चर्चा खरी ठरली, शेतकरी आंदोलनातून एका नव्या पक्षाचा जन्म झालाय

लोकशाही असलेल्या देशात एखाद्या आंदोलनातून किंवा चळवळीतून पक्ष उभा राहणं हे अगदी कॉमन आहे. म्हणजे उदाहरण म्हणून काँग्रेसचचं घ्या ना. जेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होत तेव्हा सुरु असलेल्या अन्यायाच्या विरोधात आपल्या अनेक स्वतंत्रसैनिकांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षाची स्थापना केली.  यासोबतच देशभरातल्या जवळपास सगळ्याचं डाव्या पक्षांची स्थापना ही चळवळीतून झालीये.

म्हणजे होत काय, एखाद्या मुद्द्यावर एका विशिष्ट गटाची मंजुरी नसते. मग तो गट त्या मुद्द्याच्या विरोधात उतरतो, हा विरोध पुढे चिघळतो, ज्यात आणखी कित्येक लोक जोडली जातात. आणि  त्याची पार वरपर्यंत दाखल घेतली गेली तर, समजायचं यातून एखादा नेता समोर येणार किंवा पक्ष तरी तयार होणार.

असाच अंदाज काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनाबाबत भिडूनं लावला होता. म्हणजे तीन कृषी कायद्यांच्या विरोधात ज्याप्रकारे शेतकरी बांधवांनी आंदोलन सुरु केलं. ज्यात देशातला मोठा गट सामील झाला होता, त्यात अनेक विरोधी पक्षांचा याला पाठिंबा होता. आंदोलनांनी सगळ्या बाजूनी दिल्ली जाम केली होती. जवळपास वर्षभर शेतकरी बांधव दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून होते.

आंदोलन चिघळलं, भडकलं, पेटलं, हिसाचार घडला म्हणजे एकूणचं काय सगळंच पाहायला मिळालं. यात जवळपास ७०० च्या आसपास शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

शेवटी शेतकरी काय माघार घेईना, म्हणून सरकारलाचं त्यांच्यासोमोर झुकाव लागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण हे तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत असं जाहीर केलं. शेवटी संसदेत कायदेशीर रित्या हा कायदा मागे घेण्यात आला. आणि शेतकरी वर्षभरानंतर आपल्या घरी गेले.

या आंदोलनाने इतका पेट घेतलेला कि, देशातच नाही तर जगभरात याची दखल घेतली गेली होती.  त्यामुळे भारतीय प्रथेप्रमाणे पुढे जाऊन या आंदोलातून एखादा राजकीय पक्ष तयार होतोय का काय, अशी अंदाज भिडूनं सहज लावला. कारण या आंदोलातून आधीच दोन लीडर समोर आले होते एक म्हणजे  राकेश टिकैत आणि दुसरे गुरूनं सिंह चढूनी.

आणि झालं काय कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशी तऱ्हा झाली. या शेतकरी आंदोलनातून एक नवा राजकीय पक्ष स्थापन झालायं. ‘संयुक्त किसान पार्टी’ असं या शेतकरी चळवळीतून निर्माण झालेल्या नव्या पक्षाचं नाव.  शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी आजचं चंदीगडमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन या नव्या पक्षाची घोषणा केली.

chandigarh 1639808240

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाच्या धर्तीवर या पक्षाचे नाव ‘संयुक्त किसान पार्टी’ असं देण्यात आल्याचं समजतंय. महत्वाचं म्हणजे येत्या विधानसभा निवडणुकीत हा नवा राजकीय पक्ष सगळ्या ११७  जागांवर आपले उमेदवार उभं करणार आहे.

पक्षाची घोषणा करताना चढूनी म्हणाले की,

आपण संयुक्त किसान पार्टी या नवीन राजकीय पक्षाची घोषणा करतोय.  त्यांचा पक्ष पंजाबची निवडणूक पूर्ण जोमाने लढेल. पंजाब विधानसभेच्या सर्व जागांवर पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे.

गुरूनाम चढुनी यांनी पुढे बोलताना म्हंटल कि, देशात भांडवलदारांचे शोषण सातत्याने वाढत आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरीही वाढत आहे. धोरणे राबवणाऱ्या संस्था श्रीमंतांच्या ताब्यात आहेत आणि त्या गरिबांसाठी धोरणे बनवत आहेत. बहुतेक राजकीय पक्ष श्रीमंतांच्या ताब्यात आहेत आणि त्यांच्या पक्षात ग्रामीण, शहरी, मजूर, शेतकरी आणि ठेल्यावाल्यांचा समावेश असेल. आपला पक्ष हा धर्मनिरपेक्ष असेल. या पक्षात सर्व धर्म आणि जातीच्या लोकांचा समावेश असेल.

बघायला गेलं तर गुरनाम सिंग चढून यांनी शेतकरी आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. केंद्र सरकारशी बोलण्यासाठी युनायटेड किसान मोर्चाने स्थापन केलेल्या पाच सदस्यीय समितीचाही ते भाग होते. त्यांच्यासोबत युधवीर सिंग, अशोक ढवळे, बलवीर सिंग राजेवाल आणि शिवकुमार कक्का या दिग्गज नेत्यांचाही या समितीत समावेश होता.

आता तसं पाहिलं तर याआधी जुलैमध्ये जेव्हा शेतकरी आंदोलन सुरु होत. तेव्हा चढूनी यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या पक्षाने निवडणूक लढवावी, असे ते म्हणाले होते. पण आपल्या या विधानामुळे त्यांची चांगलीच गोची झाली होती. त्यांना शेतकरी आंदोलनातून एक आठवड्यासाठी निलंबनाला सामोरं जावं लागलं होत.

युनायटेड किसान मोर्चाच्या नेत्यांना त्यांची निवडणूक लढवण्याची ही आयडिया अजिबात पटली नव्हती. आता राकेश टिकैत आणि चढुनी यांचं आधीच पटत नाही. त्यामुळे चढुनी यांच्या या वक्तव्यावर राकेश टिकैतपासून दर्शन पाल सिंगपर्यंत सगळ्यांनीच टीका केली होती.

त्यांनी म्हंटल की, शेतकरी आंदोलनाचा पहिला फोकस कृषी कायदे रद्द करणे हा आहे, निवडणुक लढविण्याच्या मुद्द्यामुळे आंदोलन कमकुवत होईल.

पण आता शेतकरी आंदोलन संपलय आणि निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागलाय. त्यामुळे गुरुनाम चढुनी यांनी आपली इच्छा सुद्धा पूर्ण केली आणि संयुक्त किसान पार्टी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली. आणि ते निवडणूक लढायला सुद्धा तयार आहे. त्यामुळे निवडणुकीत हा नवा पक्ष काय बाजी मारतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.