शपथविधीच्या दिवशी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत फक्त एकाच वाघात होती

गल्लीतले नेते दिल्लीत जाऊन लोटांगण घालण्याची पंरपरा नवी नाही. पूर्वापार राज्यात वाघ बनणारे नेते देशाच्या राजकारणात गेल्यावर मांजर बनलेलं आपण पाहत आलोय. पण एक नेता असा होता ज्याच्या डरकाळीने दिल्ली देखील हलायची, नाव गुरुदास कामत.

सत्तरच्या दशकात विद्यार्थी चळवळीतून राजकारणात आलेली जी मंडळी होती त्यात गुरुदास कामत यांचं नाव आघाडीवर घेतलं जायचं. काँग्रेसची युथ विंग समजल्या जात असणाऱ्या एनएसयूआयचा खंदा कार्यकर्ता.

आक्रमक स्टाईल, तडफदार भाषणं, तेजतर्रार व्यक्तिमत्व यामुळे कॉलेज जीवनात त्यांची प्रसिद्धी अफाट होती. मुंबई एनएसयुआयचा त्यांना अध्यक्ष करण्यात आलं. तिथून युथ काँग्रेसमध्ये गेले, तिथेपण चमकदार कामगिरी केली. त्यांची थेट महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचा सचिव बनवण्यात आलं.

राजकारणाच्या पटलावर नुकताच प्रवेश केलेल्या राजीव गांधी यांचा देशातला पहिला जाहीर कार्यक्रम विलास मुत्तेमवार यांनी १९८२मध्ये घेतला. नागपुरातल्या त्या कार्यक्रमातच राजीव गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रं देण्याचा ठराव विलास मुत्तेमवार यांच्या पुढाकारानं मांडला गेला. त्या ठरावाचं वाचन गुरुदास यांनी केलं होतं.

गुरुदास कामत यांची पक्षाबद्दलची निष्ठा वादातीत होती. राजकारणात पहिलं पाऊल टाकणाऱ्या राजीव गांधींना आपले म्हणून जे कार्यकर्ते वाटायचे त्यात कामत यांचं नाव खूप वर होतं. गांधीच्या घरात त्यांचा सहज वावर त्यांचं वाढतं महत्व दाखवून देणारा होता.

राजीव गांधी मुंबईत आले आणि एकदा का अधिकृत कार्यक्रम संपले की, गुरुदास कामत कार ड्राईव्ह करतात आणि राजीव गांधी शेजारी बसून मग, हे दोघं मुंबईत फिरतात, अशीही चर्चा ऐकायला मिळायची. दोघांच्या मैत्रीची चर्चा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही पोहचली होती.

१९८४ च्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींनी त्यांना तिकीट दिलं आणि ते भरघोस मतांनी निवडून देखील आले.

त्याकाळी मुंबई काँग्रेसवर राज्य होतं मुरली देवरा यांचं. ते देखील गांधी घराण्याचे निष्ठावंत. काँग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात असतात असं म्हटलं जायचं. संघटना पातळीवर मोठं वजन असणारे मुरली देवरा पण त्यांचा तळागाळात संपर्क तसा कमी होता. डाव प्रतिडाव करणाऱ्यात माहीर असणाऱ्या देवरा यांच्या काळात निवडणुकामध्ये काँग्रेस मागे पडत आहे कि काय असं वाटू लागलं होतं.

अशावेळी गुरुदास कामत यांनी मुंबई काँग्रेसच्या राजकारणात उडी घेतली.

शिवसेनेच्या झंझावातात काँग्रेसला मुंबईत टिकवून धरण्यात गुरुदास कामत यांचा मोठा हात होता. १९९८ साली मुंबईत प्रमोद महाजन यांचा पराभव करायचा विक्रम त्यांनी करून दाखवला. मुरली देवरांच्या मुंबई काँग्रेसमध्ये गुरुदास कामत हा वेगळा गट निर्माण झाला.

कामत यांची शैली बंडखोर होती. बऱ्याचदा स्पष्टवक्तेपणा त्यांना नडायचा. चूक दिसलं तर ते फट्टदिशी बोलून मोकळे व्हायचे. त्यांच्या रागीट स्वभावाचा अनेकदा मुरली देवरांना फटका बसायचा.

पण जेवढे कामत रागीट तेवढे मुरली देवरा शांत स्वभावाचे. चिडलेले कामत त्यांचा फोनच उचलायचे नाहीत. अशावेळी आपल्या बायकोला घेऊन देवरा थेट त्यांच्या घरी नाश्त्याला धडकायचे. गुरुदास कामत याना त्यांचे स्वागत करण्यावाचून पर्याय उरायचा नाही.

मुरली देवरा यांच्या नंतर २००३ साली कामत यांनाच मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष करण्यात आलं. पुढच्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेस चे ६ खासदार निवडून आले. गुरुदास कामत यांचा यात सिंहाचा वाटा होता.

