादुर सिंग औरंगजेबाच्या हाती सापडले. पण त्यांनी हार मानली नाही. अनेक प्रयत्न करुन ही त्यांनी इस्लाम धर्म स्विकारला नाही. सोबतच इतरांच्या धर्मांतराचाही त्यांनी विरोध केला.

नवव्या धर्मगुरुंचा शिरच्छेद आणि गुरु गोबिंद सिंग धर्मगुरु

शेवटी ११ नोव्हेंबर १६७५ रोजी औरंगजेबाने गुरू गोबिंद सिंग यांच्या वडिलांचा म्हणजेच शीखांचे नववे गुरू ‘गुरु तेग बहादूर’ यांचा दिल्लीच्या चांदनी चौकात सर्वांसमोर शिरच्छेद केला. २४ नोव्हेंबर १६७५ रोजी गुरु तेग बहादूर यांचा मुलगा गोबिंद राय आणि माता गुजरी यांना शीखांनी आपला दहावा गुरु म्हणून निवडले.

गुरू गोबिंद सिंग संतकवी होते. ते अनेक भाषांचे जाणकार आणि अनेक ग्रंथांचे रचनाकार होते. ‘गुरू ग्रंथ साहिब’ या शीख धर्मियांच्या पवित्र ग्रंथाचं लेखन त्यांनी पूर्ण केलं. त्यांच्या दरबारात ५२ कवी आणि लेखक उपस्थित असत, म्हणूनच त्यांना ‘संत सिपाही’ असंही म्हणतात. या शिवाय त्यांना ‘दशमेश’, ‘बजनवाले’, ‘कलगीधर’ अशा अनेक उपाध्यांनी जनतेने गौरवलं. आपल्या कारकीर्दीत त्यांनी शीख धर्माची ध्वजा नव्या उंचीवर नेली.

त्यामुळेच शीखांमध्ये गुरू गोविंद सिंग यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

खालसा पंथाची स्थापना

शीख धर्मावर होणाऱ्या आक्रमणाविरोधात शीख फौज निर्माण करण्याच्या उद्देशाने खालसा पंथाची त्यांनी स्थापना केली. १६९९ साली ‘बैसाखी’ सणाच्या दिवशी गुरू गोबिंद सिंग यांनी ‘खालसा’ पंथ सुरू केला. बलिदानाची तयारी असणाऱ्या पहिल्या ५ अनुयायांपासून त्यांनी ‘खालसा’ पंथाची सुरूवात केली.

‘खालसा’ म्हणजे शुद्ध, पवित्र. खालसा पंथीय ही प्रार्थना करतात,

‘परमेश्वरा, मी योग्य कारणासाठीच लढीन. मी युद्धावर जातांना मला निर्भय बनव. ‘मी युद्धात जिंकेनच’, असा आत्मविश्वास माझ्यात निर्माण कर. माझ्यात तुझ्या कीर्तनाची आवड निर्माण कर आणि मृत्यूसमयी तुझ्या चरणी विलीन करून घे.’

तेव्हापासून शीख पुरूष आपल्या नावामागे ‘सिंग’ म्हणजेच ‘सिंह’ हे उपनाम लावू लागले.

केश, कंगा, कडा, कृपाण, कच्चेरा या ५ ‘क’कारांचं महत्त्व पटवून शीखांना नियम समजावून सांगितले. आपल्या झंझावाती कारकीर्दीत त्यांनी मोंगल तसंच शिवालिक टेकड्यांवरच्या आक्रमकांसोबत जवळपास १४ युद्ध लढली.

मुघलाविरोधात तीव्र लढा

१६८७ ला नादौनच्या लढाईत, गुरु गोविंद सिंग, भीम चंद आणि इतर सहकारी पहाडी राजांच्या सैन्याने अलीफ खान आणि त्याच्या सैन्याचा पराभव केला. १६९५ मध्ये लाहोरच्या दिलावर खानाने आपला मुलगा हुसेन खान याला आनंदपूर साहिबवर हल्ला करायला पाठवलं.

या युद्धात त्यावेळी मोगल सैन्याचा पराभव झाला. हुसेनच्या मृत्यूनंतर दिलावर खानाने जुझार हाडा आणि चंदेल राय यांना शिवालिकला पाठवलं. मात्र त्यांचादेखील गुरूंनी पराभव केला. पहाडी प्रदेशात सातत्याने असा पराभव होत असल्यानं मुघल बादशाह औरंगजेबाला सहन झाला नाही.

गुरुंच्या दोन्ही मुलांनी धर्मासाठी मृत्यु स्विकारला

मुघलांना धूळ चारत गुरू गोबिंद सिंग जेव्हा चमकौर येथे पोहोचत होते, तेव्हा सरसा नदी पार करताना माता गुजरी आणि आपले दोन्ही लहानगे पुत्र साहबज़ादे झोरावर सिंग आणि फतेहसिंग यांच्याशी ताटातूट झाली. गुरू गोबिंदसिंग यांची कोवळी बालकंही वडिलाप्रमाणेच शूरवीर होती.

