पोरांनो पेपर सुरु होतायत, कॉपीचा इत्तुसा पण किडा डोक्यात असेल तर आधी हे वाच…
राज्यभरात जोमात बारावी बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत. मात्र विद्यार्थी फुल्ल टेन्शनमध्ये आहेत. जुने दिवस परत आलेत ना! पण… जुन्या दिवसांसोबत जुने कांडपण परतलेत भावांनो. परीक्षा म्हटलं की पेपरफुटी, चीटिंग, कॉपी यांच्या देखील बातम्या आल्याचं. तेच झालंय. नुकतंच बारावीच्या एचएससी बोर्डाचा पेपर फुटल्याच्या बातमीने हेय मोठा धुमाकूळ घातला.
दरवर्षी १० वी १२ वीच्या परीक्षा जवळ आल्या की सरकारमार्फत कॉपीमुक्त परीक्षेची टिमकी वाजविण्यात येते. कोविडमुळे गेल्या दोन वर्षांत शिक्षणव्यवस्थेत प्रचंड गोंधळ उडाला होता. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या १० वी- १२ वीच्या परीक्षा आता सुरू होत आहेत. परीक्षाकाळात राज्यात १० वी व १२ वीच्या परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी ‘कॉपीमुक्ती अभियान’ राबविण्यात येणार आहे. त्यामुळे कॉपी बहादूरांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र परीक्षा मंडळाने कॉपी काय असते? याबद्दल स्पष्टीकरण दिलंय.
त्यामध्ये कोणताही विद्यार्थी चिठी वगैरेद्वारे पेपर सोडवत असेल, मित्राकडून उत्तरं घेत असेल किंवा त्यांना पुरवत असेल तर त्याला कॉपी म्हटलं जातं. शिवाय आता यात डिजिटल माध्यम देखील आलंय. जर मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसच्या माध्यमातून कुणी उत्तरं बघताना, कुठे पाठवताना सापडलं तर त्यालाही कॉपी असं ग्राह्य धरल्या जाईल.
कुणी कॉपी करताना सापडलं तर त्यांना आधी फक्त डीबार केल्या जायचं. मात्र आता फौजदारी गुन्हा देखील विद्यार्थ्यांवर दाखल होण्याची तरतूद करण्यात आलीये. काय नक्की कायदा आहे,
याबद्दल HSC बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी बोल भिडूने संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितलं…
मंडळ शिक्षा सूचीनुसार त्यावर कारवाई केली जाते. कॉपी करताना विद्यार्थी सापडल्यास जास्तीत जास्त ६ परीक्षा विद्यार्थ्याला देता येत नाही. शिवाय जर डिजिटल डिव्हाइसेसचा वापर करून कॉपी केली असेल तर सायबर गुन्ह्यानुसार कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते. पोलिसांच्या आणि बोर्डाच्या तपास अधिकारांच्या चौकशीत विद्यार्थी चुकीचा सिद्ध झाला, तर सहा महिने ते १ वर्ष कारावास होऊ शकतो.
या संदर्भात आम्ही ऍडव्होकट सौरभ सदावर्ते यांच्याशी बोललो, त्यांच्या माहितीनुसार…
कॉपी करताना आढळल्यास विद्यार्थ्याला डिबार केलं जातं. त्यासाठी आधी विद्यार्थ्याला नोटीस दिली जाते. त्याची सुनावणी असते. बोर्डातर्फे तारीख दिली जाते आणि त्यावेळी विद्यार्थी वकीलामार्फत किंवा स्वतः तिथे बाजू मांडू शकतो. मग ते ठरवतात की पुढची प्रक्रिया काय असणार.
तर कॉपी करताना विद्यार्थी आढळल्यास त्वरित काय कारवाई होते, याबद्दल बीड जिल्हापरिषदचे शिक्षक श्रीकांत घोडके यांनी सांगितलं…
विद्यार्थ्याला ऑफिसमध्ये नेऊन त्यांच्याकडून लिहून घेतलं जातं की, कोणत्या प्रकारे ते कॉपी करत होते, कुणी पकडलंय. नंतर ते लिखित पत्र संबंधित विद्यार्थ्याच्या पेपरला जोडून बोर्डाकडे पाठवलं जातं. त्यानंतर तपासात जर विद्यार्थी दोषी सापडला तर बोर्डाच्या कायद्यानुसार त्यांना ठराविक परीक्षांसाठी रस्टीगेट केलं जातं.
तर उत्तर पत्रिका किंवा पुरवणी चोरणे, पेपर लीक करणे, पर्यवेक्षकाला गंभीर परिणामांची धमकी देणे किंवा उत्तरपत्रिकेवर अपशब्द लिहिणे यामुळे देखील तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
अशाप्रकारे सगळं आहे बघा भावांनो…
तेव्हा आता तुम्ही किंवा तुमचे कुणी प्रियजन पेपरला जातायेत तर कॉपी करण्याआधी शंभर वेळा विचार करा. पण विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आमचं म्हणणं आहे, जितकं येतं तितकं लिहा. पास तर होणारच आणि नापास झालात तरी फुल्ल इज्जतीत होणार. एक मात्र नक्की, अभ्यासाला पर्याय अभ्यासच!
हे ही वाच भिडू :
- बोर्डाच्या पेपरपासून पहिल्या लव्हलेटरपर्यंत, ट्रायमॅक्स पेन आपला खरा जिगरी होता…
- राजीव गांधींच्या मारेकऱ्यानं तुरुंगातून परीक्षा देत टॉप केलं होतं
- आरोग्यसेवा भरतीपासून ते म्हाडाच्या पेपर फुटीचं बिंग फोडलं ते पुण्याच्या सायबर पोलिसांनी..!