गुरुपौर्णिमा स्पेशल : अन् त्याच क्षणापासून सचिन पिळगावकर संपूर्ण विश्वाचे ‘महागुरू’ झाले

आज गुरु पोर्णिमेच्या निमित्ताने दिवसभर व्हॉट्सअप वाजत होतं. ग्रुपवर तर फोटोच फोटो. ऋषींचे फोटो, शाळेतल्या फळ्याचे, देवाचे आणि फुलांचे फोटो. सगळ्यांचे फोटो येऊन गेले. त्यात एक फोटो मात्र वाढीव होता. तो होता सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, डान्सर आणि सिंगर असणाऱ्या सचिन पिळगावकर यांचा.

आता सचिन पिळगावकर यांना ‘महागुरू’ म्हणतात म्हणूनच हा फोटो आजच्या दिवशी ग्रुपवर पडला, पण त्यांना महागुरु म्हणायला सुरवात नेमकी कोणी केली?

तर याचं उत्तर म्हणजे, त्यांनी काही वर्षांपूर्वी ‘एका पेक्षा एक’ या झी मराठीवर आलेल्या डान्सिंग रीयालिटी शोचं जजिंग केलं होतं आणि त्या शोमध्ये त्यांना ‘महागुरू’ म्हटलं जायचं. तेव्हा हा शो हिट झाला होता आणि त्यामुळे सचिन पिळगावकरांना महागुरु हे नाव चिकटलं ते कायमचंच.

तेव्हापासून महागुरू हा शब्द जरी कोणी उच्चारला, तरी सचिन पिळगावकर यांचं नाव फिक्स आठवतं. तसंच सचिन पिळगावकर यांचं संपूर्ण नाव घेताना महागूरू हा शब्द वापरला गेला नाही असं कधी होत नाही.

पण भिडूंनो, फक्त रियालिटी शो मध्ये म्हणतात म्हणून नाही, तर आपले महागुरु सचिन पिळगावकर खरंच महागुरु आहेत. आम्ही हे काय असं हवेत बोलत नसतोय. त्यांनी केलेली कामं, त्यांची ज्येष्ठता, त्यांचा अनुभव आणि त्यांचं प्रांजळ बोलणं या सगळ्या गोष्टी ते आणि तेच खरे महागुरु असल्याचं सिद्ध करतात.

त्यांनी स्वतः त्यांच्या एबीपी माझाच्या कट्ट्यावर झालेल्या मुलाखतीत केलेल्या काही विधानांवरून त्यांचं महागुरु असणं अधोरेखित होतं.

या मुलाखतीत ते म्हणतात की,

“इंडस्ट्रीतलं इतर कोणीही माझ्या एवढं, म्हणजे ५४ वर्ष या क्षेत्रात कार्यरत नाही. त्यातल्या त्यात धरमजी मला सीनियर आहेत. बाकी अमिताभ आणि राजेश खन्ना वैगरे सगळे माझे ज्युनियर आहेत.”

सचिन पिळगावकर यांनी केलेला पहिला सिनेमा १९६३ साली आला होता. तर अमिताभ बच्चन यांनी साकारलेला पहिला सिनेमा आला होता, १९६९ साली. म्हणजेच, सचिन पिळगावकर म्हणतात तसं खरच ते अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा सीनियर आहेत हे सिद्ध होतं. नाद करा पण महागुरुंचा कुठं ?

“५४ वर्षातलं एकही वर्ष असं नाही ज्या वर्षी मी इंडस्ट्रीत काम केलं नाही.”
असंही त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

“मी माझ्या वयाच्या सातव्या वर्षी दिग्दर्शक व्हायचं ठरवलं होतं” असंही ते या मुलाखतीत म्हणतात. आता इतरांना ज्या वयात आपण काय करत होतो हे धड आठवतही नसतं त्या वयात सचिन पिळगावकर यांना दिग्दर्शक व्हायचं होतं, आणि ही गोष्टच आजच्या पिढीसाठी खरा मोटिव्हेशनचा डोस आहे, बाकी सब झूठ.

“बाल कलाकार या कॅटेगरीमध्ये पहिलं नॅशनल अवॉर्ड दिलं गेलं, ते मला मिळालं आणि तेही वयाचा चौथ्या वर्षी” असा उल्लेख सचिन पिळगावकर यांनी आपल्या पहिल्या सिनेमाविषयी बोलताना आणि मिळालेल्या पुरस्काराबद्दल बोलताना केला आहे.

 ते असंही म्हणतात की, “इतक्या लहान वयात मी तो पुरस्कार घेण्यासाठी गेलो होतो त्यामुळे तेव्हा तिथे असणारे सगळे दिग्गज आणि मान्यवर मला पाहून चकित झाले होते.” 

पुढे ते म्हणतात, “मी आठवड्यातून पाच दिवस दोन तास अठरा वर्षांखालच्या तरूणांसोबत बॅडमिंटन खेळतो, त्यांच्या एनर्जीला मॅच करण्याचा प्रयत्न करतो आणि हेच माझ्या यंग दिसण्याचं रहस्य आहे”

सिनेसृष्टीत तुमच्या अभिनय कौशल्याला जितकं महत्व आहे, तितकंच महत्व तुमच्या फिटनेसला देखील आहे आणि या ही बाबतीत सचिन पिळगावकर अव्वल कसे ठरतात, त्यांनी फिटनेसची काळजी कशी घेतलीये, हे आपल्याला वड्याच्या जाहिरातीतून आणि त्यांच्या बॅडमिंटन प्रेमातून सापडतं.

थोडक्यात म्हणजे, त्यांच्याकडे असलेलं टॅलेंट, गाढा अनुभव, त्यांचं अभिनय कौशल्य, त्यांचं दिग्दर्शनातलं कौशल्य, फिटनेस आणि आपल्या बोलण्यातली विनम्रता या सगळ्यामुळे सचिन पिळगावकर खरोखर सगळ्यांचे महागुरु आहेत यात कुणालाच शंका नसेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.