गद्दारीचा फटका बसल्याने छोटे साहबजादे जोरावर सिंग आणि फतेहसिंग मुघलांच्या हाती लागले. या दोन्ही बालकांना सरहिंदच्या नवाबाने इस्लाम धर्म स्वीकारण्याचा आदेश दिला.

मात्र दोन्ही चिमुकल्यांनी मोठ्या निर्भीडपणे आपला धर्म सोडण्यास नकार दिला.

यामुळे संतप्त झालेल्या नवाबाने ९ वर्षांच्या झोरावर सिंग आणि ६ वर्षांच्या फतेह सिंग यांना भिंतीत जिवंत चिणून ठार करण्याची शिक्षा दिली. मात्र तरीही दोन्ही मुलांनी आपला शीख धर्म सोडला नाही. २७ डिसेंबर १७०४ रोजी दोन्ही साहबज़ाद्यांना भिंतीत जिवंत पुरलं.

गुरुंचा जफरनामा

गुरू गोबिंदसिंग यांना जेव्हा आपल्या मुलांच्या बलिदानाबद्दल समजलं, तेव्हा त्यांनी औरंगजेबाला ‘जफरनामा’ म्हणजेच ‘विजयाचं पत्र’ लिहिलं.

या पत्रात त्यांनी औरंगजेबाला खालसा पंथ मुघल साम्राज्यला नष्ट करण्यास तयार असल्याचं जाहीर केलं. हे पत्र गुरू गोबिंद सिंग यांच्या मुत्सद्देगिरीची साक्ष देतं. या पत्रात शौर्यपूर्ण लिखाण, आध्यात्मिक ज्ञान, कूटनीती यांची काव्यात्मक सांगड अत्यंत प्रभावीपणे घातली होती.

ज्यावेळी अहमदनगर येथे आजारपणाने ग्रासलेल्या औरंगजेबाने हे पत्र वाचलं, त्यावेळी त्याला आपल्या चुकूची जाणीव झाली. त्याने गुरू गोविंद सिंग यांची माफी मागण्याच्या उद्देशाने सन्मानपूर्वक आमंत्रित केलं.

मात्र गुरू गोबिंद सिंग यांच्याशी भेट होण्यापूर्वीच नैराश्यग्रस्त औरंगजेबाचा मृत्यू झाला.

दरम्यान ८ मे १७०५ रोजी ‘मुक्तसर’ येथे झालेल्या भयंकर युद्धातही गुरू गोबिंद सिंग यांनी विजय मिळवला. औरंगजेबाच्या भेटीसाठी दक्षिणेकडे निघाले असतानाच गुरू गोबिंद सिंग यांना १७०६ साली औरंगजेबाच्या मृत्यूची माहिती मिळाली.

औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बहादुरशाह याने गुरू गोबिंद सिंग आणि शीख धर्मीयांशी चांगले सौहार्द्राचे संबंध ठेवले. याच संबंधांमुळे घाबरलेल्या नवाब वाजीत खान याने गुरू गोबिंद सिंग यांच्यावर आपले खास असलेले जमशेद खान आणि वासील बेग या दोन अफगाणी माणसांकरवी नजर ठेवण्यास सुरुवात केली.

गुरु गोबिंदसिंगांनी नांदेडमध्ये अखेरचा श्वास घेतला

गुरु गोबिंदसिंग पुढे नांदेडला आले. गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या शीख धर्माच्या छावणीत पोहोचले. जमशेद खान त्यांच्या मागावर होताच. एक दिवस गुरु गोबिंदसिंग आपल्या छावणीत विसावा घेत असताना जमशेदने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या छातीच्या खालच्या बाजूला खोल जखमी झाली. १८ व्या शतकातील लेखक श्री गुर सोभा म्हणाले, की गुरु गोबिंद यांनी मारेकऱ्यांशी निकराने लढा दिला आणि जमशेदला तिथेच ठार केला. जमशेदचा साथीदार पळून जाताना पकडला गेला आणि गुरु गोबिंदच्या साथीदारांकरवी मारला गेला.

असे म्हणतात, की जखमी गुरु गोबिंद सिंग यांच्यावर उपचार करण्यासाठी बहादूर शहाने युरोपियन डॉक्टरांना नांदेड येथे पाठवले. उपचारांनंतर काही दिवसांनी, धनुष्य धरत असताना, त्यांची जखम पुन्हा बळावली आणि रक्तस्त्राव होऊ लागला.

यावेळी त्यांनी आपल्या पश्चात आपला गुरूपदाचा वारसदार म्हणून कोणत्याही व्यक्तीची निवड न करता गुरूंनी लिहिलेल्या आणि स्वतः पूर्ण केलेल्या गुरु ग्रंथ साहिबालाच कायमस्वरूपी गुरू मानण्याचा आदेश शीख धर्मीयांना दिला. यावेळी त्यांचे शब्द होते,

आज्ञा भई अकाल की तभी, चलायो पंथ
सब सीखन को हुकम है गुरु मान्यो ग्रंथ

७ ऑक्टोबर १७०८ रोजी वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी महाराष्ट्रातील नांदेड येथे अखेरचा श्वास घेतला. तेव्हापासून शीख समूदाय गुरूद्वारेमध्ये निरंतर ‘गुरू ग्रंथ साहिबा’पुढे नतमस्तक होतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.