२००९ सालच्या विजयानंतर त्यांची रवानगी डॉ.मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात गृह खात्याचा राज्यमंत्री म्हणून करण्यात आली. स्वकीयांकडूनच गुरुदास कामत यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न झाला तरी त्यांचं प्रस्थ वाढतच चाललं होतं.

जेव्हा राज्यात अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळ्यामुळे राजीनामा द्यावा लागला. त्या दिवशी गुरुदास कामत दिल्लीत होते. मुख्यमंत्री निवडीचे अधिकार प्रणव मुखर्जींना दिले होते. प्रणबदानी राजीव शुक्लांना सांगून कामत यांना संध्याकाळी भेटायला बोलावलं. दोघांच्यात चर्चा झाली, प्रणबदा त्यांना म्हणाले

रात्री फोन येईल जागा रहा.

याचा अर्थ स्पष्ट होता. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांचं नाव आघाडीवर होतं. पण मुंबईतून कसल्या किल्ल्या फिरल्या माहित नाही पण दुसऱ्या दिवशी कामत यांच्या ऐवजी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव जाहीर झालं.

गुरुदास कामत भडकले. अनेक दिवस काँग्रेसच्या नेतृत्वापासून लांब राहिले. सोनिया गांधींनी त्यांना काँग्रेसचा महासचिव बनवलं तेव्हा कुठे त्यांचा राग शांत आला.

पण एक प्रसंग आला तेव्हा त्यांच्या रागाचा विस्फोट झाला.

ते साल होतं २०१२. केंद्रात मंत्रिमंडळ फेर विस्तार होणार होता. राज्यमंत्री असलेल्या गुरुदास कामत यांना पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा फोन आला. त्यांना कॅबिनेट मिनिस्टर करण्यात येणार असल्याचं सांगितलं. गुरुदास कामत खुश झाले. मनमोहन सिंग यांनी बोलून झाल्यावर सोनिया गांधींना फोन दिला. त्यांनी देखील गुरुदास कामत यांचं अभिनंदन केलं.

पण जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराची लिस्ट डिक्लेर झाली तेव्हा गुरुदास कामत यांना स्वच्छता आणि जल विभागाचा स्वतंत्र खात्याचा राज्यमंत्री बनवलं होतं. एक अर्थे त्यांचं प्रमोशनच केलं होतं. पण गुरुदास कामत यांना ते आवडलं नाही. त्यांच्या पेक्षा कमी अनुभव असणाऱ्या तरुण खासदाराना जास्त चांगलं खातं दिलं होतं.

गुरुदास कामत भडकले. ते आऊट ऑफ कव्हरेज गेले. दुसऱ्या दिवशीच्या शपथविधीला ते गेलेच नाहीत. खुद्द अहमद पटेल,सोनिया गांधींचे फोन त्यांनी उचलले नाहीत. मंत्रिपदाचा राजीनामा देऊन टाकला. मित्रांनी समजावून सांगितल्यावर सोनिया गांधींची घरी जाऊन भेट घेतली पण राजीनामा मागे घेतला नाही.

राहुल गांधींच्या हातात कारभार आल्यावर त्यांनी आक्रमक गुरुदास कामत यांना बाजूला करण्यास सुरवात केली. त्यांच्या विरोधात संजय निरुपम, कृपाशंकर सिंह यांना बळ दिले. असं म्हणतात की सोनिया गांधींनी राहुल गांधींना सांगितलं होतं की,

कामत जो कहें वो लॉयल है उनको छोड़ना मत

पण राहुल गांधींनी या कडे दुर्लक्ष केले. याचा परिणाम मुंबईच्या मराठी मतांपासून काँग्रेस बाजूला गेली. पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये याचा त्यांना जोरदार फटका बसला.

आपल्यावरच्या अन्यायाचा कडेलोट झाल्यामुळे गुरुदास कामत यांनी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा देखील दिला. अनेक राजकीय अभ्यासक यांच्या निरीक्षणानुसार कामत यांचा रागीट स्वभाव आणि संयमाचा अभाव यामुळे त्यांचे नुकसानच झाले. पण गुरुदास कामत यांनी याच कधी काळजी कधी केली नाही. तळागाळातील कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करायचे आणि हीच ताकद त्यांनी जपली होती.

त्यांनी पक्षापासून कधी बंड केले नाही, विचारांच्या बाबतीत त्यांची निष्ठा कठोर होती पण स्वाभिमानाच्या आड जर पक्ष श्रेष्ठी जरी आले तर ते नमले नाहीत.

२०१८ साली अचानक हार्ट अटॅक मुळे त्यांचा मृत्यू झाला. या लोकनेत्याच्या अकाली निधनामुळे काँग्रेसचे कधीही भरून निघणार नाही एवढे नुकसान झाले ज्याचे फळ आजवर हा पक्ष भोगत आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.